एक नामजप लिहायचे ठरवले होते. म्हणजे काय झालं मन अस्वस्थ झाले होते. म्हणून एका हितचिंतकांनी सांगितले होते की अमूक एका संख्येत लिहा. मनात आलं की ते करणे हा स्वभाव. त्यामुळे वही आणून घेतली. पहिल्या पानावर अगोदर श्री राम प्रसन्न असे लिहिले. ती लहानपणीची शिकवण. नंतर नांव. दिनांक. आणि त्याच पानावर पाच देवांची नांवे लिहिली. दुसऱ्या पानावरून सुरुवात करतांना किती उच्साह असतो. आणि काळजी पण. अक्षर चांगले आले पाहिजे. सुवाच्य व सुंदर कसे काढता येईल याचे नियोजन. अगदी पेन कागद या सगळ्यांची पण. हळूहळू मन रमायला लागते. आनंद वाढत जातो. समाधान अभिमान वाटतो.. आणि एक दिशा मिळते…
एकदा का गती मिळाली की झपाटल्या सारखे त्यात रमून जातो. या वेळी भूक तहान. शारीरिक तक्रार याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक श्वासात ध्यास असतो. आपल्याला वेळ कमी पडतो असे वाटते. जेवढे जास्त करता येईल तेवढे करत राहतो. काम काळ आणि वेग याचे गणित ऊत्तम जमत जाते. कितीही अडचणी आल्या तरी काम थांबत नाही.
आता पाने भराभर संपवली असतात. आणि पुढील पाने थोडीच आहेत लिहिता येईल की अशी शिथिलता येते. पाने संपत चालले आहेत अजून लिहिणे बाकी आहे. पण वेळ कमी आहे कितीही ठरवले तरी मन धावले तरीही शरीर साथ देत नाही. म्हणजेच कुठल्याही गोष्टी साठी मन आणि शरीर यांची सांगड असेल तरच ते इच्छित काम पूर्ण होते.
मी सध्या याच रेंगाळणाऱ्या अवस्थेत आहे. आयुष्यात देखील अशीच तीन भागात पाने असतात. सुरवात चांगली असते. जोम असतो. मनाची घोडदौड सुरू झाली की शरीरात संचार झाल्या सारखे होते. अनेक ध्येय ठरवली जातात. काय वाटेल ते होवो पण हे पूर्ण करायचेच ही जिद्द असते म्हणून आयुष्यातील मधली पाने किती भराभर उलटली जातात. आणि आता आयुष्यातील तिसऱ्या पानाची सुरवातीला समजते की काळ काम वेग याचे गणित चुकत आहे. कोणत्याही वेळी काहीही.होऊ शकते. पण पाने कोरी ठेवून चालत नाही. सुरवात केली आहे तर शेवट ही करायलाच हवा. कितीही उसने अवसान आणले तरीही ते जेव्हा संपायचे असते तेव्हाच संपणार आहे म्हणून जो पर्यंत होत आहे तोपर्यंत करणे भाग आहे.
आणि असेही काळाला कामाची गरज नाही. कारण वेग नाही. त्यामुळे शेवटची पाने लवकर संपता संपत नाहीत
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply