वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन,रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे,तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे,घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी,आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी,पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर,जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई,हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply