सुगंधा… ये सुगंधा… चल की लवकर….सूर्य उगायची येळ झालीय बघ,7 वाजस्तोवर पोचाय फाहीजे रानात ,नाई तर उन्हातान्हात म्हागरी यावं लागल.. व्हय व्हय झालंच माझं भाकरी बांधते नी निघते, सुऱ्या उठला का बघा जरा, ह्यो पोरगा म्हणजे तारासच हाय बघा, सुगंधा कशीबशी भाकरी बांधून घराच्या बाहेर पडत सुऱ्या जवळ पोचली,”लेका उठ की जरा आम्हांसनी उशीर होतोय बघ,” अस म्हणत त्याला 2-3 दा थोपटने नी किसन्या च्या माग माग चालायला लागते.
साधारण 1 तास चालल्या नंतर संतोष म्हणजे संत्या आणि त्याची बायको त्यांना रानातच भेटतात. “काय र संत्या आज बाजाराचा दिस हाय नव्ह.. आज जरा जास्तच लाकडं न्ह्याव्ह म्हनतो बाजाराला”. किसन्या संत्याकडे बघत म्हणाला, संत्याने होकारार्थी मान हलवली, मग चौघ सोबतच चालायला लागली.
किसन्या तसा एकदम रांगडा गडी तिसी पर्यंत पोहचलेला आणि सुगंधा असेल साधारण 25-26 ची, वयाच्या 20 व्या वर्षीच तीच लग्न किसन्या बरोबर झालेलं, तसं दोघ अगदी आनंदाने राहत होते, सुऱ्या त्यांचा दोघांचा जीव की प्राण होता, दोघ बी त्याला जीवापाड जपत होती, त्याने खूप शिकावं मोठं व्हावं असं दोघांनाही वाटायचं, त्यांच्या प्रमाणे सुऱ्याने कष्टाचं जीवन जगू नये म्हणून दोघ बी जीवापाड कस्ट करीत होती. दिवसभर रानातून लाकडं तोडून आणायची आणि बाजारात नेऊन विकायची अशी त्यांची दिनचर्या असायची, आज पण दोघ जरा लवकरच निघाली होती, कारण आज बाजाराचा दिवस होता.
साधारण अर्धा मैल चालल्यावर ती चौघ रानात पोहचली, आणि आपापल्या कामात मग्न झाली, हळूहळू आणखी काही मंडळी त्यांच्या सोबत लाकडं तोडण्यासाठी पोहचली. किसन्या लाकूड तोडताना अगदी बारकाईने झाड शोधत होता, साधारण जाडसर लाकूड मिळेल आणि कमी ओली फांदी असेल तीच फांदी तो तोडत होता. बाजारात त्याची गिर्हाईक बांधलेली होती,कारण त्याने आणलेली लाकडं उत्तम प्रतीची असायची.
“सुगंधे…अग जास्त पुढं नको जाऊस, तिकडं जनावरं असतात, आपण इथनच लाकडं घेऊ”. अस म्हणत त्याने आपल्या जवळची लाकडं गोळा करायला सुरुवात केली. सुगंधाने ही तिच्या लाकडाची मोळी बांधायला घेतली. संत्या आणि त्याच्या बायकोने सुद्धा आपापली मोळी तयार केली, आणि त्या दोघांची वाट बघू लागले.
सकाळचे 9 वाजले होते, चौघ एका झाडाखाली जमा झाले, प्रत्येकाने आणलेल्या पाण्याच्या बाटलीतून घटा घटा पाणी पिऊ लागले, किसन्या संत्याकडे बाटली देत म्हणाला,”लई ऊन हाय बघ या वरसाला”. संत्याने किसण्याच्या हातातील बाटली घेऊन घटा घटा पाणी पीत म्हणाला,” मागच्या वर्सला सदयाची बायको नाही का उन्हामुळं चक्कर येऊन पडली होती इथंच.” सुगंधाने पण होकारार्थी मान हलवली, आणि चौघ पण त्या झाडाखाली सकाळची न्याहारीला बसले.
सुगंधाने आज किसण्याची आवडती बटाट्याची भाजी बनवली होती,म्हणून त्याने सर्वात आधी न्याहारीला सुरुवात केली. चौघांनी न्याहारी करून तिथेच पाठ टेकवली, त्यांना निघायला अजून साधारण अर्धा तास तरी असेल म्हणून मंडळी निवांत पडली होती. किसन्याचा लगोलग डोळा लागला,बटाट्याची भाजी त्याला खूपच आवडली होती.
पळा…. पळा…. पळा… अस ओरडत अचानक 4-5 माणसं त्यांच्या दिशेने येताना दिसली, त्या आवाजाने किसन्याची झोप मोडली. “आरं काय झालं.. का पळताय सगळे… “. अस म्हणत संत्याने त्यांची विचारणा केली. त्यातला एक माणूस झाडावर चढत चढतच बोलला..” वा..वा..वा… वाघ वाघ … वाघ आलाय तिकडं…, चला लौकर झाडावर चढा.” हे ऐकल्यावर संत्याची बायको तर धाय मोकलून रडायला लागली. “ये गप की..कशाला रडतेस.. चल लौकर झाडावर चढ”. अस म्हणत त्याने बायकोला ओढत एका झाडाखाली नेले आणि तिला वर चढवू लागला. ती कशी बशी झाडावर चढली,तिच्या मागोमाग तो पण झाडावर चढला. किसन्या ने सुद्धा सुगंधाला एका झाडावर चढवलं आणि तिच्या माग तो पण झाडावर चढला. सगळ्यांची एकाच धावपळ सुरू झाली, जो तो जमेल तिथे झाड शोधून वर चढायला लागले.
“आरं माझी पोर ऱ्हायली रं खाली… तिला कोणी वर चढवा रं….” किसण्याच्या झाडापासून 4-5 झाड सोडून आवाज आला. किसन्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक बाई जीवाचा आकांत करत रडत मदतीची अपेक्षा करत होती. पण कोणीच खाली उतरायला तयार नव्हता, ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी होती. ती लहानशी पोरगी एकटीच खाली रडत होती आणि झाडावर तिची आई मदतीचा हात मागत होती. किसन्याने सुगंधा कडे पाहिले,पण सुगंधाने नजरेनेच इशारा करत किसन्याला नाही म्हटले. एकीकडे ती मुलगी रडत होती तर दुसरीकडे तिची आई मदतीचा हात मागत होती. अजून वाघच तिथे आगमन झालं नव्हतं, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेलं.
किसन्याला ते असह्य झालं त्याने झाडाखाली उडी मारण्याची तयारी केली तेवढ्यात सुगंधाने त्याचा हात धरत त्याला विरोध केला.पण किसन्याने तिचा हात झटकत खाली उडी मारली, त्याच क्षणी सुगंधाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या,नको नको म्हणत बिचारी तशीच झाडावर बसली. किसन्या धावत धावत त्या मुलीजवळ पोहचला कसंबसं त्याने त्या मुलीला उचललं,आणि तिच्या आईच्या दिशेने पळत सुटला. झाडाजवळ आल्यावर त्याने मुलीला वर उचलून तिच्या आईकडे देण्याचा प्रयत्न केला पण ती उंचावर असल्यामुळे त्याचा हात काही पोहचत नव्हता.”अहो थोडं खाली यता का जरा”, अस म्हणत त्या बाईला सांगू लागला,तिने त्याने म्हणणे ऐकले आणि थोडी खाली आली. एका हाताने झाडाची फांदी धरत आणि दुसऱ्या हाताने त्या मुलीचा हात धरत ती तिला वर ओढू लागली,तेवढ्यात अचानक सगळ्यांनी गलका केला. “आरं.. आला.. आला.. आला…. लवकर चढ… त्याच झाडावर.” किसन्याने मागे वळून पाहिले तर पिवळ्या रंगाचा पट्टे पट्टे असलेला वाघ त्याच्या दिशेने येताना दिसला.. किसन्या त्या बाईकडे बघत जोराने ओरडला, “अहो ओढा लवकर मुलीला…” ती बिचारी पूर्ण शक्तीनिशी मुलीला वर ओढत होती, आणि अचानक किसण्याच्या पाठीवर जोराचा आघात झाला त्याच्या हातातून ती मुलगी सुटली आणि तो धाडकन खाली कोसळला. त्याच क्षणी त्या बाईने पूर्ण टाकतीनिशी मुलीला वर ओढले आणि सुरक्षित जागेवर नेऊन ठेवले.
किसण्याच्या पाठीतून रक्ताचे थारोळे वाहायला लागले होते,वाघ त्याच्याकडे डरकाळी फोडत क्रूर नजरेने बघत होता. त्याच्या पंज्याने किसन्याचा शर्ट फाटला होता रक्ताने संपूर्ण माखला होता,कसातरी किसन्या उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने पुन्हा त्याच्या दिशेने झडप घातली,पण किसन्या आता सावध झाला होता त्याने ताबडतोब उठत वाघाचे पंजे हवेतच धरले होते पण वाघाच्या झाडपेने तो पुन्हा खाली कोसळला,पण हातांची पकड त्याने आणखीनच घट्ट केली होती,पंजे हातात धरून कधी तो वाघावर तर कधी वाघ त्याच्यावर अस दृश्य होत ते,इकडे सुगंधा लोकांकडे मदतीचा धावा करत होती पण कोणीही भीतीपोटी हिम्मत करत नव्हता. अचानक तिच्या कानावर किसन्याचा आवाज आला,”कोणीतरी माझ्याकडे या मी वाघाला धरतो तुम्ही फक्त त्याच्या मागच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घाला ,बाकी मी आहे आणि हा वाघ…… “
पण कोणीही खाली उतरायला तयार नव्हता. “वाचवा वाचवा कोणी तरी माझ्या नवऱ्याला वाचवा…. तो बिचारा ताडफडतोय, तुम्हाला कोणालाच कशी त्याची दया नाही येत… वाचवा रे वाचवा त्याला….वाचवा….” बिचारी गयावया करून थकली.तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रु वाहत होते, एव्हाना वाघाने किसन्याचा पाय पकडून त्याला घसरत ओढत होता किसन्या वेदनेने तळमळत होता. त्याचा डाव पाय गुढग्यापासून वेगळा झाला होता,त्यामुळे त्याला उभा राहता येत नव्हतं,तरीही पठ्ठ्याने हातांची पकड काही ढिली केली नाही. हळू हळू त्याला भोवळ यायला लागली होती,इकडे नवऱ्याची अशी केविलवाणी अवस्था सुगंधा ला बघवत नव्हती. कोणीही किसण्याच्या मदतीला धावत नाही हे बघून सुगंधा ने झाडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला, कोणत्याही परिस्थिती आपल्या नवऱ्याला वाचवलं पाहिजे एवढंच तिला समोर दिसत होतं,तशी ती झाडावरून खाली उतरायला लागली,तेवढ्यात तिकडून आवाज आला”वहिनी नाका उतरू खाली, त्यो वाघ लई खतरनाक हाये,तो तुम्हांसनी भी नाई सोडणार नाका जाऊ, पण ती रणरागिणी काही थांबली नाही, एक हातात कुऱ्हाड घेऊन तिने झाडावरून खाली उडी मारली,तशी वाघाने तिच्या दिशेने मोठी डरकाळी फोडली,” ये ये सुगंधा ये, मी पकडल्या त्याला तू फक्त त्याच्या मागच्या पायावर वार कर बाकी मी बघून घेतो.” किसन्या तिकडून ओरडून सांगत होता.
आता सुगंदाला कशाचेच भान नव्हते तिला फक्त त्या वाघाचे मागचे पायच दिसत होते. ती मोठ्या वेगाने वाघाच्या दिशेने जात होती, ती आपल्या कडे येत आहे हे बघून वाघाने तिच्या दिशेने मोर्चा वळवला, त्याने किसन्याला सोडले आणि सुगंधा च्या दिशेने झेप घेतली,किसन्या जोरात ओरडला सुगंधा…… मागचे पाय…….. मागचे….. सुगंधाला ते शब्द कानावर पडले तशी तिने पूर्ण शक्तीनिशी उडी मारली आणि कुऱ्हाड उगारली ती नेमकी वाघाच्या उजव्या पायावरच जाऊन पडली. एक झटक्यात वाघाच्या पायाचे दोन तुकडे पडले. आता वाघ असहाय झाला होता तरीही त्याने तिच्यावर झडप घातली , तशी ती झरकं फिरली आणि दुसरा घाव त्याच्या डाव्या पायावर घातला. तोच वाघ वेदनेने विव्हळायला लागला, एव्हाना सुगंधाची हिम्मत बघून झाडावर चढलेल्या पुरुषांना ही बळ आले, त्यांनी पण आपापल्या कुऱ्हाडी घेऊन खाली उड्या मारल्या, सर्व जण त्या वाघावर तुटून पडले. हळूहळू प्राण सोडला. इकडे किसन्या वेदनेने कण्हत पडला होता, सुगंदा एकही क्षण वाया न घालवता किसण्याकडे धावली आपली साडीचा पदर फाडून तिने किसण्याच्या पायाला बांधला जिथून रक्त वाहत होते. किसन्याने सुगंधाला कडकडून मिठी मारली. एव्हाना वनविभागतील कर्मचारी येऊन पोहोचले होते. त्यांनी वाघाला पिंजऱ्यात बंद केले होते.
दुसऱ्या गाडीत किसन्या आणि सुगंधाला बसवून त्यांची रवानगी रुग्णालयात केली गेली.
— भैय्यानंद वसंत बागुल.
Leave a Reply