आजची सकाळ सुगंधा आणि किसन्यासाठी महत्वाची होती. त्यांचं आयुष्य आता नव्याने सुरू होणार होत. रात्रभर दोघांनाही झोप लागली नव्हती, दोघांनीही आपापल्या परीने स्वप्ने रंगवली होती.
दोघेही भल्या पहाटे 4 वाजता उठले, अंघोळ वगैरे करून ते तयार झाले, संत्याला पण त्यांनी उठवले. सकाळचा चहा नाश्ता करून 9 वाजण्याची वाट पाहू लागले. दोघांनाही आता थांबणं कठीण झालं होतं . कधी एकदा देशमुख मॅडम कडे जातो अस झालं होतं.
9 वाजले दोघांनीही देवाला नमस्कार केला, आणि संत्याला घेऊन बाईसाहेबांच्या घरी पोहचले. सुगंधाने दारावरची बेल वाजवली,आतून बाईसाहेबांनी आवाज दिला “आले आले.”
किसन्याला सोबत बघून त्यांनाही आनंद झाला. “काय मग,ठरवलं का एकदाचं.”
“हो बाई साहेब, आम्ही तयार आहोत कष्ट करायला, आम्ही लवकर तुमचे कर्ज फेडू”. बाईसाहेबांना नमस्कार करून किसन्या बोलला.
बाईसाहेबांनी फोन करून सुताराला बोलावून घेतले. साधारण अर्धा पाऊण तासाने सुतार आला.
“नमस्कार बाईसाहेब”.
“नमस्कार, हे बघा आपल्याला एक टपरी तयार करायची आहे यांच्या साठी, करणार का तुम्ही?”.
“करीन की”.
“साधारण खर्च काय येईल त्याला?”
“धंदा कंचा असेल बाईसाहेब?”
“चहा भाजीचा”. बाईसाहेबांनी तिघांनाही चहा दिला आणि सुगंधशेजारी बसल्या.
“हे बघा ही माझी पोरगीच आहे असं समजा, आणि टपरी छान बनवा.”
“जी बाईसाहेब, तुम्ही कायबी काळजी करू नका”.
संपूर्ण व्यवहाराच बोलून झाल्यावर पंचवीस हजारात टपरी बनवायचं ठरलं.
सुगंधा आणि किसन्या बाईसाहेबांना नमस्कार करून निघाले. आठ दिवसांनी टपरी बनवून मिळणार होती. किसन्या सुगंधा पेक्षा जास्त खुश होता. सुगंधा बरोबर त्यालाही काम मिळणार होत.
आठ दिवसानी सुताराने बाईसाहेबांना निरोप दिला की टपरी तयार आहे, बाईसाहेबांनी सरपंचशी बोलून एस टी स्टँड जवळ टपरिसाठी जागा निश्चित केली. चहा भजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री तसेच गॅस आणि शेगाडीचा खर्च ही बाई साहेबानी केला. साधारण 10 हजार खर्च आला. सुगंधा आणि किसन्याला बाईसाहेबांचे 35 हजारांचं देणं द्यायचं होत.
नियोजित वेळेनुसार बाईसाहेबांच्या हस्ते टपरीचे उदघाटन करण्यात आले. निळ्या रंगानी सजलेली टपरी अतिशय सुंदर दिसत होती. समोर दोन खुर्च्या ठेवल्या होत्या सोबत एक टेबलही ठेवला होता. अगदी रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळे आणि स्टँड शेजारीच असल्यामुळे लोकांची गर्दी झाली होती. बाईसाहेबांनी सुगंधाला भजीची पहिली ऑर्डर दिली. आणि सुगंचाचे हॉटेल सुरू झाले. सुगंधाला बाईसाहेबांच्या स्वरूपात पाहिलं गिर्हाईक मिळालं. सुगंधाने रोज सकाळी बाईसाहेबांकडची सकाळची धुनी भांडी घासण्याचा आग्रह कायम ठेवला.
रोज सकाळी सुगंधा बाईसाहेबांकडे जाण्याआधी टपरीवर भजी बनवून जाऊ लागली, तिकडचे काम संपल्यावर लगेच ती हॉटेलवर येत असे. किसन्या मन लावून ग्राहकांची सेवा करत होता, त्यांना काय हवं के नको ते जातीने पाहू लागला.
असेच दोन तीन महिने निघून गेले. आता त्यांच्याकडे प्रपंच चालवण्यासाठी पुरेसे पैसे येत होते . बाईसाहेबांच्या आग्रहाने सुऱ्याला इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले.
दोघेही खूप कष्ट करू लागले. भल्या पहाटे उठून चहा भजी बनवली जात होती, ग्राहकांना गरमागरम भजी आणि तीही चविष्ट भजी मिळत होती. अजीबाजूच्या गावांमध्ये सुगंधाचं नाव पसरलं होत. सुगंधाला बाईसाहेबांचे उपकार कसे फेडू असे झाले होते. हळू हळू चहा भजी सोबत त्यांनी मिसळ द्यायला सुरू केली. गावरान झणझणीत मिसळ लवकर फेमस झाली. आता दिवसाचा गल्ला चांगला येत होता. जास्त येणाऱ्या पैशाने ते हॉटेल च्या सजावटी साठी वापर करू लागली. सर्व काही सुरळीत चालू होतं, पण एक टेन्शन अजून बाकी होत ते म्हणजे बाईसाहेबांनी दिलेले पैसे काही त्यांना वेळेवर भरता येत नव्हते. आणि बाईसाहेब सुद्धा त्यासाठी कधी मागणी करत नव्हते.परंतु आपण बाईसाहेबांचे कर्ज वेळेवर फेडू शकत नाही आहोत या गोष्टीची खंत त्यांना सतत जाणवत होती. काहि केल्या त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नव्हते . आणि जर उरतेच तर ते लगेच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर करत असत. एकूणच काय तर दिवसभर भरपूर पैसे असायचे पण सरतेशेवटी झोळी खालीच असायची. त्यांना रोजच्या खर्चासाठी काही कमी पडत नव्हते.मात्र बाईसाहेबांचे कर्ज त्यांना फेडता येत नव्हते आणि स्वतःसाठी त्यांना भविष्याच्या तरतुदींसाठी काही शिल्लक राहत नव्हते.
— भैय्यानंद वसंत बागुल.
Leave a Reply