नवीन लेखन...

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग २

दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ ही ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून लिहिलेल्या लेखाचा हा पुढील भाग.

संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने या विषयाची चर्चा करू या.

पैलू दुसरा : संस्कृती, वाङ्मय, इतिहास :

संस्कृती, वाङ्मय व इतिहास हे, आपल्या चर्चेच्या अनुषंगाने, परस्परसंबंधी (interdependent) आहेत.

१) आपल्याला रामायण, महाभारत अशा ग्रंथांमधून रावणवध, शिशुपालवध, अशा प्रकारचे शब्द आढळतात. राम व कृष्ण यांना अवतारी पुरुष मानल्यामुळे, आणि, रावण, शिशुपाल इत्यादी जन हे ‘व्हिलन’ (किंवा व्हिलनिश) होते, असे दाखविलेले असल्याने आपला असा समज होतो की, ‘वध’ हा फक्त खलांचाच होतो.

पुढील विश्लेषणापूर्वी हे स्पष्ट केलेले बरे की, श्रीराम व श्रीकृष्ण यांचा कुठल्याही प्रकारे अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाहीं. ते वंद्य आहेत, हे मान्य. (त्यांना अवतारत्व हे, त्यांच्या स्वत:च्या खूप-नंतरच्या काळात दिले गेले. म्हणजेच, ते महापुरुष होते, पण मानवच होते ). पण, ते महामानव होते याचा अर्थ असा नाहीं की त्यांचे प्रत्येक कृत्य योग्यच होते. किंबहुना, त्यांच्या काळी ते कृत्य योग्य मानले गेले असेलही; पण आज त्याचे विष्लेषण करतांना आपल्याला सद्य परिस्थितीनुसार त्याचा वेगळा संदर्भ दिसतो, भिन्न अर्थ लागतो.

( हें स्पष्टीकरण हेतुत: देण्याचे कारण असे आहे की, ‘मूळ चर्चा बाजूला पडून दुसर्‍याच विषयावरील भावनिक उच्चारव टळावा’ ).

२) रावण, शिशुपालादि वस्तुत: खल होते की नाहीं, ही बाब प्रथमत: गैरलागू आहे. ते, या ग्रंथांच्या सांप्रत उपलब्ध आवृत्यांमध्ये ‘खल’, व्हिलन, दाखविलेले आहेत. या ग्रथांच्या मूळ आवृत्या, या सध्या उपलब्ध असलेल्या आवृत्यांहून शेकडो वर्षे आधीच्या होत्या असणार.

तेव्हा, त्या मूळ स्वरूपातील ग्रंथामध्ये, रावण शिशुपालादि लोक तसेच ( खल) दाखवलेले होते काय, हा प्रश्नच आहे. हा मुद्दा, म्हणजे काळाचा संदर्भ, आपण ध्यानात ठेवायला हवा.

३) पुढे जाण्यापूर्वी, हें ध्यानात घ्यायला हवे की, ‘खून‘ हा शब्द भारतात, व पर्यायानें मराठी, हिंदी इत्यादी ‘आधुनिककालीन’ भाषांमध्ये मध्ययुगात आला. तेव्हा, प्रश्न असा उठतो की, त्याआधी कुठला शब्द वापरला जात असेल ? तर, त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, अर्थातच, पुरातन संस्कृत ग्रंथामध्ये तर संस्कृत शब्दच असणार ; आणि ‘आधुनिक’ भारतीय भाषांमध्येही तेव्हा, संस्कृत किंवा संस्कृतोद्भव (तत्सम अथवा तद्भव) शब्दच वापरला जात होते.

४) आपण ज़रा वेळ रावण, शिशुपाल यांना बाजूला ठेवू. त्यांच्याकडे नंतर वळायचे आहेच. आधी ज़रा दुसरी काही उदाहरणे पाहू या.
४.१. रामानें सुग्रीवाचा ज्येष्ठ भाऊ बाली याचा वध केला. असे पहा, रामाची आणि बालीची आधी ओळखच नव्हती. सीताहरण झाल्यानंतर राम-लक्ष्मण तिचा शोध घेत-घेत दंडकारण्यात आले, तेव्हा पंपा सरोवर भागात त्यांना मारुती भेटला ; त्यानें सुग्रीव व बाली यांच्यामधील परिस्थिती वर्णन केली, व सुग्रीवाला सहाय्य करण्याची रामाला विनंती केली. बाली काही व्हिलन नव्हता, तो ‘वा-नरां‘चा बलशाली राजा होता, सुद्रीव हा त्याचा धाकटा भाऊ होता.

एका द्वंद्व / युद्धातून जेव्हा तो काही काळ परत आला नाही, तेव्हा तो मेला आहे असे समजून त्याचा कनिष्ठ भाऊ सुग्रीव राजा बनला व बालीच्या पत्नीलाही त्यानें तत्कालीन प्रथेनुसार आपली पत्नी बनवले. ( असेंही वाचनात आलेलें आहे की, बाली परत येऊं नये म्हणून, ज्या गुहेत बाली व त्याचा प्रतिद्वंद्वी यांचें द्वंद्व / युद्ध चाललें होते, त्या गुहेच्या मुखावर सुग्रीवानें अन्य वानराच्या – मारुतीच्या – मदतीनें, शिळा बसवली. तसें असेल तर, बाली परतूं नये, असाच सुग्रीवाचा उद्देश होता ; आणि मग, villan कोण, याचें उत्तर स्पष्ट आहे ! ).

परंतु, त्यानंतर काही काळाने बाली परतला. आपले राज्य व पत्नी यांचा सुग्रीवाने अपहार केला असे दिसून आल्यानें, त्यानें सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिले व स्वत:चे राज्य पुन्हा ग्रहण केले.

नंतर, बाली व सुग्रीव यांच्या द्वंद्वाच्यावेळी, कुठला सुग्रीव हे ओळखता यावे म्हणून रामाने तसुग्रीवाला एक पुष्पहार परिधान करायला सांगितले होते. यावरूनही, राम बालीला ओळखत नव्हता हेच सिद्ध होते.

आता सांगा, कुठल्या तर्काने बालीला व्हिलन म्हणता येईल ? आणि, समजा तसे असते, तर मग, लपून, झाडाच्या मागून बाण मारून बालीवध करायची रामाला काय आवश्यकता होती ? याचे कारण स्पष्ट आहे की, रामानें अनोळखी बालीची, स्वत:शी-संबंधित असे कुठलेही कारण नसतांना, हत्या करणें, हे न्यायसंगतच नव्हते. बालीला मारणें ही रामाची राजकीय गरज होती. म्हणजेच, ज्याचा वध झाला , तो बाली ‘खल’ नव्हता.

( गीत रामायणामधील यासंबंधीचे गदिमांचे शब्द पहा : ‘बालीवध ना , खल-निर्दाळण’. यातून स्पष्ट ध्वनित होते की, वध हा खलाचाच होतो, असे नाहीं. नाहींतर गदिमा म्हणाले नसते कां, की ‘बालीवधची खल-निर्दाळण’? आपण गदिमांच्या रचनेत फक्त विरामचिन्हाचा बदल करून, असे म्हणू या की – ‘बालीवध ; ना खल-निर्दाळण’. )

४.२. याच प्रभू रामचंद्रानें शंबर याचाही वध केलेला आहे, त्याचे कारण काय तर, जन्मवर्णाने अपात्र असूनही शंबर वेदाध्ययन करत होता. त्याला खरे तर, ऋषीमुनींसमानच मानायला हवे! पुढील स्पष्टीकरणाची खरे तर गरजच नाही. म्हणजेच, हा वधही ‘खला’ची हत्या नव्हेच.

४.३. कृष्णाने भीमाकरवी जरासंध याचा वध करविला. जरासंध काही व्हिलन नव्हता. तो होता मगधाचा राजा . आणि त्याने एवढा fair-play केला की, ‘मी-अर्जुन-भीम यांच्यापैकी तू कोणाशीही मल्लयुद्ध कर’, असे श्रीकृष्णाने सांगूनही, जरासंधाने स्वत:ला तुल्यबळ अशा भीमाची निवड केली. त्याने द्वंद्वासाठी कृष्ण किंना अर्जुन यांची निवड केली असती, तर काय झाले असते, याची कल्पना करावी. जरासंध खल नव्हता, त्याचा वध वध राजकीयच होता.

५) रावण व शिशुपाल यांच्याकडे नजर टाकण्यापूर्वी, प्रथम हें ध्यानात घ्यायला हवे की –

* मूळ-रचलेल्या ग्रंथामध्ये बर्‍याच-नंतरच्या काळात पुराणिकांनी हवी-तशी भर घातलेली आहे, आणि हीरोच्या प्रत्येक विरोधकाला व्हिलन बनवलेले आहे. (अर्थातच, त्यामुळे कथानकाची नाटकीयता वाढते; आणि पुराणिकांना निरूपण-कीर्तनाच्यावेळी त्या नाटकीयतेचा नक्कीच उपयोग होत असणार) .

* हे सांगायला नकोच की, नायकाचे (हीरोचे) महत्व अधोरेखित होते, वाढते, तें व्हिलनमुळे.
हीरो-अँटीहीरो, नायक-खलनायक अशा जोड्या सर्वच वाङ्मयात सापडतातात. जैन परंपरेतही वासुदेव-प्रतिवासुदेव आहेत. बौद्ध साहित्यात, बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीचा, गौतम व मार यांचा संघर्ष उल्लेखलेला आहे. ख्रिस्चॅनिटीसुद्धा Christ-Antichrist मानते. मध्ययुगीन भविष्यवेत्ता नोस्ट्रॅडेमस यानेही Christ-Antichrist या जोडीचा उल्लेख केलेला आहे. ईश्वर आणि सैतान ही जोडीही प्रसिद्ध आहेच.

५.१ रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. असा माणूस सच्चरित्र असावा अशी अपेक्षा असते. तो एकदम व्हिलन कसा झाला ? आणि, तसा तो असता, तर मग सीतेला अनेक महिने अशोकवनात ठेवायची आवश्यकताच काय ? तो सहज सीतेला आपली पत्नी बनवू शकला असाता, अगदी तिच्या इच्छेविरुद्धही. किंवा, ( आणि, हें लिहायलाही माझ्या मनाला त्रास होतो आहे, की ) रावण सीतेला पत्नी न बनवताही जबरदस्तीने तिचे स्त्रीत्व ‘लुटू’ शकला असता. पण, रावणाने तसे केले नाही ! आपल्याला पती म्हणून स्वीकारण्याची तो सीतेला विनंती करत राहिला, आणि त्याने तिच्या अंगाला हातही लावला नाहीं. अशा माणसाला व्हिलन म्हणता येईल कां? सीता-हरणाला व राम-रावणाचे युद्ध यालाही तत्कालीन राजकीय पदर होते.

५.२. शिशुपालानें राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायला विरोध केलेला होता. इरावती कर्वे यांनी स्पष्ट केलेले आहे की, कृष्ण तसेच शिशुपाल या दोघांनाही ‘वासुदेव’ व्हायचे होते ( इथे, वासुदेव म्हणजे ‘वसुदेवाचा पुत्र’ असा अर्थ अभिप्रेत नाहीं, तर ‘वासुदेवपण’ ही एक तत्कालीन महत्वाची उपाधि होती, त्यात राजकीय संदर्भ, राजकीय व सांस्कृतिक शक्ती, असा अर्थ भरलेला होता. म्हणजेच, शिशुपाल काही व्हिलन नव्हता, तर तो वासुदेवत्वासाठी श्रीकृष्णाचा प्रतिस्पर्धी होता. म्हणून त्याने राजसूय यज्ञाच्या वेळी हरकत घेतली ; आणि संधीचा फायदा घेऊन कृणानें त्याचा वधच करून टाकला. कृष्णाने शिशुपालाचा असाअचानक वध केलेला पाहून सगळे आश्चर्यचकित आले होते. म्हणजेच, ती कृती अगदी sudden होती, व ती कितपत योग्य होती याबद्दल उपस्थित जनांच्या मनात संदेह होता.

६) अशी अनेक उदाहरणे देता देतील. उदा. भीष्मवध, द्रोणवध इत्यादी. भीष्म व द्रोण हे दोघेही कुठल्याही व्याख्येनुसार खल ठरत नाहीत. उलट, दोघांचाही वध कपटाने केला गेला. घटोत्कचाचेंही पहा. तो वीर योद्धा होता. तो खल कसा ? तसेच कर्णवध, दुर्योधनवध यांचेही आहे. दोघांनाही तत्कालीन युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन मारले. ते खल होते काय ? त्यांना पुराणिकांनी खल बनविले आहे. ‘सुयोधन’ याचा उल्लेख कथेमध्ये ‘दुर्योधन’ असा करणे, हेही सूत-पुराणिकांचेच काम. (दुर्योधनाचा उल्लेख पुढेही आहे).

७) हे महाभारतातील आणखी काही उल्लेख :

* कर्णानें कुंतीला वचन दिले होते की मी अर्जुनाव्यतिरिक्त कुठल्याही पांडवाचा वध करणार नाही.
* कुरुक्षेत्रयुद्धाआधी भीष्माने दुर्योधनाला सांगितऋले होते की मी कुठल्याही पांडवाचा वध करणार नाहीं.

या दोन्हींतील ‘वध’ शब्दावर टिप्पणी करायची आवश्यकताच नाही, कारण पांडव तर महाभारतातील ‘हीरो’च आहेत.

८) वस्तुत: कौरव-पांडव युद्ध हें, ‘राज्यावर खरा अधिकार कोणाचा’ या मुद्द्यावरून, चुलत बंधूमध्ये लढले गेलेले युद्ध आहे. (मी कौरवांचा पक्षपाती नाही, पण,) दुर्योधनाचे लॉजिक अयोग्य कसे? तो तर मोठ्या भावाचा मोठा मुलगा होता. युद्धात, पांडवांकडे सात अक्षहौणी तर कौरवांकडे अकरा अक्षहौणी, म्हणजे जवळजवळ दीडपट सेना होती. याचाच अर्थ असा की, त्याकाळातील आर्यावर्तामधील बर्‍याच नृपांना दुर्योधनाचा राज्यावरीळ हक्क योग्य वाटत होता. भीष्म पितामह, गुरु द्रोण, कृपाचार्य , हे खाल्या मिठाला जागले म्हणून नव्हे, तर न्यायाच्या दृष्टीने योग्य वाटले म्हणूनच, पांडवांबद्दल सहानुभूती असूनही, कौरवांच्या बाजूने लढले. कारण, ती बाजू त्यांना अधिक न्याय्य वाटली होती असणार. बलरामालाही हे युद्ध अयोग्यच वाटत होते, म्हणून तर तो तीर्थयात्रेला निघून गेला.
म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, ‘राज्यावर अधिकार कोणाचा’ याविषयीच्या युद्धाला विनाकारण, उगाचच ‘सुष्ट विरुद्ध दुष्ट’ असा रंग दिला गेला.

* सध्याचे महाभारत व्यासशिष्य वैशंपायन याचें आहे व त्याने ते जनमेजयाला यज्ञाच्या वेळी कथन केले होते. त्यात पुढे सूतांनी भर घातली. व्यासांच्या विभिन्न शिष्यांनी व्यासांच्या ‘जय’ या मूळ रचनेवर आधारित वेगवेगळी महाभारतें लिहिली होती असे म्हणतात. ‘जय’ कथेची एक विस्तारित-रचना व्यासशिष्य जैमिनीने केली होती, व त्यात त्याने कौरवांच्या बाजूने लिहिले होते.( म्हणजेच, ते पर्यायी ‘महाभारत’ होते ). अर्थातच, आता त्याची प्रत उपलब्ध नाहीं. कशी असेल? पण ती उपलब्ध असती, तर जैमिनीने या वधांबद्दल काय लिहिले असते, याची कल्पना करणें अवघड नाही.

(तशा प्रकारचें पुस्तक काही दशकांपूर्वी श्री. आनंद साधले यांनी लिहिलेले आहे, ते वाचून जिज्ञासूंना थोडीशी कल्पना येईल) .

९) असुर :

आता आपण ज़रा वैदिक साहित्यावरही नजर टाकू या. इंद्राने असुरांचा वध केल्याचे उल्लेख वेदांमध्ये आहेत. जसें, वृत्रासुर, त्रिपुरासुर इ. असुर हे खल होते काय ? ते चांगले प्रगत, सुधारलेले होते. त्रिपुरासुराची तर तीन पुरे होती. (महाभारतकाळीही असुर दिसतात. बाणासुराची कन्या उषा ही, श्रीकृष्णाचा पौत्र अनिरुद्ध याच्याशी विवाहबद्ध झालेली होती. असुर प्रगत नसते तर, असे संबंध यादवांना मान्य होऊ शकले असते काय?).

मुख्य गोष्ट ही की, ऋग्वेदकाळी, ‘देव’ आणि ‘असुर’ या दोन जमातींमध्ये, दोन टोळ्यांमध्ये, दोन संस्कृतींमध्ये, संघर्ष झाला. ( भारतीय ‘आर्य’ हे मूळ भारतातीलच आहेत, की कुठून बाहेरून आले, या वादात तूर्तास आपण शिरण्याचे कारण नाही). मात्र, देव व असुर यांचा संघर्ष झाला याचा अर्थ असा मात्र नाहीं की वध केले गेलेले असुर ‘खल’ होते.

‘देव’ सुष्ट’ होते असे म्हटले की मग, त्यांचे शत्रू जे असुर हे ‘दुष्ट’च असायला हवेत, अशी एक धारणा आहे. पण, ते दुष्ट असते तर मग, अनेकदा त्यांनी तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले, व देवाधिदेव ‘महादेवा’ने त्याना वर दिले, हे कसे ?

आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी , आणि ती ही की : ‘कोण चांगला व कोण वाईट’, हे अनेकदा बघणार्‍याच्या दृष्टिकोनावर, तो कोणाच्या पक्षाचा आहे यावरही, अवलंबून असते. (ही बाब, आपण जेव्हा या चर्चेचा समारोप करू, तेव्हाही ध्यानात घ्यावी).
ऋग्वेदाने, देवांना ‘चांगले’ व असुरांना ’वाईट’ ठरवले. पारशी जमातीचा ‘अवेस्ता’ हा ग्रंथही खूपच पुरातन आहे. ऋग्वेद व अवेस्ता यांच्यात भाषिक साम्यही बरेच आहे. मात्र, अवेस्ताच्या ‘पुरातन-पर्शियन’ भाषेत, ‘देव’ याचा अर्थ ‘चोर’ असा होतो. तसेच, पारशांचा परम-ईश्वर (biggest deity) आहे ‘अहुर मज्द’. ऋग्वेदीय ’स‘चा पुरातन-पर्शियन मध्ये ‘ह’ होतो. जसें, सोम – होम , सिंधु – हिंदु . म्हणजेच, पर्शियनमधील ‘अहुर’ हा, ऋग्वेदीय ‘असुर’ आहे. याचाच अर्थ असा की पुरातन-पर्शियन सर्वश्रेष्ठ deity ‘असुर’ ही आहे. मग, त्यांनी देवांना चोर म्हटले, यात काय आश्चर्य ?

तेव्हा, सुष्ट-दुष्ट, चांगला-वाईट, हीरो-व्हिलन, अशी विभागणी करतांना आपण सावध असायला हवे. मात्र, एक गोष्ट असुरांच्या उदाहरणावरूनही स्पष्ट होते, की, ज्या व्यक्तीचा ‘वध’ होतो, ती व्यक्ती ‘दुष्ट’च असते, असे अजिबात नाही.

१०) चक्रधरस्वामी व श्रीबसवेश्वर हे दोघेही संतच. पण, चक्रधरांच्या बाबतीत, हेमाद्री पंडितानें त्यांचा वध करविला/हत्या करविली, असा शब्दप्रयोग माझ्या पाहण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, शिष्यांच्या चुकांचे फळ बसवेश्वरांना भोगावे लागले व त्यांचा वध झाला / हत्या झाली, अशा अर्थाचा उल्लेख मी वाचलेला आहे. (हे उल्लेख असलेल्या पुस्तकांचे संदर्भ तूर्तास, readily माझ्या हाताशी उपलब्ध नाहीत. मात्र, त्यांचा ‘खून’ झाला’ असा उल्लेख नक्कीच झालेला नाहीं, हे निश्चित). आपला मुद्दा स्पष्ट आहे.

११) औरंगज़ेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह हा अतिशय सज्जन होता. त्याला हिंदू धर्माबद्दल आस्था होती. त्याने काही हिंदू ग्रंथांचे फारसीत भाषांतर केले होते अथवा करवून घेतले होते. आपण तूर्तास इथे, हिंदू, मुस्लिम असा धर्मविचार करत नाहीं आहोत; पण असे म्हणायला काहीच हरकत नाहीं की दारा तत्कालीन ‘धर्मसमभाव’ पाळत होता. दारा हा शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र होता, म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार, राज्यावरही त्याचाच हक्क होता. औरंगज़ेबाने शहाजहानविरुद्ध बंड केले, तेव्हा दारा त्याच्याशी शहाजहानचा प्रतिनिधी म्हणून लढला. अशा सत्प्रवृत्त दाराला औरंगज़ेबानें मौलवींकरवी दोषी ठरविले व त्याला मारविले, अगदी ऑफिशियली. आतां तुम्ही सांगा, याला दाराचा वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, खून म्हणायचे, सजा म्हणायचे की काय म्हणायचे ?

१२) येशू ख्रिस्त याच्या मृत्यूला काय म्हणायचे ? (त्याचे ‘रिसरेक्शन’ झाले की नाही, या मुद्द्याने, आपल्या चर्चेत व निष्कर्षात काही फरक पडत नाही). ध्यानात घ्या, येशूला व ख्रिश्चन धर्माला महत्व आले तें इ.स. ३५० नंतरच. येशूच्या स्वत:च्या वेळी तर, त्याला बंडखोरच मानले गेले, व तत्कालीन कायद्यानुसार त्याला क्रूसावर चढवले. आणि, त्याचवेळी, त्याच्याचबरोबर, दोन चोरांनाही क्रूसावर चढवले होते. आता सांगा, येशूला ‘क्रूसावर चढविण्या’च्या कृतीला, आपण वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, शिक्षा (सजा) म्हणायचें की खून म्हणायचे ?

समारोप :

आपण हे पाहिले की ‘वध’ व ‘खून’ (तसेच , ‘हत्या’) हे अनेकांशी समानार्थी शब्द आहेत. हिंदुमहासभा, आर्. एस्. एस्. वगैरे संस्था ‘वध’ हा शब्द वापरतात, कारण त्यांना संस्कृत शब्दांबद्दल, व त्यांच्याशी संबंधित संस्कृतीबद्दल, आपुलकी वाटते, आणि तसे शब्द वापरायचा त्यांचा आग्रह असतो. उदा. ‘जामीन‘ या रूढ शब्दाऐवजी ‘प्रतिभू’ या शब्दाचा वापर. (अर्थात्, अशा वापरात अयोग्य, किंवा चुकीचा-अर्थ directly or indirectly रूढ करण्याचा हेतू , असे काही दिसत तरी नाही. असा, संस्कृत शब्दांचा वापर योग्य आहे कां, किंवा तो अतिरिक्त आहे का, अथवा तो कितपत, कुठल्या level पर्यंत, योग्य आहे, हा एका वेगळ्या चर्चेचा विषय होईल. तूर्तास आपण त्यात शिरायचे कारण नाही.)

मात्र, गांधीजींचा ‘वध’ की ‘खून’ हा शब्दांचा काथ्याकूट आवश्यक नाहीच. या विषयाला खासकरून लागलेल्या राजकीय वळणामुळे उगीचच घोळ घातला गेलेला आहे, या शब्दाच्छलाला उगीचच अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे. सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.

(१३ मार्च, २०१६)

– सुभाष स. नाईक .
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

1 Comment on वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग २

  1. जर मुसलमान देश विरोधी कारवाया करत असताना,त्यांच्या समर्थनार्थ महात्माजीचे उपोषण, हे पण त्यांचे कृत्यहि राष्ट्रद्रोही कृत्यच ठरते.हेच जर का एखाद्या सामान्य नागरिकांना केले असते तर तो राष्ट्रद्रोही ठरवला गेला असता. मग महात्माजी वेगळा न्यायका? तो देणे, राष्ट्रास घातक ठरेल. गोडसेनी कायदा हातात घेणे हे अयोग्य आहे. गुन्हाही आहे. पण गांधीचे मुस्लीम तुष्टीकरणाचे काम थांबविण्यासाठी, ना सरकार क्रियाशील होते, ना काँग्रेस तयार होती.त्यामुळेच हा वधच आहे हत्या नव्हे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..