ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता
क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां
चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी
कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ?
फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको
अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’
‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें –
‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।।
मन तिचें वळवायला युक्ती अशी मी काढली
रोज तिजला काव्यमय मी प्रेमपत्रें धाडली
शेवटी फळलीच की गंधित गुलाबी शृंखला
दूत वरला पोरिनें, जो पोचवी पत्रें तिला !
होऊनिया आतूर मी गेलो तिला भेटायला
तात्काळ दरवाजा तिनें लावून की हो घेतला
लावला होता तिनें कां, टाळण्यांसाठी मला ?
लावला होता तिनें, कवटाळण्यांसाठी मला !!
जातांच मी, ती मजकडे आतूर होउन धावली
लागलिच मजला मिठी सर्वांसमोरच मारली
चुंबनें कांहीं भराभर वर्षवी ती मजवरी
गोड मोठी तीन वर्षांची असे ती छोकरी !
हात त्यानें लावला सर्वांपुढे अंगा तिच्या
लागला सोडूं निर्या त्या सुंदरीच्या साडिच्या
तो ज़रा ना लाजला, तीही मुळी ना लाजली
स्टाफ तो शोरूममधला, ती “डमी” काचेतली ।।
आंत ती जातांच, आतुर तिजकडे तो धावला
लागलिच लगटुन, तिच्या पदरास झोंबूं लागला
हर्षली तीही, तयाला थांबवी नच मुळिच ती
पाळला-कुत्रा असे तो सुंदरीला प्रिय अती ।।
दिसतसे कित्येक वेळां ती मला टीव्हीवरी
प्रथम कुतुहल, ध्यास नंतर लागला मज अंतरीं
राहवेना, पोचलो स्टुडिओमधे मी टीव्हीच्या
समजलें, टीव्हीतली माशी असे अगदी खरी !
शांत रात्रीं सुंदरी ती दिसतसे कधिकधि मला
धाडसानें एकदा मी ‘जवळ ये’ म्हटलें तिला
हांसली, आली पुढे, मी रूप जवळुन पाहिलें
घाम फुटला दरदरुन मज, बघुन उलटी पावलें ।।
– सुभाष स. नाईक
Leave a Reply