नवीन लेखन...

वाचनातूनच ‘खरं’ जग कळतं

मला दुसरीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता. ‘अहो, मला वाचता येतंय.’ त्या आठ ओळींच्या धड्याच्या वरती एका चाललेल्या टांग्यातून हॅण्डबिल वाटणारा कोट टोपी घातलेला माणूस दाखवला होता व त्या टांग्यामागे धावणारी एक पाच वर्षांची फ्राॅक घातलेली मुलगी दाखवली होती. जी त्या माणसाला थांबायला सांगून, वाचण्यासाठी त्यांच्याकडे हॅण्डबिल मागते आहे. हा धडा माझ्या मनावर कोरला गेला व मी हातात येईल ते पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र वाचत सुटलो.
वाचनामुळे माणसात खूप चांगले बदल होतात हे कित्येकांना माहीतही नसेल, त्यांच्यासाठी.

एरवी आपण एखाद्या वाटेत दिसणाऱ्या भिकाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून चालू लागतो. मात्र जर आपण भरपूर वाचन केले असेल तर आपलं मन त्या भिकाऱ्यामधील ‘माणूस’ शोधू लागतं. मनात प्रश्र्न येत राहतात. हा या अवस्थेला का आला असेल? कदाचित एकेकाळी यानं देखील चारचौघांसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहिली असतील. कुठे तरी याचंच चुकलं असेल आणि त्याचं पर्यावसान या स्थितीत झालं असेल. आपण पुढे गेलेलो मागे येऊन त्याच्या हातावर दहा रुपये ठेवतो व चालू पडतो.

कधी गर्दीत आपलं पाकीट मारलं जातं. आपण चडफडतो. स्वतःवरच चिडतो. हेच जर आपण वाचनाने समृद्ध असाल तर त्या पाकीटमाराविषयी विचार करु लागतो. त्याला चोरीची सवय कशामुळे लागली असावी? लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवते.

एक मुलगा आईला रोज नवीन गोष्टी आणून देतो, मात्र आई त्याला कधीही विचारत नाही की, हे तू कुठून आणलंस? ते चोरीचं आहे हे कळल्यावर तिनं जर शिक्षा केली असती तर त्याने चोरी करणं कदाचित त्याचवेळी सोडून दिलं असतं. तो कोर्टात स्वतःच्या आईलाच दोषी ठरवतो.

आपण आपलीच चूक उमजून, पुढच्यावेळी पैसे पाकीटात ठेवण्याऐवजी वरच्या खिशात ठेवू लागतो.

प्रेम आणि वासना यातला फरक हा वाचनाने कळू लागतो. पूर्वी सारसबाग, संभाजी पार्कला सहकुटुंब गेलं की, बागेतील प्रत्येक झाडाखाली लैलाला घेऊन बसलेले मजनू हमखास दिसायचे. शेवटी बाग बंद करताना वाॅचमन शिट्टी वाजवून त्यांना हाकलून काढायचे. हे आडोसा शोधणारे, प्रेमाचे प्रकार नसून शारीरिक आकर्षणच असायचं, हे वाचनातूनच समजले.

एखाद्याकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करण्याचा विचार हा अनेक ‘आत्मचरित्र’ वाचलेला माणूस नक्कीच करु शकतो. कारण आत्मचरित्रात असे अनेक प्रसंग आलेले असतात की, जेव्हा एखाद्या छोट्याशा चुकीबद्दल त्या माणसाला ‘कायमचे दूर करणे’ चुकीचे ठरलेले असते. चूक करणाऱ्यापेक्षा त्याला माफ करणारा श्रेष्ठ ठरतो. सर्वसामान्य माणूस टोकाचा निर्णय घेऊन त्या माणसाशी कायमचे संबंध तोडून टाकतो.

वाचनामुळे कुठे बोलावं व कुठे गप्प बसावं याचं भान रहातं. वादविवाद प्रसंगी आपला मुद्दा सांगूनही मान्य होत नसेल तर गप्प बसणे सर्वात उत्तम! शब्दानं शब्द वाढत जातात व निष्पन्न काहीच होत नाही. जिथं बोलणं आवश्यक आहे तिथं थोडक्यात मुद्देसूद बोलणं हे ज्ञानी माणसालाच जमू शकतं.

बोलताना आपले शब्द हे समोरच्याला जखमी करणार नाहीत ना? याची काळजी घेऊनच ते वापरावेत. विचार न करता अपशब्द वापरणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे. योग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवांतर वाचनानेच जमू शकते.
वाचनामुळे आई-वडीलांची किंमत कळते, त्यांनी केलेला त्याग समजतो. लहानपणापासून मोठं करेपर्यंत त्यांनी फक्त आपल्या अपत्याच्या सुखाचाच विचार केलेला असतो.

जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगाशी सामना करण्यासाठी वाचनच आपल्याला आत्मविश्वास देतं. अन्यथा माणूस कोलमडून जाऊ शकतो. मग तो प्रसंग एखाद्या ब्रेकअपचा असो वा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा असो.

वाचनात प्राण्यांविषयी सखोल ज्ञान मिळाल्यामुळे त्यांच्याविषयी आपुलकी वाटते. कोणी अजाणतेपणी एखाद्या मांजर अथवा कुत्र्याला दगड मारत असेल तर आपण त्याला अडवतो. प्राण्यांबद्दल सहानुभूती वाटू लागते. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची चीड येते.

वाचनामुळे समाजातील चेहरे आणि मुखवटे कळून येतात. सोशल मीडियावर स्वतःचे हसरे फोटो अपलोड करणारे प्रत्यक्षात किती विरोधाभासात जगतात, हे कळतं.

चित्रपटात व नाटकात अनेक कलाकार व्यवसाय म्हणून अभिनयाचं नाटक करतात, समाजात मात्र नाटकं करणारे असंख्य आपल्या अवती भवती फिरत असतात. हे कळण्यासाठी वाचन अत्यावश्यक ठरतं.

या जगात चांगले लोक फक्त १% व वाईट लोक १% आहेत. बाकीचे ९८% लोक त्यांचं अनुकरण करणारे आहेत. जे चांगल्याचं अनुकरण करतात ते चांगले होतात. जे वाईट लोकांचं अनुकरण करतात ते वाईट होतात. त्यातील चांगल्याचं अनुकरण करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही.

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, हरलेल्या व्यक्तीला प्रोत्साहन दिलं तर तो जिंकू शकतो. हे समजायला वाचनच मदतीला येतं. अपयशी ठरल्या नंतर आत्महत्येचा विचारही मनात न येता उमेदीनं जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. एकमेकांच्या सुख दुःखाची तीव्रता कळू लागते. करोडपती असणाऱ्या माणसातील ‘गरीबी’ व हमाली करुन जेमतेम भूक भागविणाऱ्यातील ‘श्रीमंती’ दिसू लागते.

आयुष्य खऱ्या अर्थानं सुंदर करण्यासाठी, जीवनाशी संघर्ष करण्याकरिता वाचन हे सदैव प्रेरणा देत रहातं.

चला तर मग, आजपासूनच जमेल तेव्हा ‘वाचन’ करुन आपलं जीवन समृद्ध करण्याचा संकल्प करुयात.

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१७-३-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..