१९८० सालचा , कदाचित या शतकातील सर्वोत्तम , अजरामर असा , विम्बल्डनचा अंतिम फेरीचा सामना.
बियाँर्न बोर्ग विरुद्ध जॉन मॅकॅन्रो.
शायर अदम म्हणतो,
दो मस्तियों के दौरे मे आया हुआ है दिल,
लबपर किसी का नाम है, हाथों में जाम है ।
कुरळे केस डोळ्यावर येऊ नयेत म्हणून कपाळावर रुंद बँड लावलेल्या, देखण्या तरण्याबांड जॉनने , बोर्ग व त्याचे चाहते स्थिरस्थावर होण्याआधीच पहिला सेट २०/२२ मिनिटांत ६-१ असा खिशात घातलेला.पण जबरदस्त पुनरागमन करत बोर्गने दुसरा सेट तीव्र संघर्षानंतर ७-५ असा जिंकला. तर अनुभवाच्या आणि संयमाच्या बळावर तिसरा सेटही ६-३ असा त्यामानाने सहज जिंकला. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत हार मानेल तर तो जॉन कसला. त्याने कडवा प्रतिकार करत , ‘attack is the best defense’ या उक्तीनुसार चौथा सेट ६-६ अशा स्कोअरवर आणून ठेवला. आणि आमची खरी गोची पुढेच झाली. लॉन टेनिस हा श्रीमंती खेळ , त्या खेळाचे नायकनायिका आणि त्या खेळाचे नियम हे सारेच आमच्यासाठी नविन होते. त्याबाबतीत आम्ही अजूनही शिशुवर्गात होतो. तो सेट टायब्रेकरवर गेला आणि आमचा गडबडगुंडा उडाला. एकाने एक(च) सर्व्हिस का केली ? मग दोघेही दोनदोन सर्व्हिस का करु लागले ?…सगळाच आनंद. टायब्रेकचा स्कोअर ६-६ काय , १२-१२ काय , काहीच समजेना. आणि एकदम स्कोअर १८-१६ होऊन जॉनने तो सेट ७-६ असा जिंकल्याची घोषणा झाली. पाचव्या आणि अंतिम सेटमधे पुन्हा ६-६ अशी बरोबरी झाल्यावर मात्र टायब्रेकरचा अवलंब केला गेला नाही आणि जॉनची सर्व्हिस भेदून ( व स्वतःची सर्व्हिस राखून ) बोर्गने तो सेट ८-६ असा व सामना १-६ ,७-५ ,६-३ ,६-७( १६-१८) आणि ८-६ असा जिंकला. भारतीय वेळेनुसार सामना संपायला उत्तररात्र झाली. सामन्याच्या न कळलेल्या गुणपद्धतीबद्दल चर्चा करतच आम्ही झोपी गेलो. आणि अगदी सकाळच्याच मटामधे करमरकरांनी आमच्या सर्व शंकांचे सुबोध भाषेत निरसन केले. टायब्रेकर म्हणजे काय ? दोन्ही खेळाडूंनी करावयाच्या सहासहा सर्व्हिसेस.त्यात सात गुण मिळविणाऱ्या खेळाडूस तो सेट ७-६ असा बहाल करण्याचा नियम व तसे न झाल्यास ( म्हणजे त्यातही ६-६ अशी बरोबरी झाल्यास ) दोन गुणांचा फरक पडेपर्यंत प्रत्येक खेळाडूने दोनदोन सर्व्हिस करीत रहाण्याची तरतूद ( जसे या सामन्यात जॉनने टायब्रेक १८-१६ फरकाने जिंकला.) यावर विविकनी छान प्रकाश टाकला होता.
त्याचप्रमाणे , परंपरांचा जिव्हाळ्याने आदर करणाऱ्या व त्या कसोशीने पाळणाऱ्या विम्बल्डनच्या नियमानुसार पाचवा व अंतिम सेट हा टायब्रेकरवर खेळला जात नाही व तो पारंपारिक पद्धतीनेच खेळावा ( व जिंकावा ) लागतो , यावर विम्बल्डनच्या थोरवीची इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांशी तुलना करुन सुरेख भाष्य केले होते.
महाराष्ट्र टाइम्सच्या व्यवस्थापनाच्या ( किंवा कदाचित संपादक गोविंदराव तळवळकरांच्या ) बुचकळ्यात टाकणाऱ्या आडमुठ्या धोरणामुळे , करमरकरांना कधीच भारतीय संघाबरोबर परदेश दौरा करण्याची संधी मिळाली नाही.
शायर म्हणतो,
आप गैरों की बात करते हो , हमने अपने आजमाये है,
आप काटों की बात करते हो ,
हमने जख्म खाये है फुलोंसे ।
पण त्याची खंत न बाळगता त्यांनी मटाच्या ऑफिसात बसूनच त्या दौऱ्यांवर ” दुरवरुन दृष्टीक्षेप ” टाकले.१९८१ मधिल भारताच्या ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड जोडदौऱ्यातील कसोटी सामन्यांच्या प्रत्येक दिवसाच्या खेळाचा परामर्श घेणारे त्यांचे “दुरवरुन दृष्टीक्षेप” हे सदर मला लख्ख स्मरते.मटा व्यवस्थापनाने (कदाचित) प्रायश्चित्ताच्या भावनेतून असेल, पण हे सदर परंपरेनुसार (खेळाला वाहिलेल्या) शेवटच्या पानाऐवजी चक्क पहिल्या पानावर डावीकडे छापायला सुरुवात केली.
मी तुम्हाला रॉबर्ट प्रियांका वाड्राची शपथ घेऊन सांगतो की थेट मैदानातून सामना कव्हर करणारे समालोचक किंवा पत्रकारांपेक्षाही त्यांनी दुरवरुन टाकलेला दृष्टीक्षेप बहिरी ससाण्यापेक्षाही जास्त वेधक आणि भेदक असे.फक्त एकच उदाहरण देतो.वेलींग्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत,रवी शास्त्रीने पदार्पणातच, न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात,चार चेंडूत तळाचे तीन फलंदाज बाद केले. तेव्हा रेडिओवरच्या भाबड्या समालोचकाने,आपल्या बाजूलाच बसलेल्या स्कोअररला, मायक्रोफोनवर,संपूर्ण भारताला ऐकू जाईल इतक्या ‘हळू’ आवाजात विचारले…’ अरे बाबा… ती हॅट्रीक होती का ? ‘ यावर बोचरी मल्लिनाथी करताना विविक लिहीतात की…”डोळे बंद करुन सामना बघण्यासारखीच आता आपल्याला कान बंद करुन समालोचन ऐकायची सवय करायला हवी.” तुम्ही सामना दोनशे फुटांवरुन बघा किंवा हजारो मैलांवरुन , पण बघणाऱ्याकडे टिपकागदाप्रमाणे मैदानावरची प्रत्येक लहानसहान घटना टिपून घेणारी सापेक्षी नजर हवी, याची जाणीव संबंधीतांना करुन देणारीच ही टोकदार कोपरखळी होती.
संदीप सामंत
९८२०५२४५१०
१/०४/२०२०
Leave a Reply