पुणे हे एके काळचं विद्येचं माहेरघर. त्या काळात सर्वत्र विद्वता नांदत होती. शहरातील मुख्य पेठांमध्ये, डेक्कनला व कॅम्पमध्ये पुस्तकांची मोठी दुकाने दिमाखात उभी होती. या ज्ञानमंदिरांना मी अनेकदा भेटी दिलेल्या आहेत.
टिळक रोडवरील नीळकंठ प्रकाशनचं छोटंसं दुकान जातायेता लक्ष वेधून घ्यायचं ते त्या दुकानाच्या पाटीवरील बोधवाक्यामुळे “शब्दकोशातील शब्द येथे सुंदर होऊन भेटतात.’ बरीच वर्षं चालू असलेलं हे ‘शब्दभांडार’ आता बंद झालंय.
टिळक रोडलाच टिळक स्मारक चौकात देशपांडे बुक स्टाॅल होता. जाता येता मी त्यांच्या शोकेसमधील पुस्तके पहात असे. आता तिथं कपड्यांचं दुकान सजलं आहे.
लक्ष्मी रोडला खरं तर कपड्यांचीच बाजारपेठ. मात्र त्या गर्दीतही पूर्वी गोखले हाॅलसमोर ‘साहित्य सुगंध भांडार’ नावाचं पुस्तकांचं दुकान होतं. तिथं मोठी इमारत उभी राहिली आणि पुस्तकांच्या सुगंधाचा दरवळ नाहीसा झाला. अलीकडे भानुविलास चौकात ज्येष्ठ मराठी साहित्यिक ग. ल. ठोकळ यांची ‘लेखन वाचन भांडार’ नावाची मोठी इमारत होती. ती पाडून तिथे रूपी बॅन्क उभी राहिली.
डेक्कनला गुडलक चौकाच्या अलीकडे ‘पाॅप्युलर बुक हाऊस’ नावाचं पुस्तकांचं मोठं दुकान होतं. काही वर्षांपूर्वी तेसुध्दा बंद झालं. नटराज टाॅकीजच्या इमारती पलीकडे ‘क्राॅसवर्ड’ नावाचं पुस्तकांचं भलं मोठं झालं होतं. सर्व विषयांची हजारों पुस्तकं तिथं पहायला मिळायची. मराठी चित्रपट ‘सातच्या आत घरात’चं तिथं आम्ही शुटींग केलं होतं. काही वर्षांतच ते बंद झालं आणि त्या ठिकाणी ब्रॅण्डेड कंपनीचं कपड्यांचं दुकान सुरू झालं.
कॅम्पमध्ये गेल्यानंतर एम जी रोडवरील ‘मॅनीज’नावाच्या पुस्तकांच्या दुकानाला भेट दिल्याशिवाय आम्ही कधी घरी परतलो नाही. हे दुकान म्हणजे अलीबाबाची गुहा होती. एकदा आतमध्ये गेल्यावर बाहेर पडायला दोन तास लागत असत. सर्व विषयांवरची हजारो पुस्तकं पाहून भान हरपून जात असे. तिथे हळू आवाजात संगीताची कॅसेट लावलेली असे. मालक काऊंटरवर बसलेला असे. तुम्ही पुस्तक चाळा, पहा, खरेदी करा अथवा करु नका, तो काहीही बोलत नसे. काही शंका असेल तर नम्रतेने तो निरसन करीत असे. त्या दुकानात गेल्यावर आपण परदेशात असल्यासारखे वाटायचे. आम्ही तिथे चित्रकलेवरील पुस्तक खरेदी केली होती. वीस वर्षांपूर्वी ते दुकान बंद झालं आणि कॅम्पात जाण्याचं आकर्षण संपलं.
हळूहळू पुण्यातील पुस्तकांची दुकानं हद्दपार झाली. लोकांची वाचनाची आवड रोडावली. पुस्तक घेऊन वाचणारा कोणी दिसला तर आपल्यालाच ‘काहीतरी वेगळं’ पहातोय असं वाटतं. या शब्दांच्या वाळवंटातील एकमेव मृगजळ म्हणजे डेक्कनवरील ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हीस’ हे दुकान, जे अजूनही चालू आहे. इथं बाबासाहेब आंबेडकर पुस्तक खरेदीसाठी येत असत. हे दुकान म्हणजे पुण्याचे ऐतिहासिक वैभव आहे.
पुस्तकांची दुकानं पूर्वीपेक्षा कमी झाली तरी वाचकांनी निराश होऊ नये. आता ई बुक पद्धतीने तुम्ही मोबाईलवरही, पीसीवर पुस्तकं वाचू शकता. वाचत रहा. तीच तुम्हाला शेवटपर्यंत आनंदच देतील. कुणाला समारंभात पुष्पगुच्छ देण्याऐवजी एखादं पुस्तक भेट द्या, पुष्पगुच्छ दोन दिवसांनी कोमेजून जाईल मात्र पुस्तक त्या वाचकाला ‘बहरुन’ टाकेल…
पुण्यात अप्पा बळवंत चौक म्हणजे सरस्वतीचं अधिष्ठान आहे. इथं जर एखादं हवं असलेलं पुस्तक मिळत नसेल तर ते अवघ्या जगातही कुठे मिळणार नाही! सर्व विषयांच्या, सर्व भाषेच्या पुस्तकांचं हेच खरं ‘माहेरघर’ आहे….
– सुरेश नावडकर १८-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply