तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे.
या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात)
वदनी कवळ घेता
नाम घ्या मातृभूचे l
सहज स्मरण होते
आपुल्या बांधवांचे l
कृषिवल कृषिकर्मी
राबती दिनरात l
श्रमिक श्रम करोनी
वस्तु त्या निर्मितात l
करुनी स्मरण तयांचे
अन्न सेवा खुशाल l
उदरभरण आहे
चित्त होण्या विशाल ll
किती अर्थपूर्ण आणि व्यावहारीक आहे ना.
आपण अनेक वेळा अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्र नुसते पोपट होऊन म्हणत असतो. त्यात नेमकं काय सांगितलंय, कोणासाठी सांगितलंय, काऽऽही लक्षातच घेत नाही.
भोजन करताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबर सामाजिक विचारही तेवढाच महत्वाचा आहे. जी स्पंदने ईश्वरापर्यंत पोचतात, तीच स्पंदने शेतकरीवर्गापर्यंत पण पोचतात.
आपण आहारातून घेत असलेल्या प्रत्येक कणामागे, ती जमिन नांगरणारा, तो कण पेरणारा, जमिनीला पाणी पुरवठा करणारा, उन्हात घाम गाळून त्याचे रक्षण करणारा, त्यांच्या वाढीमधे अडथळा निर्माण करणार्या तणाला दूर करणारा, त्याची योग्य वेळी कापणी करणारा, कचरा पाखड दूर करणारा, ते धान्य पोत्यात भरणारा, ते ओझे पाठीवरून वाहून नेणारा, चारचाकीने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहाणारा, दुकानामधे साठवून ठेवणारा, विक्री करणारा, आपल्या घरापर्यंत आणणारा, इ.इ. असंख्य लोकांचा सहभाग असतो. या सगळ्यांचे श्रम यामागे कारणीभूत असतात, तेव्हा तो दाणा आपल्या ताटात नंतर पोटात जात असतो. याचे भान प्रत्येक कणाला स्पर्श करताना व्हायला हवे.
एवढेच नव्हे तर ते अन्न आपणाला ज्या माऊलीने शिजवून, सुपाच्य होईल, असे बनवून सुग्रास वाढले आहे, तिच्याबद्दल आदर कधी व्यक्त करतो का ? ( मीठ कमी पडले असेल, किंवा जरा तिखट कमी जास्त झाले की फक्त तिच्या नावाचा अगदी गजर सुरू होतो.)
या सर्व लोकांचे ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यासमोर आणले की मग अन्नाची नासाडी केली जाणार नाही, ताटात वाया दवडले जाणार नाही. त्याची किंमत कळेल.
विशेषतः पुढील पिढीला अन्नाची किंमत कळायला हवी. ज्या पिढीसमोर पाश्चात्यांचाच आदर आहे, त्यांना अन्न निर्मितीची साखळी प्रत्येक घासाला आठवली पाहिजे. तिचे विस्मरण कदापि होता नये.
अन्नाची नासाडी करणे, केक, पिझ्झा एकमेकांवर फेकणे, हा फेकाफेकीचा संस्कार भारतीय नाही.
ओषधिभ्यो अन्नम्
अन्नात् पुरूषः
अन्नात् भूतानि जायन्ते
जातानि अन्नेन वर्धते
अन्नं भूतानां श्रेष्ठं
अन्नम् न निंद्यात
अन्नं ब्रह्म इति व्यजानात्
तैत्तिरीय उपनिषदामधे अन्नाचे आलेले हे वर्णन अन्नाचे सर्व महात्म्य सांगून जाते.
आहार हेच औषधस्वरूप आहे.
मनुष्यजन्मासाठी अन्नाच्या आधारेच आत्मा शरीरात प्रवेश करतो,
अन्य जीवांची उत्पत्तीदेखील अन्नामुळे होते.
समस्त जीवांचे पोषण अन्नानेच होत असते.
म्हणून सर्व सजीवात अन्न श्रेष्ठ आहे.
केवळ श्रेष्ठ नाही तर ते उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण आहे.अन्नच ब्रह्म आहे. त्याची कधीही निंदा करू नका.
अन्नाचा आदर ठेवा, अन्नाचा कणही वाया घालवू नका. म्हणूनच
गोपाळकाला झाल्यानंतर, काला खाल्ल्यावर हाताला लागलेले आपले उष्टे अन्नकण ( आणि त्यातून मिळणारे पुण्य, चोरून सुद्धा इंद्रादि देवांना मिळू नये म्हणून ) हात धुताना ते कण सुद्धा पाण्यात जाऊ नये. इतके हात चाटून पुसून स्वच्छ करा. असे सांगण्याचा प्रघात आहे.
किमान अन्नाची निंदा करू नका. पुढच्या वर्षी पर्यंत एवढी बुद्धी तरी दे, एवढे मागणे त्या बुद्धीदात्याकडे करायला हरकत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
06.09.2016
https://m.facebook.com/Edu1920Athome/photos/a.1510997589153930/1522346074685748/?type=3&sfnsn=wiwspwa
लेखाच्या सुरवातीचा श्लोकाची रचना माझ्या मामांनी कै रामचंद्र नामदेव इमानदार यांनी कथामालेच्या शिबिरात केली होती. याची कृपया नोंद घ्यावी.
——
कॅप्टन किरण कृष्णाजी जोशी, पुणे(७८७५९५८७५७)