वहाणा – लुसलुशीत पायातल्या
मोटारीतून लाल गालिच्यावर उतरणार्या
वहाणा टोकदार टाचांच्या
तरुणांच्या हृदयाला रक्ताळणार्या
वहाणा झिजलेल्या सपाट
वर-पित्याच्या दाराशी ओशाळणार्या
वहाणा चमचमत्या वेलबुट्टीच्या
पैंजणाशी लडिवाळणार्या
वहाणा चकचकीत पॉलिशच्या
वरवेषावर मिळवलेल्या
वहाणा शीट्टीच्या, रंगीत
इवल्या पावलात दुडदुडणार्या
वहाणा राकट मजबूत
काळ्या मातीत रुतणार्या
वहाणा नाजूक, वहाणा दणकट
वहाणा नटखट, वहाणा कळकट
वहाणांना चेहरा असतो
त्या तोलणार्या शरिराचा
वहाणांचा स्वभाव असतो
कुरकुरण्याचा किंवा चावण्याचा
वहाणा वर्णभेद मानीत नाहीत
नांदतात गुण्यागोविंदाने एकाच कपाटात
मात्र होतात कधितरी बंडखोर
उधळतात सभा थोरामोठ्यांची
वहाणांना त्यांची जागा
दाखवली जाते पदोपदी
पूर्वी वहाणा पुजल्या जात
साधुसंतांच्या – आता भोंदूंच्या
तेव्हां राजे राजवाड्यांच्या
आता मंत्र्यांच्या नि
त्यांच्या चमच्यांच्या ही !
— सुधा मोकाशी
Leave a Reply