मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद गंगाधर मंगरूळकर यांचा जन्म २९ एप्रिल १९०९ रोजी झाला.
मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद गंगाधर मंगरूळकर यांचा जन्म द.आफ्रिकेतील ‘किस्मायू’ या बेटावर झाला. त्यांच्या वडिलांचा तेथे काड्यापेट्यांचा व्यवसाय होता. परंतु, दुर्दैवाने वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षी वडील आणि आई यांचे निधन झाले. त्यानंतरचे त्यांचे बालपण सोलापूर येथे मामाकडे झाले. पहिली ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती, ‘भाऊ दाजी’ पारितोषिक, ‘नेस वाडिया’ सुवर्णपदक असे मोठे स्पृहणीय टप्पे गाठत ते एम.ए. झाले. प्रथम नू.म.वि. आणि नंतर स.प. महाविद्यालयात त्यांनी अध्यापनकार्य केले. यथाकाल अनेक अधिकारपदे, मानसन्मान आणि महत्त्वाची कामे त्यांच्याकडे चालत आली आणि पुण्याच्या साहित्य संगीत-कला क्षेत्रावर त्यांनी अखंड पंचेचाळीस वर्षे आपला ठसा उमटविला.
मंगरूळकर यांची व्याकरणातील तलस्पर्शी दृष्टी ‘मराठी व्याकरणाचा पुनर्विचार’ या ग्रंथात, तर वाङ्मयाची सूक्ष्म आणि साक्षेपी जाण, ‘मम्मटाचा काव्यप्रकाश’ (सहलेखक अर्जुनवाडकर) आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात व्यक्त झाली आहे. त्यांना सर्वच ललितकलांविषयी जिव्हाळा होता. त्यांची संगीतातील व्यासंगी-जाणकारी त्यांच्या ‘नादातील पाउले’ या पुस्तकातील विविध लेखांत प्रकट झाली आहे. अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. “सातवाहन राज्याच्या शेफालिका” चा गद्यानुवादाचे श्रेय अरविंद मंगरूळकराना जाते.
सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवातील संगीतकारांची पर्वणी हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा होता. नेमक्या व चपखल भाषातील वृत्तपत्रांतलं त्यांचं विवेचन आणि समालोचन खुपच गाजलं. मराठी विश्वकोशात संस्कृत व संगीत या विषयांना मध्यवर्ती ठेवून अरविंद मंगरूळकरांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.
अरविंद मंगरूळकर यांचे २७ मे १९८६ रोजी निधन झाले.
डॉ. परिणीता देशपांडे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply