लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.
लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात ‘आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत’ असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती ‘फुलं आहेत का?’ असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली ‘मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?’ त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. ‘फुलं नाही मिळाली तर मग काय करता?’ आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. ‘मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.’ मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.
लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.
वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.
प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? ‘अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे’ असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995
पुण्यनगरी/12 मे 2017
Leave a Reply