— ठाणे येथे झालेल्या 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेतील हा श्री वसंत श्रीपाद देशपांडे यांचा लेख.
वाचनसंस्कृतीबद्दल काही मत व्यक्त करावयाचे म्हटले, की लोकसंख्येच्या किती टक्के लोक आजघडीस वाचन करीत असतील? त्यातून आजच्या युवावर्गाविषयी लिहावयाचे ठरविले, की आपण पन्नासएक वर्षापूर्वीचा तरुण आणि आजचा तरुण वर्ग यातील वाचनसंख्येचा तुलनात्मक आकडा मनाशी बांधू लागतो. पण पन्नास वर्षांपूर्वीची आणि आजची परिस्थिती विचारात घेता संस्कृतीतील बदल हा अपरिहार्यपणे सर्वच क्षेत्रांत झालेला आहे. असं म्हटलं जातं की, त्रिकालबाधित सत्य म्हणजे बदल हेच होय. प्रत्येक क्षणी बदल होत राहणे हे जसे अटळ आहे तसेच ते नैसर्गिकही आहे. पन्नास वर्षांपूर्वी सातच्या आत घरात येणे व शुभंकरोति म्हणणे ही संस्कृती होती. आज अगदी अपवादानेच याचे कुटुंबात पालन होत असेल. बाकी घरात ते आउटडेटेड समजले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे संस्कार. हे मुलांना संस्कारवर्गात दाखल करून होण्यापेक्षा घरोघरी वडील माणसे कशी बोलतात आणि त्यापेक्षाही काय आचरण करतात, त्यातून ती शिकत असतात व तेच रुजलेले संस्कार तरुणपणी त्यांच्यात उतरतात. वाचण्याची गोडी लागण्यासाठी घरातील या संस्कारांचा मोठा वाटा आहे.
साहित्य: काळाशी सुसंगत हवे
वाचनसंस्कृती ही प्रामुख्याने त्या काळात निर्माण होणाऱ्या साहित्यकृतींवर अवलंबून असते. साहित्य हा मानवाच्या सामाजिक जीवनातील सर्जनशील उपक्रम आहे. तसेच साहित्याची निर्मिती ही विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा परिपाक आहे. समाज हीच साहित्यनिर्मितीची प्रेरकशक्ती असते. म्हणूनच साहित्य हा समाज परिवर्तनातील मूलभूत व जबाबदार घटक आहे. आपण पाहतो आणि अनुभवतो, की समाजातील मूल्ये व आदर्श सतत बदलत असतात. त्यामुळे कालभान व मूल्यभान ठेवून साहित्यनिर्मिती व्हावयास हवी. तसे ते होत असेल तरच आणि तेवढेच साहित्य अधिकाधिक प्रमाणात वाचले जाते. यामुळे आजचा युवावर्ग आणि वाचनसंस्कृती याचा विचार करता प्रथम हे पडताळावे लागते, की आजच्या युवावर्गास उपयोगी वाटेल असे किती साहित्य निर्माण होते? पूर्वीच्या कथाकादंबऱ्या काही अल्प प्रमाणात वाचल्या जात असतीलही. पण त्यांची संख्या अत्यंत थोडी आहे व ते स्वाभाविकही आहे. आजचे साहित्य आजच्या काळाशी सुसंगत व तेही युवावर्गाला मार्गदर्शक वाटले तरच ते अधिकाधिक प्रमाणात वाचले जाणार. साहित्यिकांनी, आजच्या काळ काम वेग याचा ताळमेळ विचारात न घेता साहित्यनिर्मिती केवळ, आपणास अधिकाधिक पुस्तक लिहून प्रकाशित करावयाची म्हणून निर्माण केली, तरी त्याकडे युवावर्ग वाचनास उद्युक्त होईल अशी शक्यता नाही. युवावर्गास जे साहित्य आजच्या व उद्याच्या काळात उपयोगात आणता येईल, (अॅप्लिकेबल) तेच तो वाचणार हे निश्चित. म्हणजेच निर्माण होणारे साहित्य सद्यःस्थितीच्या जगण्याशी रिलेट होतेय असे म्हणजे मॅनेजमेंट, आधुनिक तंत्रज्ञान, आयटी क्षेत्र, व्यवसायाभिमुख इत्यादी स्वरूपांचे हवे असते. आणि युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्याचे वाचन करीत असतो. याचा अर्थ त्यास प्रेम, विनोद, करमणूक इत्यादी विषयांचे वावडे आहे असे नव्हे. पण त्याबाबतही आजची युवापिढी प्रत्यक्ष समाजात ज्या रीतीने ते व्यक्त करते, अनुभवते, त्याचे आजचे आणि यापुढील काळात कसा बदल होत जाईल याचे तरुण पिढीस भावेल असे साहित्य आजच्या लेखकांकडून निर्माण होत गेले पाहिजे. त्यासाठी त्या त्या समाजजीवनाची वैशिष्ट्ये त्या त्या काळातील साहित्यात उमटली पाहिजेत.
वाचनसंस्कृती: विविध पर्याय
आजच्या युवावर्गाच्या वाचनसंस्कृतीची पूर्वीच्या काळाबरोबर तुलना करून चालणार नाही व त्या अनुषंगाने ती किती ढासळत चालली आहे असे नुसते म्हणूनही भागणार नाही. पूर्वीच्या काळी करमणुकीची इतर साधने सोडा, पण साधा रेडिओही घरी नसे. अशावेळी ज्या काळच्या युवापिढीस निरनिराळ्या साहित्यांतून व वर्तमानपत्रांतून जे वाचावयास मिळे, तीच त्यांची मुख्यत्वे करमणूक आणि ज्ञानाचे साधन होते. त्याकाळी एखादा प्रियकर अथवा प्रेयसी त्यांच्याविषयी कथा कादंबरी वाचून अनेक दिवस त्यावेळचा तरुणवर्ग त्या त्या प्रसंगाचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणून त्यात दंग होऊन जावयाचा. पुन्हा पुन्हा ती पृष्ठे किंवा संपूर्ण पुस्तकही वाचून काढीत असत; कारण वाचनसंस्कृती हेच एकमेव साधन त्यांना उपलब्ध होते. आणि त्यासाठी भरपूर वेळही उपलब्ध होता. पण आजची परिस्थिती काय आहे? कादंबरीतील अनुभवाभोवती रेंगाळत राहणारी आजची युवापिढी आहे काय? प्रेम वगैरे बाबतीत ती फार पुढे गेलेली आहे. हे फक्त प्रेमाबाबतच घडते असे नाही. समाजास भावणारे इतरही विचार आहेत त्याबाबतही असेच घडते. जे वाचनाव्यतिरिक्तही करमणूक व ज्ञानासाठी उपलब्ध आहे त्याचा वापर समाज करत राहणार.
इंटरनेट व मोबाइल संस्कृती:
आजच्या युवापिढीस वाचनसंस्कृतीपेक्षा कितीतरी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. रेडिओ व टीव्हीवरील अनेक चर्चा, प्रात्यक्षिके याद्वारे ज्ञान त्यांच्यापुढे अनेक प्रकारे ओसंडून वाहत असते. डिस्कव्हरी व नॅशनल जिओग्राफिक चॅनल्सचा त्यात मोठा वाटा आहे. संगणकाने युवापिढीस काय मिळवून दिले नाही? इंटरनेटपर्यंत मजल मारून जगातील कोणत्याही विषयावर क्षणार्धात हवी तेवढी माहिती त्यांच्यासमोर अलिबाबाच्या गुहेप्रमाणे उघडून मिळते. मोबाइल फोन तर मिनी संगणक बनला आहे. या माध्यमातून ज्ञानाचे असंख्य झरे त्यांच्यासमोर वाहत आहेत आणि आजची युवापिढी त्यातील हव्या-नको त्या गोष्टींचा त्यांच्या दृष्टीने तारतम्याने पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. त्यातून काही विकृत गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. हा भाग वेगळा. तसं ते पूर्वीच्या साहित्यातून कळतच असे.
आजच्या लेखकांची जबाबदारी:
जेव्हा आपण आजचा युवावर्ग आणि त्याची वाचनसंस्कृती असा विचार करतो तेव्हा ज्ञानार्जनाचे हे वेगवेगळे मार्ग तरुणांपुढे उपलब्ध आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे. आजच्या गतिशील जीवनात मोठ्या आकाराचे साहित्य वाचण्यासाठी स्वस्थता आणि वेळ दोन्हीही युवापिढीस उपलब्ध नाहीत. त्याऐवजी इ-बुकद्वारे जाळे वेबसाइटच्या मार्गाने उपलब्ध आहे. त्यातून ते अनेक ग्रंथ नजरेखालून भराभर घालून त्यातून आवश्यक ते मुद्दे टिपत असतात. अनेक चर्चासत्रे होतात, शिबिरे भरतात आणि या सर्वांतून अजचा युवावर्ग ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. अशा प्रकारचे मिळत आणि मिळवत असलेले ज्ञानार्जनाचे प्रकार, वाचनसंस्कृतीला पर्याय ठरतो. आज ग्रंथ घेऊन वाचन करणे एवढीच मर्यादित व्याख्या वाचनसंस्कृतीची राहिली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रंथनिर्मिती हा खूपच खर्चिक उपक्रम झाला आहे. ३०० ते ५०० रुपये देऊन ग्रंथ विकत घेऊन वाचणारा अतिशय कमी वाचकवर्ग युवापिढीत आहे आणि आज आहे तोही पुढे पुढे कमी होत जाणार आहे. ग्रंथायात जाऊन ग्रंथ वाचन करणारे तरुणवर्गापेक्षा ज्येष्ठच जास्त आढळतात आणि तेही एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात फारच कमी. कारण बरेच ज्येष्ठ मुद्दाम संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान घेऊन प्रत्यक्ष वाचनास पर्याय शोधतात. इ-बुक कमी खर्चात आणि त्याहीपेक्षा कमी वेळात मुद्द्यांच्या संदर्भात वाचता व चाळता येते. पेन्सिल लॅपटॉपद्वारे तर पुस्तकेच्या पुस्तके छोट्या उपकरणातून वाचता येतात. लॅपटॉप वाचणारा हा आजचा युवावर्ग वाचक संस्कृतीतच मोडतो. कोठेही, केव्हाही सहजगत्या बरोबर नेता येणाऱ्या साधनामुळे, अनेक विषयांचा परामर्श छोट्या मोठ्या प्रवासातही घेता येतो. कानाशी मोबाइल किंवा डोळ्यांसमोर लॅपटॉप अशी ही नवीन वाचकसंस्कृती उदयास आली आहे आणि यापुढील काळामध्ये यामध्ये आणखी क्रांतिकारक शोध लागणार आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन, आजच्या लेखक मंडळींनी ब-याच गोष्टी तत्परतेने संगणकावर डाउनलोड करावयास सुरुवात केली पाहिजे. तरच वाचनसंस्कृती तरेल आणि खेड्यापाड्यातील वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी अधिकाधिक उर्जितावस्थेत जाईल.
खेड्यापाड्यातील युवावर्गाने या संधीचा फायदा घेऊन वाचकवर्ग वाढवावयाचा असेल तर संगणकाची प्रणाली (सॉफ्टवेअर) मराठी भाषत जास्तीत जास्त प्रमाणात (आणि इतर प्रांतात त्यांच्या मातृभाषेत) उपलब्ध व्हावयास हवी. कोणत्याही भाषत का असेना, युवापिढीची वाचन संस्कृती वाढविणे हे लक्ष्य आहे. जागतिक भाषा-पसंत पडो न पडो- इंग्रजी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. इंग्रजी भाषेचा द्वेष करण्यापेक्षा ती शिकत असताना मातृभाषेकडे लेखक व वाचक यापैकी कोणीही दुर्लक्ष करण्याची आवश्यकता नाही. ग्लोबलायझेशनच्या युगात एखाद्या मिनिटात जगातील कोणत्याही कोपऱ्यातील शहराशी संपर्क साधावयाचा असेल, तर आजतरी इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. आजकाल प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचण्याकडे युवावर्गाचा कल आहे. त्यातून त्यांना ध्येय ठरविण्याची आणि गाठण्याची प्रेरणा मिळते. निमशहरी व खेड्यातूनही जे तरुण आज शिकून पुढे येत आहेत त्यांचे सध्यातरी शिक्षणाचे माध्यम मराठी असण्याची जास्त शक्यता आहे. तो युवावर्ग वाचनाकडे वळविण्यासाठी परदेशातील प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्रे मातृभाषेत अनुवादित करून मोठ्या संख्येने उपलब्ध झाली पाहिजेत. मगच हा समाजाचा मोठा टक्का वाचन संस्कृतीकडे आकृष्ट होईल. सध्या या दृष्टीने चांगले प्रयत्न होत आहेत ही लक्षणीय गोष्ट आहे.
आजच्या युवावर्गाचा कल जाणणे महत्त्वाचे:
अखिल भारतीय आणि त्याचबरोबर वर्षभर इतर साहित्यसंमेलने भरतात त्यामध्ये युवावर्गाची आवड ओळखून, त्यांच्या पसंतीचे विधायक साहित्य उपलब्ध होत राहिले तर तो वर्ग खचितच अशा संमेलनांकडे व साहित्याकडे आकर्षित होईल. ठाण्यातील ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात युवापिढी नजरेसमोर ठेवून अनेक उपक्रम आयोजित केले आहेत हे सुचिन्ह आहे. या प्रकारचे आयोजन भावी काळात सातत्याने होत राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर युवावर्गाचा कल लक्षात घेऊन ग्रंथाबरोबर सीडी, व्हिसीडी, होम थिएटर आणि त्याचप्रमाणे इतर वेळी खाजगी चॅनल्स, २४ x ७ बातम्या आणि मालिकांतून युवकांसाठी अधिक जाणीवपूर्वक निर्मिती व उपलब्धता होणे आवश्यक आहे. वाचक आपल्याकडे कसा अधिकाधिक आकर्षित होईल हे साधण्यासाठी आजचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक इत्यादी सर्वांनी, दरवर्षी युवावाचकांपर्यंत स्वतः आधुनिक तंत्रज्ञानासह पोचले पाहिजे. त्यासाठी शाळा, कॉलेज यांना वारंवार भेट देऊन शिक्षक व पालकांच्या साहाय्याने कार्य करावयास हवे. अशा प्रकारे बालपणी व तारुण्यात घडविलेले वाचनसंस्कृतीचे संस्कार यातून जवळच्या भविष्यात मोठा वाचकवर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
-वसंत श्रीपाद देशपांडे
Leave a Reply