नवीन लेखन...

बडोदा वस्तूसंग्रहालय

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती.

ब्रिटिश भारतात सर विल्यम जोन्स यांच्या प्रयत्नांमुळे १७८४ मध्ये बंगाल येथे पुरातत्त्वीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने १८१४ ला मानववंशशास्त्र, भूस्तरशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र इ. चा अंतर्भाव असणाऱ्या वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली. भारतातील सार्वजनिक वस्तूसंग्रहालयांच्या स्थापनेची ही सुरुवात मानली जाते. १८५१ मध्ये मद्रास येथे दुसऱ्या वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली. याचवर्षी कलकत्ता येथे ‘व्हिक्टोरिया म्युझियम’ व ‘अल्बट’ ही दोन संग्रहालये सुरु झाली. पुण्यामध्ये १८९० मध्ये ‘लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम’ स्थापन करण्यात आले. याचेच पुढे १९६८ मध्ये ‘महात्मा फुले वस्तुसंग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले. १९२२ मध्ये मुंबईत ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ वस्तूसंग्रहालय उभारण्यात आले. हे वस्तूसंग्रहालय सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ या नावाने ओळखले जाते. १९२७ पर्यंत मोहेंजोदडो, हडप्पा व तक्षशिला येथे विविध वस्तूसंग्रहालये सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बडोदा संस्थानात १ जून १८९४ रोजी सयाजीराव महाराजांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या बडोदा वस्तूसंग्रहालयाची ओळख करून घेणे उद्बोधक ठरेल.

महाराजा सयाजीरावांनी मुख्यत: आरोग्यस्वास्थासाठी १८८७ ते १९३९ अखेर २६ वेळा परदेश दौरे केले. यापैकी बहुतांश वेळा युरोपीय देशांमध्ये हा प्रवास घडून आला. या दौऱ्यांदरम्यान तेथील वास्तूंचे, ठिकाणांचे चिकित्सक निरीक्षण सयाजीराव करत. तसेच युरोपियन जीवनशैली आणि भारतीय जीवनशैली यातील साम्य आणि भेद यांचा तुलनात्मक अभ्यास करत. जगातील सर्वोत्तम सुविधा आपल्या संस्थानातील प्रजेला मिळाव्यात यासाठी सयाजीराव महाराज आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. आपल्या परदेश प्रवासाबद्दल सयाजीराव महाराज म्हणतात, “परदेश पर्यटन करणे हे ज्ञानाचे मुख्य साधन आहे, हे मला पहिल्या विलायत प्रवासाने उमजले. यापुढे जगभर प्रवास करायचा, जगात जे जे चांगलं आहे ते माझ्या बडोद्यांसाठी आणायचे मी ठरविले आहे.” प्रकृती स्वास्थ्यासाठी परदेश दौरे करताना सयाजीरावांनी अंगीकारलेले हे ‘तत्त्वज्ञान’ बडोद्याला सर्वाधिक ‘उपकारक’ ठरले.

बडोद्याच्या वस्तूसंग्रहालयाच्या वाटचालीत सयाजीराव महाराजांच्या या परदेश दौऱ्यांनी बजावलेली क्रांतिकारक भूमिका सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. १८८७-८८ दरम्यानच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर असताना सयाजीरावांनी बडोद्यात वस्तूसंग्रहालय स्थापन करण्याचा आदेश दिला. आपल्या आयुष्यभरातील विविध परदेश दौऱ्यात सयाजीरावांनी विविध वस्तूसंग्रहालये पाहिली. १६ व्या परदेश दौऱ्यादरम्यान जून १९२६ मध्ये फ्रान्सच्या व्हिएन्ना येथील फाईन आर्ट संग्रहालयाला भेट दिली. तर २२ ऑगस्ट १९२६ रोजी स्वीडनमधील स्टॉकहॉम येथील काही संग्रहालयांना महाराजांनी भेट दिली. ५ दिवसानंतर २७ ऑगस्ट रोजी महाराजांनी कोलेनबर्ग येथील प्रसिद्ध कलादालन पाहिले. १९ व्या परदेश प्रवासात २२ जुलै १९३० रोजी सयाजीरावांनी जर्मनीच्या श्रामबर्ग या बुगेनबर्ग राज्याच्या राजधानीला भेट दिली. या वेळी महाराजांनी श्रामबर्ग येथील वस्तूसंग्रहालयास भेट दिली. १७ व्या शतकात बुगेनबर्गच्या राजाने मुरीश शैलीत बांधलेल्या राजवाड्याचे या वस्तू संग्रहालयात रुपांतर करण्यात आले होते.

२० व्या परदेश प्रवासात सप्टेंबर १९३० मध्ये सयाजीराव महाराज आणि महाराणी चिमणाबाईंनी जर्मनीमध्ये पोटसडॅम, चार्लटनबुर्ग आणि बर्लिनमधील अनेक वस्तूसंग्रहालयांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये सयाजीरावांनी बडोदा वस्तूसंग्रहालयासाठी फर्निचर आणि अनेक नाविण्यपूर्ण वस्तूंची खरेदी केली. विशेष बाब म्हणजे या परदेश दौऱ्यावरून महाराज परतण्यापूर्वीच सदर वस्तू बडोदा वस्तूसंग्रहालयात पोहोचल्या होत्या. याचवेळी महाराजांनी बडोदा वस्तूसंग्रहालयासाठी ‘हेस अँड रॉम’ या प्रसिद्ध संस्थेला पेर्मागॉन अल्टारच्या एका प्रतिकृतीची ऑर्डर दिली. २२ व्या परदेश दौऱ्यात १० ऑक्टोबर १९३३ रोजी सयाजीरावांनी शांघाय येथे श्री. केंद आणि श्री. रिच यांच्याबरोबर चीनसंदर्भातील विविध संग्राह्य वस्तूंची खरेदी केली. या वस्तू बडोद्याच्या वस्तूसंग्रहालयासाठी खरेदी करण्यात आल्या होत्या. खरेदीनंतर या वस्तू थेट बडोद्याला पाठवण्यात आल्या.

२३ व्या परदेश वारीत २३ एप्रिल १९३४ रोजी सयाजीराव महाराजांनी इटली येथील दोन वस्तूसंग्रहालयांना भेट दिली. तर दोन दिवसानंतर २५ एप्रिल रोजी महाराज इटलीच्या राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयाला भेट देण्यास गेले. मे १९३४ मध्ये फ्लोरेन्स येथील मुक्कामादरम्यान सयाजीरावांनी शहरातील सर्व वस्तूसंग्रहालये आणि चित्र प्रदर्शनांना उपस्थिती लावली. २० जून १९३४ रोजी पॅरिस येथील लौर संग्रहालयाला सयाजीरावांनी श्री. सेठना यांच्यासह भेट दिली. याच परदेश दौऱ्यात २७ ऑक्टोबर १९३४ रोजी न्यूयॉर्क येथील मि. कार्टियर यांच्या दुकानास भेट दिली. यावेळी मि. कार्टियर यांनी आपल्या वैयक्तिक संग्रहातील विविध आकर्षक व मौल्यवान खडे सयाजीरावांना दाखवले. तर याच दिवशी संध्याकाळी महाराजांनी न्यूयॉर्क येथील भव्य कलादालनाला भेट दिली. यावेळी श्री. विन्लॉक यांनी सयाजीरावांना इजिप्तच्या संग्रहालयातील भाग दाखवला.

२३ फेब्रुवारी १९३५ रोजी सयाजीराव महाराजांनी इजिप्तच्या पुराण वस्तूसंग्रहालयाला भेट देवून सुमारे दीड तास पाहणी केली. यावेळी संग्रहालयाच्या प्रमुखांकडून महाराजांचे स्वागत करण्यात आले. याच परदेश प्रवासात लंडन येथे २१ जून १९३५ रोजी सकाळी ११ वाजता श्री. स्पीलमन यांनी महाराजांची भेट घेतली. या भेटीत बडोदा येथे तयार होणाऱ्या मूर्ती संग्रहालयासाठी युरोपियन संग्रहालयातून न्यावयाच्या महत्वाच्या मूर्त्यांच्या प्लास्टर प्रक्रियेबद्दल स्पीलमन यांनी सयाजीरावांशी चर्चा केली.

२५ व्या परदेश प्रवासात २८ ऑगस्ट १९३७ रोजी सयाजीरावांनी बर्गन या नॉर्वेतील दुसऱ्या क्रमाकांच्या शहरातील वस्तू संग्रहालयाला भेट दिली. यावेळी वस्तूसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. बाय यांनी स्वतः महाराजांना संपूर्ण संग्रहालय फिरून दाखवले. विशेष बाब म्हणजे अधिकारी वर्गाने त्या दिवशी केवळ सयाजीरावांसाठी वस्तूसंग्रहालय उघडले होते. हे वस्तूसंग्रहालय पाहून खुश झालेल्या सयाजीराव महाराजांनी ‘याच धर्तीवर बडोद्यात वस्तू संग्रहालय उभारणे आवश्यक असल्या’ची भावना व्यक्त केली. शेवटच्या परदेश प्रवासात ऑक्टोबर १९३८ मध्ये सयाजीरावांनी नीस येथील मिष्टन चित्र प्रदर्शनाला दोन वेळा भेट दिली. या चित्रप्रदर्शनात सयाजीरावांनी बडोद्याच्या वस्तूसंग्रहालयासाठी डी कुपेल आणि डी विट्ट या सुप्रसिध्द चित्रकारांची चित्रे विकत घेतली.

सयाजीरावांच्या या जगप्रवासाबरोबरच बडोद्याचे वस्तूसंग्रहालय ‘विकसित’ होत गेले. १८९३ साली स्पेनमधील सेव्हिला शहराला महाराजांनी भेट दिली. या दौऱ्यावेळी महाराजांनी ‘म्यूझिओ प्रोव्हिंशिअल दे बेल आर्टस’ हे आकर्षक चित्रांचे दालन आणि पुराणवस्तूंचे वस्तुसंग्रहालय पाहिले. तत्पूर्वीच १८९० पासून बडोद्याच्या वस्तू संग्रहालयाच्या इमारतीचा पाया घालण्यात आला होता. यासाठी महाराजांनी स्पीलमन या युरोपियन तज्ञाची नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युरोपियन चित्रकारांची चित्रे खरेदी करून सयाजीरावांनी बडोद्यास आणली. ही चित्रे प्रथम बडोद्याच्या श्वेतमंदिरात ठेवली होती. १ जून १८९४ रोजी सयाजीबागेतील बडोदा वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन सयाजीराव महाराजांच्या हस्ते करण्यात केले. या वस्तूसंग्रहालयाच्या बांधकामासाठी ५ लाख ८७ हजार ५८८ रु. इतका खर्च करण्यात आला.

सयाजीरावांनी या वस्तूसंग्रहालयाच्या इमारतीचे आर्किटेक्ट म्हणून मेजर माँट आणि आर. एफ चिझम यांची नियुक्ती केली. वस्तूसंग्रहालयाची इमारत इंडो-सार्सेनिक शैलीत बांधण्यात आली. मराठा वास्तुकलेची काही वैशिष्ट्येदेखील या इमारतीमध्ये समाविष्ट केली आहेत. सयाजीरावांनी खासगी निधीतून काही वस्तू खरेदी करून या संग्रहालयास भेट दिल्या. महाराजांनी भेट दिलेल्या या वस्तूंच्या नोंदी तेथील रेकॉर्ड बुकमध्ये “माननीय राजसाहेबांकडून भेट” असा उल्लेख करून आजही जतन करण्यात आल्या आहेत. या दोन मजली वस्तूसंग्रहालयाची रचना १५० फूट लांब आणि ४० फूट रुंद आहे. संग्रहालयाच्या दक्षिणेकडील बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे. हे संग्रहालय मुख्य हॉलमध्ये दोन स्तरांवर आहे. दुसरा स्तर हा गॅलरीवजा आहे. तसेच या इमारतीला तळघर असून त्यात एका महाकाय अशा निळ्या व्हेल माशाचा सांगाडा प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे.

देशी कलाकृतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराजांनी १९१४ मध्ये फणींद्रनाथ बोस या बंगाली कारागिरास बडोद्यात बोलावून लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बागेकरिता आठ व बडोदे संग्रहालयाकरिता दोन शिल्पे तयार करण्याचे आदेश दिले. बोसकृत बडोद्यातील कांस्यशिल्पे, विशेषतः ‘बाय विथ या फाल्कन’, ‘हंटर’, ‘पनिहारी’ आणि ‘ऑन द वे टू टेम्पल’ या कलाकृती युरोपियन अकॅडमिक शैलीवरचे प्रभाव दर्शवतात. अशी शिल्पे बडोदा वस्तूसंग्रहालयात आणि महाराजा फत्तेहसिंह संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

१९१५-१६ मध्ये या संग्रहालयात पाटण येथील कुंभारकाम, संखेडा लाकडी काम, कोरीव काम इ. चा समावेश करण्यात आला. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू या संग्रहालयात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या कलाकारांच्या कौशल्याला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी असा महाराजांचा व्यापक दृष्टीकोन यामागे होता. १९५१ मध्ये बडोद्याजवळ अकोटा येथील खोदकामात सापडलेले जैन ब्रॉन्झचे संकलन हे या विभागाचे प्रमुख आकर्षण आहे. या विभागात राजपिपला, दाभोई आणि चंपानेर-पावगढ येथील खोदकामात सापडलेल्या वस्तू आढळतात.

स्वातंत्र्यानंतर बडोदा संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हा संग्रह १९४९ मध्ये नवीन सरकारला सोपवला गेला. तोपर्यंत या पुरातन आणि ऐतिहासिक कलाकृतीची किंमत कितीतरी पटीत वाढलेली होती. आज त्यांची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये असू शकते. महाराजांची वस्तू संग्रहालयाबाबतची असणारी रुची सर्वत्र पसरल्यानंतर अनेक कलाकार आणि विक्रेते आपली कलाकृतींची विक्री करण्याच्या हेतूने बडोद्याकडे धाव घेऊ लागले. त्यांची कलाकृती विकत घेण्यापूर्वी तज्ज्ञांची एक समिती त्याचे अवलोकन करत असे. काही वर्षांतच महाराजांच्या या कलादालनात मोगल आणि पर्शियन कलेच्या उत्तम कलाकृतींचा समावेश झाला. तसेच काही चित्रे राजपूत, कांगडा, गढवाल शैलीचीही या कला दालनासाठी विकत घेतली गेली.

१९०६-०७ मध्ये या संग्रहालयात एक चित्र आणि शिल्पकला गॅलरी सुरू करण्याचा निर्णय सयाजीरावांनी घेतला. पिक्चर गॅलरीचे बांधकाम १९०८ ते १९१४ असे एकूण ६ वर्षे सुरु होते. जरी १९१४ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले असले तरी १९२१ मध्ये लोकांसाठी ही आर्ट गॅलरी खुली करण्यात आली. ग्रीक, फ्लेमिश, जर्मन, इटालियन, डच, स्पॅनिश, ऑस्ट्रियन, रशियन, पोर्तुगीज, ब्रिटीश आणि फ्रेंच येथील चित्रांव्यतिरिक्त भारतीय चित्रांचा मोठा संग्रह पिक्चर गॅलरीत प्रदर्शित करण्यात आला. यात ११ व्या ते १९ व्या शतकापर्यंतच्या विविध शैली आणि प्रांतांच्या लघुचित्रांचा समावेश होता. या संग्रहालयात स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्कृतीचे सामुहिक प्रतिबिंब दिसते.

नोव्हेंबर १९१० मध्ये सयाजीराव युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर वस्तू संग्रहालयाच्या मुख्य इमारतीला जोडून पिक्चर गॅलरी करण्यासाठी काही युरोपियन तैलचित्रांची खरेदी करण्यात आली. ही जबाबदारी स्पिलमन या इंग्लंडमधील प्रख्यात कलामिमांसक व पाश्चात्य चित्रकलेच्या तज्ञावर सोपवण्यात आली. या संग्रहालयात १९० चित्रे असून ती सर्व भिन्न भिन्न संप्रदायांचे उत्तम नमुने मानली जातात.

पॅरिसमधील लुई बर्टोला हे एक विख्यात शिल्पकार होते. महाराजांनी त्यांना कांस्य धातूतील अर्धपुतळ्याच्या सहा प्रतिकृती आणि एक पूर्णाकृती पुतळा बनविण्याचा आदेश दिला. १९१० च्या परदेश दौऱ्यादरम्यान महाराजांनी योकाहोमा येथे विविध संग्राह्य वस्तूंची खरेदी करून बडोदा वस्तूसंग्रहालयाला पाठवून दिल्या.

१९१०-११ मध्ये स्पिलमन, लिव्हरपूल आर्ट गॅलरीचे संचालक आणि काँनोसार मासिकाचे संपादक यांना विविध शैलीच्या चित्रकारांची चित्रे एकत्र करण्याची कामगिरी सयाजीरावांनी सोपवली. त्याच वर्षी मि. फिलिओनने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध कलाकारांच्या श्रेष्ठ कलाकृतींच्या अनेक प्रती तयार करवून घेतल्या. हा युरोपात विकत घेतलेल्या चित्रांचा संग्रह महायुद्धामुळे १९१९-२० साली बडोद्यात आला. या सर्व युरोपियन चित्रांव्यतिरिक्त इजिप्तमधील ममी, दूर पूर्वेकडील देशातली कला, तिबेट येथील रत्नजडित चित्रे, इस्लाम व हिमालयन कलाकृती व त्याचबरोबर ग्रीक, रोमन आणि शिल्पाचे प्लॅस्टर कास्ट, संगमरवरीत केलेली कान्होवाच्या ‘थ्री ग्रेसेस’ची प्रत आणि इतर बऱ्यास कलाकृतींचा या संग्रहात समावेश आहे.

बडोद्याच्या पिक्चर गॅलरीत जे पोर्तुगीज चित्र आहे ते म्हणजे पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रेकेन्झा हिचे होय. पोर्तुगीज चित्रशैलीचे हे एकमेव चित्र या गॅलरीत आहे. भारतातल्या कोणत्याच दुसऱ्या म्यूझियम गॅलरीत असे चित्र नाही. सयाजीरावांनी या संग्रहालयात पाश्चात्त्य चित्रकलेबरोबरच भारतीय चित्रकलेलादेखील राजाश्रय दिला. चित्रसंग्रहाच्या तळमजल्यावर जवळजवळ ४०० भारतीय चित्रांचा संग्रह आहे. अकबराच्या अमदानीत रामायण आणि महाभारत यातील देखाव्यांचा बनविलेला एक अमूल्य संग्रह यात आहे. या संग्रहालयाच्या विशालतेविषयी मि. राइस या महाराजांच्या चित्रकाराने म्हटले आहे की, “It contains the best collection of Indian Paintings in the world.” बडोद्याचे कला-दालन “भारतीय चित्रकृतींचा विश्वातील सर्वोत्कृष्ट संग्रह आहे.”

१९३४ साली सयाजीरावांनी बर्लिन येथील डॉ. ई. कॉन वायनर यांना बडोदा राज्याचे आर्ट डायरेक्टर म्हणून नेमले. त्यांनी पिक्चर गॅलरीत महत्त्वाच्या पाश्चात्त्य तैलचित्रांची भर घातली होती. सयाजीरावांच्या पश्चात १९४३ मध्ये जर्मनीच्या डॉ. हर्मन गोएट्स यांची म्यूझियम डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात संग्रहालयाची पुनर्रचना करण्यात आली. जगातील वेगवेगळ्या देशांच्या कला आणि संस्कृतीचा परिचय प्रत्येक देशाच्या कलात्मक वस्तूंमधून व्हावा यासाठी गोएट्स यांनी देशपरत्वे तैलचित्रांची सर्जनात्मक मांडणी केली होती.

पॅरिस, रोम, फ्लोरेन्स आणि लंडनमधील प्रसिद्ध आर्ट गॅलरींना भेट देताना सयाजीरावांनी बडोद्याच्या संग्रहालयासाठी प्रसिद्ध कलाकारांच्या काही चित्रांची निवड केली. युरोपमधून विकत घेतलेल्या उपकरणांत अद्ययावत स्पेक्ट्रोस्कोप, मायक्रोस्कोप, मायक्रो फोटोग्राफिक उपकरणे व भौतिकशास्त्राच्या विविध शाखांमधील साधने आणि यांत्रिकी उपकरणांचा समावेश होता.

बडोदा संग्रहालय व चित्र गॅलरीची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे येथे युरोपियन तैल चित्र, भारतीय लघु चित्रकला, शिल्पकला, नाणी, वस्त्रोद्योग, हस्तकला याबरोबर इस्लामिक, जपानी, चीनी, नेपाळ व तिबेट कला आणि नैसर्गिक इतिहासाचा संग्रह आहे. तसेच इतिहास संग्रहालयात ललित उपयोजित कला, औद्योगिक कला, मानववंशशास्त्र, पुरातत्व, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूविज्ञान आणि भूगोल असे अनेक स्वतंत्र विभाग पहावयास मिळतात. इस्लामिक गॅलरी तुर्की, अफगाणिस्तान, इराक, सीरिया, इजिप्त आणि इंडो-फारसी कलाकृतींद्वारे इस्लामिक संस्कृतींचे दर्शन घडवते. एथनोग्राफी गॅलरी भारतातील आणि परदेशातील जमातींचे प्रतिनिधीत्व करणारे एक व्यापक संग्रह प्रदर्शित करते. संग्रहालयातील ऐतिहासिक मूल्ये असलेल्या विविध विषयातील संग्रहावरून महाराजांची सर्वसमावेशक वृत्ती दिसते. या संग्रहालयाच्या माध्यमातून महाराजांनी मनोरंजनाबरोबर ज्ञानार्जनालाही प्रोत्साहन दिले. या वस्तूसंग्रहालयाबरोबरच सयाजीबागेत एक आरोग्य संग्रहालयदेखील सयाजीराव महाराजांनी उभारले.

महाराजांनी वस्तूसंग्रहालयाबरोबरच फ्रान्समध्ये पॅन्थियन आणि इंग्लंडमध्ये वेस्टमिन्स्टर ॲबे येथे असलेले “टेम्पल ऑफ फेम” पासून प्रेरणा घेत बडोद्यात कीर्ती मंदिर उभारले. १५ जानेवारी १९१५ रोजी राजघराण्यातील दिवंगत सदस्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी विश्वमित्री पुलाजवळ कीर्ती मंदिराचे भूमिपूजन केले. यावेळी केलेल्या भाषणात महाराज म्हणतात, “राज्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम केले असतील त्यांच्या उपकारांची जाणीव असू देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांचे कार्य आपल्यासमोर चिरस्मरणीय स्वरूपात राहावे या हेतूनेच कीर्ती मंदिर स्थापन करण्यात येत आहे. कीर्तीमंदिरात आल्याबरोबर या मोठ्या लोकांच्या दर्शनाने आपल्या मनात भक्तीभाव जागृत होतील आणि जे कोणी दर्शनार्थ येतील त्यांच्याही मनात अशाच प्रकारचा पूज्यभाव उत्पन्न होईल.” सयाजीराव महाराजांनी कीर्तिमंदिर लोकांना केवळ प्रदर्शनापुरते उपलब्ध न ठेवता तेथे प्रत्येक वर्षी विद्वान लोकांची व्याख्याने आयोजित केली.

महाराजांनी १९३० च्या मार्च महिन्यात प्रतापसागर सरोवराच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात शिल्पकलेबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. या भाषणात महाराज म्हणतात, “गेल्या पन्नास वर्षांत या राज्यातील बांधकामात जे धोरण राखण्यात आले आहे, त्यात मी मुख्यतः दोन तत्त्वे आपल्या नजरेसमोर ठेविली होती. ज्या ज्या वेळेस एखाद्या नव्या संस्थेला जागेची गरज पडते, त्या त्या वेळी ती गरज पुरी करण्याचे दोन मार्ग असू शकतात. एक मार्ग हा की, केवळ व्यावहारिक उपयोगाकडे लक्ष देऊन या संस्थेसाठी बराकीप्रमाणे अथवा वखारीप्रमाणे, वरती छपरे व बाजूंना भिंती असलेल्या खोल्या बांधून आपल्याला गरज भागविता येईल; परंतु या मार्गाचा अवलंब मोठमोठी शहरे बांधणारांनी कधीही केलेला नाही. यासाठी अशाप्रसंगी उपयुक्तता व सौंदर्य या दोन दृष्टींचा मिलाफ करून त्या संस्थेला जागेची असलेली गरज पुरविण्याबरोबरच त्या कामासाठी बांधली जाणारी इमारत ही शहराला भूषणरूप व्हावी, असे धोरण मी नेहमी ठेवले आहे. प्राचीन काळच्या रोम शहरांचे वैभव तत्कालीन प्रचंड इमारतींवरून समजून येते व मध्ययुगीन रोमचे ऐश्वर्य सेंट पीटर्सच्या प्रचंड मंदिराच्या रूपाने दृग्गोचर होते. पॅरिस शहराचा आत्मा आपल्याशी त्या शहरातील भव्य इमारतींच्या रूपाने प्रत्यक्ष बोलत असल्याचा भास होतो. घाणेरड्या गावांतून घाणेरड्या लोकांचीच पैदास होते. म्हणून सुंदर इमारतींच्या सांस्कृतिक महत्त्वाकडे मी दुर्लक्ष केले असते, तर माझ्या प्रजेवर मी अन्याय केला असे झाले असते. आपण हिंदी लोक कलाविद् आहोत या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे व तो यथायोग्यही आहे. हिंदू व मुसलमान राजांनी यापूर्वी आपल्या देशात उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने म्हणून गाजण्यासारख्या इमारती बांधून आपल्या देशाला अमूल्य अलंकाराचे लेणे चढविले आहे. या शिल्पकलेची किंमत पाश्चात्त्य कलेहून कोणत्याही प्रकारे कमी नाही. याच दृष्टीने बडोदे शहर सुंदर व शोभिवंत करण्याचा प्रयत्न मी केला आहे, की जेणेकरून या शहराबद्दल तुम्हाला अभिमान व प्रेम वाटावे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते रुंद करण्यात, त्यात जागोजागी बगिचे बनविण्यात व इतर सुधारणा करण्यातही मी हीच जोडदृष्टी ठेविली आहे की, या सर्वांपासून लोकांना आरोग्याच्या दृष्टीने जसा व्यावहारिक उपयोग व्हावा, त्याचप्रमाणे सौंदर्यदृष्ट्या त्यांच्या संस्कृतीत भर पडावी.” महाराजांच्या कारकीर्दीत १९३६ पर्यंत केवळ बडोदा शहरातील शिल्पकामावर सुमारे २० कोटी रु.पर्यंत खर्च झाला होता.

आपल्या प्राचीन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्राचीन ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह, संरक्षण आणि संपादन करण्याचे महत्व महाराजांनी जाणले होते. त्यामुळे वस्तू संग्रहालय आणि किर्तीमंदिराबरोबरच प्राच्यविद्या संस्था स्थापन करून ग्रंथ संवर्धनाचे महत्वाचे कार्यही महाराजांनी केले होते. १८८७ च्या पहिल्या युरोप दौर्‍यात असताना सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना पत्र लिहून दिवाणांना दिल्या होत्या. १८९३ मध्ये पाटण येथील जैन भांडारात सापडलेल्या हस्तलिखितांच्या संवर्धनाची व त्या हस्तलिखितांवरील अभ्यासाची सुरुवात झाली. याचवर्षी बडोद्यातील विठ्ठल मंदिरातील संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला. या संग्रहात महाराजांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्या ६३० छापील वैयक्तिक ग्रंथसंग्रहाची भर पडली. पुढे यज्ञेश्वर शास्त्री यांच्या ४४६ हस्तलिखितांसह छापील ग्रंथ याचबरोबर महाराणी चिमणाबाई यांच्याकडून राजवाड्यातील ५ चित्रांची धातुपट्टी या संग्रहास भेट मिळाली.

अनंतकृष्ण शास्त्री यांच्याकडे संपूर्ण भारतभर फिरून प्राचीन हस्तलिखिते जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. सात वर्षाच्या भ्रमंतीतून त्यांनी १०,००० हस्तलिखिते जमा केली. या सर्व प्रयत्नांतून १९३३ पर्यंत १३,९८४ हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो. सप्टेंबर १९१४ मध्ये संस्थानातर्फे आदेश काढून सी.डी. दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाटण आणि इतर जैन भांडारांचे सर्वेक्षण करून घेतले. सी.डी. दलाल यांनी दिलेल्या अहवालावरून तेथे सापडलेल्या दुर्मिळ कागदपत्रांचे प्रकाशन करण्यासाठी ‘गायकवाड ओरिएन्टल सिरिज’ या विशेष मालेची सुरुवात १९१५ मध्ये केली. त्यानुसार ही माला पाश्चात्य संशोधन पध्दती आणि प्रकाशन संहितेनुसार हस्तलिखितांच्या संशोधित आवृत्या प्रकाशित करू लागली. १९१६ मध्ये या मालेतील राजशेखर कृत ‘काव्यमीमांसा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. ‘गायकवाड ओरिएन्टल सिरिज’च्या माध्यमातून केलेल्या कामातील प्रगती विचारात घेऊन १ सप्टेंबर १९२७ मध्ये ‘बडोदा प्राच्यविद्या मंदिर’ ही स्वतंत्र दर्जा असणारी संस्थेची सुरुवात महाराजांनी केली.

बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेत सध्या ३१ हजार हून अधिक हस्तलिखितांचा संग्रह आहे. यामध्ये सर्व विषयांची, विविध भाषेतील व निरनिराळ्या लिपीत लिहिलेली जवळजवळ २७ विषयांवरील हस्तलिखिते उपलब्ध आहेत. बहुतांश हस्तलिखिते देवनागरीत असली तरी संस्कृतसह मराठी, गुजराती अशा अन्य आठ लिपीतील हस्तलिखिते सुद्धा येथे उपलब्ध आहेत. हस्तोद्योगातील कागद, पट्ट (कापड), भुर्जपत्र, ताम्रपत्र, ताडपत्र इ. प्रकारची हस्तलिखिते येथे पाहावयास मिळतात.

‘सर्व क्षेत्रात सर्वोत्तम’ हे तत्व महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडताना सातत्याने समोर येते. एक राज्यकर्ता म्हणून फक्त आपली प्रजाच नव्हे तर अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारा हा राजा होता. आधुनिक भारतात आधुनिकीकरणाचे बहुतेक पहिले प्रयोग सयाजीरावांनी केले. मानवी संस्कृतीचे संवर्धन हा त्यांच्या कार्याचा आत्मा होता. म्हणूनच प्राच्यविद्या असो की वस्तू संग्रहालय महाराजांनी या बाबींना आपल्या धोरणात केंद्रस्थानी ठेवले होते. आपल्या देशाला जगाशी सकारात्मक स्पर्धा करायला शिकवणारा हा राजा भारतीय संस्कृतीचा खरा मानबिंदू होता. देशी आणि विदेशी अशा दोन्ही संस्कृतींना तितक्याच प्रेमाने जोपासण्याची दृष्टी महाराजांनी वस्तू संग्रहालयाच्या निर्मितीत जपली होती. बहुधा आधुनिक भारतातील वस्तू संग्रहालय निर्माण करणारे सयाजीराव हे पहिले भारतीय प्रशासक असावेत. सयाजीरावांनी निर्माण केलेला हा वारसा महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच प्रेरणादायी ठरतो.

– सौरभ गायकवाड, वारणानगर
Saurabh Gaikwad
(९१७५००१८६२)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..