मारुती हा ‘मरुत’ म्हणजे साक्षात ‘वायु”चा पुत्र मानला गेला आहे. इथं वारा म्हणजे आपण अनुभवतो ती झुळूक किंवा एखाद्या पठारावर येणारा फणाणता वारा नव्हे, तर साक्षात झंझावात, वादळवारा..! या वाऱ्याची ताकद काय हे बघण्यासाठी अधनं-मधनं ‘डिस्कन्हरी’ किंवा ‘नॅशनल जिआॅग्राफीक’ चॅनल पाहत जावं..तीथं मारुतीला वायुपुत्र का म्हणतात त्याचा अनुभव घेता(पाहता) येतो..याचं एक उदाहरण म्हणून आपण रामायणातला एक प्रसंग पाहूया.
रणभूमीवर बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी ‘संजीवनी’ मुळीची आवश्यकता असते. ती आणण्यासाठी वायुपुत्र मारूतीची नेमणूक होते..आवश्यक असलेली ‘संजीवनी’, द्रोणागिरीत नेमकी कुठली, हे ओळखता न आल्याने मारुतीने हा अख्खा ‘द्रोणागिरी’ पर्वत उचलुन आणला ही कथा आपल्याला माहित आहे.. पण मित्रांनो, नीट विचार केल्यास हा पर्वत वाऱ्याच्या अफाट ताकदीमुळे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतरीत झाला असण्याचीच शक्यता जास्त. आपणं हे दृष्य डिस्कव्हरी किंवा एनजीसी वाहिनीवर अनेकदा पाहीलं असेल..हिमालयात किंवा वाळवंटात वाऱ्याचा वेग अफाट असल्याने हे दृश्य अनेकदा दिसते, तिकडचा भूगोल सारखा बदलत असतो तो यामुळेच.. वायुपुत्र मारुतीने आणलेला ‘द्रोणागिरी’ पर्वत प्रत्यक्षात वादळ वाऱ्यानेच शिफ्ट झाला होता असा अर्थ काढता येतो.
अंजनीच्या पोटी नुकत्याच जन्म घेतलेल्या ‘मारूती’ला सूर्यबिंब गिळावेसे वाटते व तो सूर्याच्या दिशेने झेप घेतो हे केवळ वाऱ्यालाच शक्य आहे..ही कथा पुढं असं सांगते की, मारुतीला आपल्याकडे येताना पाहून सूर्य आपलं शस्त्र मारूतीकडे फेकून मारतो व ते मारूतीला लागून मारूती बेशुद्ध पडतो. वातावरणाच्या बाहेरील निर्वात पोकळीत वारा पोहोचू शकत नाही (म्हणून निर्वात पोकळी) व परिणामी बेशुद्धी येतेच हे आपल्याला आधुनिक सायन्स सांगते..मारुती जन्मकथेच्या कुपाने हे सत्य समोर येतं असं मला वाटतं..
आपल्या प्राचीन पूर्वजांना निसर्गाची अफाट ताकद म्हणजे एक चमत्कार वाटला असावा आणि त्या ताकदी पुढे आपली मानवी क्षमता नगण्य वाटली असल्याने निसर्गातील आग, वायु, पाऊस वा वाघ, सिंह, हत्ती, साप आदिंना देवता स्वरूप दिलं गेलं असावं..या देवतांच्या पराक्रमाच्या कथा गुंफल्या गेल्या असाव्सात..आपल्या पुराण कथा, प्रथा-परंपरा यात असाच मोठा अर्थ भरलेला आहे..त्या केवळ भाकडकथा किंवा अंधश्रद्धा म्हणून हसून सोडून देता कामा नयेत..त्याचा अर्थ शोधूम तो जिज्ञासूंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे..
— गणेश साळुंखे
Leave a Reply