नवीन लेखन...

वैज्ञानिकाचा सत्याचा शोध – मनोगत

सुख आणि दुःख, वेदना आणि आनंद या परस्पराविरोधी भावना या भूतलावरच्या प्रत्येक प्राणिमात्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक जीवाला सुखाची आस असते व दुःख नको वाटते. दुःख टाळण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी मनुष्य जीवनाची सगळी धडपड चालू असते, व त्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबण्याची त्याची तयारी असते. आधुनिक मानवाचा इतिहास बघितला तर तो म्हणजे सभोवतालचे जग बदलून जास्तीत जास्त भौतिक सुख कसे मिळवता येईल याचीच गाथा आहे. विज्ञान, व्यापार, राजकारण या क्षेत्रातील धुरंधर व्यक्ती, त्यांच्याकडे सामान्य माणसाच्या दुःखांवर रामबाण उपाय असून ते त्यांना सुखी बनवू शकतात असा फोल प्रचार करून त्यांना सुखाची खोटी आशा दाखवतात. अज्ञानी मनुष्याला ते स्वर्गाचे आमिष दाखवून एखाद्या तहानलेल्या घोड्याला वाळवंटातून मृगजळामागे दौडवावे तसे त्याची फरफट करतात हीच आधुनिक मनुष्य जीवनाची शोकांतिका आहे. लाखो जीव ह्या नश्वर सुखांच्या मागे धावण्याच्या जीवघेण्या शर्यतीत स्वत:ला गमावून बसले आणि आयुष्यात सुखाची पहाट होण्याआधीच काळाच्या उदरात गडप झाले व होत आहेत. विज्ञानाचा दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोग आहे. पण राजकारणी आणि व्यापारी वृत्तीच्या मनुष्यांनी विज्ञानाच्या ताकदीचा उपयोग फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी करून, या पृथ्वीच्या निर्मळ जलाचे गोड फळे देणाऱ्या मृत्तिकेचे अपरिमित नुकसान केले, आणि सामान्य माणसाच्या मनः स्वास्थाची न भरून येणारी हानी केली.

दुर्दैव असे की आधुनिक मनुष्याला खरे सुख म्हणजे काय आणि ते कसे प्राप्त करावे याची कल्पनाच नसते. धन, संपत्ती, सत्ता यांच्या जोरावर तो नकोशा दुःख, वेदना टाळायला बघतो आणि क्षणिक सुखाच्या मोबदल्यात जीवन मातीमोल करून घेतो. जागृत अवस्थेतल्या वासनांची पूर्ती करण्यातच खरे सुख शोधण्याच्या वृत्तीमुळेच त्याची ही केवीलवाणी अवस्था होते. स्वप्नावस्था व प्रगाढ निद्रा या दोन स्थितींमध्ये मनुष्याचे अर्धे आयुष्य व्यतीत होते, तरी तो या अवस्थांना वास्तविक महत्त्व न देता संपूर्ण दुर्लक्ष करतो, तरी पण दिवसभराच्या मौज मजेनंतर रात्रीच्या शांत निद्रेची अपेक्षा त्याला असतेच. या निद्रा अवस्थेत जिथे तो कोणतीही कृती करत नाही वा आनंद मिळेल अशी मौज करत नाही तरी तो शांतीसुखाचा अनुभव घेतो. निर्मळ शाश्वत आनंद हा दुःख टाळण्यात किंवा सुखांच्या मागे धावण्यात किंवा शरीर व मनाला बाह्य गोष्टींमधून रिझवण्यात नसून, इच्छा, वासनांचा त्याग करून मन, इंद्रियांना अंर्तमुख करून निद्रेमध्ये जशी शांतता लाभते तशी जागृत अवस्थेत प्राप्त करून घेण्यात आहे. निद्रा अवस्थेत मनुष्याला त्याच्या सहन न होणाऱ्या वेदना, दुःखाचा पण विसर पडतो. निद्रा ही आयुष्यातील दु:खावर खात्रीलायक उपाय आहे, पण मनुष्याला तो जागृत होताच या स्थितीचा विसर पडून तो परत विषयसुखांच्या मागे धावू लागतो व अधिकाधिक दुर्बळ बनतो. हीच मायेची ताकद आहे, अज्ञानाची स्थिती. मायेच्या शक्तीच्या प्रभावाखाली अनंत जन्म दुःखात भरडून निघाले आणि यापुढेही जोपर्यंत या मायेच्या भुलवून टाकणाऱ्या गुंगीतून मनुष्य जागा होत नाही, तोपर्यंत तो दुःख भोगतच राहिल. आपल्या ऋषी मुनींनी हे दाखवून दिले आहे की जर मनुष्य आपल्या मायेच्या प्रभावाबाहेर पडून जर जागृत अवस्थेत निर्विकल्प स्थिती अनुभवू शकला तर तात्काळ त्याच्या सर्व दुःखांचा अंत होईल. पण क्षणभंगूर सुखांच्या दलदलीत फसलेल्या सामान्य मनुष्याला हे पटत नाही. तरूण वयात त्याला वाटते आपल्या इच्छा, आकांक्षांना बंधन नाही. आपण जे हवे ते करू शकतो. आपल्याला हवा तसा बदल आपण जगात घडवू शकतो. त्याचा परमेश्वर किंवा उच्च दैवी शक्तीवर विश्वास नसतो. त्याचा देहाभिमान त्याला विज्ञान आणि मानसिक पातळीवरील गोष्टींमधेच त्याला गुंतवून ठेवतो. आयुष्य सरता सरता त्या शेवटच्या दिवसात त्याला जाणवते की आपल्या मनाप्रमाणे तर काहीच घडत नाही. त्याचे मन काल-प्रवाहाच्या लाटांच्या तडाख्यांनी भांबावून जाते, आयुष्यभर आभासांच्या सावल्यांमागे धावण्यात आयुष्य व्यर्थ घालवल्याची टोचणी त्याच्या मनाला लागते. त्याचे मन व शरीर दोन्ही गलितगात्र अवस्थेत निराशेच्या काळोखात थिजून उर्जितावस्थेत येण्याच्या स्थितीत उरत नाही.

जगातील इतर धर्म जे सुखी जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्व सांगतात ते फक्त मनुष्याच्या जागृत अवस्थेबद्दलच मार्गदर्शन करतात. म्हणूनच जगातील इतर धर्म तात्पुरते समाधान प्राप्त करून देतात पण त्यांच्या अनुयायांना ते चिरंतन सुखाची ठेव देऊ शकत नाहीत. सनातन धर्माचे योग व वैदीक तत्त्वज्ञान हे मनुष्य व ब्रम्हांड यांचा संपूर्ण विचार करून तीन अवस्था जसे- जागृत, स्वप्न, प्रगाढ निद्रा, तीन गुण – सत्व, राजस, तामस व यापुढील चौथी अवस्था तुरिया अवस्थेपर्यंत जी त्रिगुणातीत अवस्था आहे. जिथे अक्षय सुख व समाधान मिळते. तिथपर्यंत साधकाची वाटचाल करून देते. म्हणूनच योग-वेदांत तत्त्वज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ धर्मज्ञान आहे, उच्च विज्ञान आहे, आणि सर्वांनी आचरण्याजोगे तत्त्वज्ञान पण आहे. भारतवर्षातल्या प्राचीन ऋषी मुनींनी आपल्याला या भूतलावर मानवी शरीर धारण करून असतानाच दैवी शांती कशी प्राप्त करायची याचा राजमार्ग दाखवला, आणि परमेश्वराशी ‘याची देही याची डोळा’ भेटण्याचा मार्ग खुला केला, इतर धर्मामध्ये जसे मृत्यूनंतरचे पापक्षालन आणि ईश्वराचा अखेरचा न्याय याची शिकवण दिली जाते तसे नाही. भौतिक जगाचे बंध तोडून इच्छा वासनांच्या पाशातून मुक्त होऊन तुरिया अवस्था प्राप्त करून सर्वज्ञान प्राप्ती करून घेता येते. काही तत्त्वज्ञानांची शिकवण नास्तिकतेचा पुरस्कार करते. पण वेदांताचे तत्त्वज्ञान नास्तिकतेला कुठल्याही पातळीवर थारा देत नाही. नास्तिकता अहंकाराला खतपाणी घालून मनाचा समतोल घालवून टाकते. आणि त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते आणि विश्वात नुसताच कोलाहल माजतो. याउलट वेदांताची शिकवण अहंकाराला समूळ नष्ट करून वैश्विकतेची जाणीव आणि वैश्विक समतोल साधून देते. वेदांताच्या अभ्यासाच्या प्राथमिक पातळ्यांवर ते द्वैतवादी भासू शकते. पण उच्च पातळीवर ते केवळ अद्वैतवादीच आहे.

प्रज्ञानाम ब्रम्हा (ब्रह्मस्थित आहे) तत्वमसी (तू तोच आहेस), अहं ब्रह्मास्मि (आत्मा ब्रम्हाचेच स्वरूप आहे), अयमात्मा ब्रम्हा (सर्वांमध्ये स्थित आत्मा त्या ब्रम्हाचेच रूप आहे), सर्वंम् खल्विंदम् ब्रम्हा (सर्वकाही ब्रम्हस्थित आहे) वरील सर्व महावाक्ये वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या संदर्भात एकच सत्य परत परत सांगत आहेत की प्रत्येक प्राणिमात्रामध्ये जे चैतन्य आहे तेच ब्रम्ह आहे. द्वैत भावना केवळ जागृत व स्वप्नावस्थेत असते. प्रगाढ निद्रा व तुरिया अवस्थेत ती लोप पावते त्यामुळेच ज्या धार्मिक तत्त्वज्ञानांचा पाया हा मनुष्याच्या केवळ जागृत अवस्थेबद्दलच विचार करतो, व द्वैतभावनेच्या दु:ख, सुख या जाणिवांच्या पलिकडे न जाऊन अद्वैतभावनेत स्थिर न होऊ शकल्यामुळे मुक्त होऊ शकत नाही.

त्यांच्यासाठी जे काही देह इंद्रियांना अनुभवता येतं तेच सत्य आहे. आणि जे काही या जाणीवांच्या पलिकडचे आहे ते सर्व असत्य व अस्तित्वहीन आहे. प्रगाढ निद्रा अवस्था जी इंद्रियांच्या जाणीवांच्या पलिकडे असते ती पण विज्ञान, मानसशास्त्र आणि धर्म जे फक्त भौतिक जाणीवांच्या पातळीवर आहेत त्यांना ती मान्य नसते. म्हणूनच या भौतिक आणि द्वैत भावना सोडून साक्षात्कारी संतांच्या शिकवणीची कास धरली पाहिजे. प्राचीन वेदांचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून अध्यात्मिक प्रगती साधून सत्य जाणून घेतले पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य होते, अपयश केवळ जे मनापासून प्रयत्न करत नाहीत त्यांच्याच पदरी पडते.

दोन मार्गांपैकी एक मार्ग प्रेय जो सुखकारक सांसारिक सुखांचा आहे आणि श्रेय जो अत्यंत उत्तम आणि फलदायी असा अध्यात्मिक मार्ग आहे. बहुतेक लोक प्रेय मार्गाचा अवलंब करतात. अगदी थोडे मोजकेच लोक श्रेय मार्ग अवलंबतात. प्रस्तुत लेखकांनी जरी सुरवातीला प्रेय भौतिक सुखांचा मार्ग अवलंबला होता तरी कदाचित त्यांच्या पूर्वजन्मांच्या पुण्यकर्मांमुळे व उच्च अध्यात्मिक शक्तींच्या प्रेरणेनी ते अध्यात्मिक मार्गावर वळले.

अध्यात्मिक साधना मन, शरीर निकोप असतानाच लौकरात लौकर सुरू केली पाहिजे. जे या मार्गाकडे वळण्यास उशीर करतात त्यांना या जीवनात त्याचे फारसे लाभ मिळत नाहीत. पण वृद्धत्वात वाया घालवलेल्या जीवनाबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा जे काही साध्य करता येईल तेवढे केले पाहिजे, कारण त्याचा फायदा त्याला पुढील जन्मात लौकर सुरवात करण्यासाठी नक्कीच होईल. स्वल्पमप्यस्या धर्मस्य त्रायते महतो भयात्. या जन्मात थोडेजरी धर्म पालन केले तरी त्याचे मोठ्या भयापासून रक्षण होते, म्हणून कोणत्याही वयात सुरवात करणे चांगले. पण जेवढे लौकर सुरवात करता येईल तेवढे चांगले कारण आपल्याला माहित नसते की कधी कोणत्या क्षणी मृत्यू झडप घालेल आणि हे शरीर नष्ट होईल, पुढचा जन्म कधी आणि कुठचा मिळेल. जर तुम्ही प्रामाणिकपणे पुरेशी साधना केली असेल तर तुम्हाला जाणीव नसेल, पण तुमचा पुढचा जन्म नक्कीच मनुष्य जन्म मिळेल आणि तुमची अपूर्ण साधना पुढे चालू रहाण्यासाठी तुम्हाला पोषक वातावरण मिळेल.

पूर्वपुण्याईने अनमोल असा मनुष्य जन्म भरतवर्षासारख्या पवित्र देशात लाभल्यानंतरही मनुष्याने आपले जीवन पुत्रैष्ण – पत्नी, संततीची इच्छा, वितैष्ण धनाची अभिलाषा, लोकैष्ण स्वर्गाची अपेक्षा, नावलौकिक, मानमरातब, सत्ता अशा साधारण नश्वर इच्छां मागे लागून व्यर्थ घालवू नये.

आईच्या गर्भात असताना प्रत्येक जीव त्या कोंडलेल्या अवस्थेत मूक वेदना सहन करत आपल्या पूर्व जन्मातील पापांच्या स्मरणानी व स्वतःच्या चुकांच्या जाणीवेनी भगवंताला आर्त स्वरांनी आळवत असतो की परत तो ह्या चुका करणार नाही. आणि देवाला आश्वासन देतो की पावित्रपूर्ण आणि धार्मिक जीवन व्यतीत करेल आणि जन्म मृत्युच्या फेऱ्यातून स्वत:ची सुटका करेल.

जीव या जगात येतो तोच आर्त रूदन करत, पण मायेची शक्ती इतकी प्रभावी आहे की हवेच्या पहिल्या झुळकीचा स्पर्श होताच जीवाला आपल्या पूर्व स्मृतीचा संपूर्ण विसर पडतो, भगवंताला दिलेल्या वचनाचा व पूर्व कर्माचा त्याला संपूर्णत: विसर पडतो, आणि परत तो त्याच दुष्कर्माकडे वळतो. आणि परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. आपले प्राचीन ग्रंथ आणि ज्ञानी पुरुषांनी परत परत सांगूनपण मनुष्य मुक्तीच्या मार्गाकडे वळत नाही.

हे पुस्तक लिहिण्याची लेखकाची इच्छा नव्हती. ते फक्त त्यांच्या परमपूज्य गुरू स्वामी विद्यानंद यांच्या आज्ञेचे पालन करत आहेत. जेव्हा गुरूदेवांनी त्यांना लिहायला सांगितलं तेव्हा त्यांना काय लिहावं आणि कुठून सुरवात करावी काहीच लक्षात येत नव्हतं. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की ते एक पुस्तक लिहीतील, ते त्यांच्या आवाक्याबाहेरच काम होतं, विज्ञानाचा विद्यार्थी अध्यात्मावर लिहीणं ही कल्पनेपलीकडची बाब होती. त्यामुळे त्यांना जरा गोंधळल्यासारखे झाले. पण सरतेशेवटी काहीतरी लिहीलेच जे या पुस्तकातले १८ वे प्रकरण म्हणून समाविष्ट झाले. पण ते लिखाण फारच संक्षिप्त असून त्याचे पुस्तक बनणे मुश्कील होते, आणि त्याचा मतितार्थ सर्वांना समजण्यासारखा नव्हता, फक्त काही अध्यात्ममार्गावर प्रगती झालेल्या थोडक्यांसाठीच ते योग्य होते. असे प्रतित होते की आत्मसाक्षात्कार हे सहज साध्य आहे आणि फारशी साधना न करता प्राप्त आहे.

मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल. अगदी देवाचे अस्तित्व नाकारणाऱ्या माणसाला सुद्धा साधनामार्गाची महती पटावी आणि त्या मार्गावर होणारी उन्नती अनुभवता आणि मापता यावी.

या सर्व बाबी विचारात घेऊन अनेक वैयक्तीक दाखले पुस्तकात समाविष्ट केले. सर्व अनुभव हे सत्य व वैज्ञानीक दृष्टीकोनातून पडताळता आले पाहिजेत. पण भौतीक प्रयोगशाळेत नाही, तर स्वत:च्या आत असलेल्या विश्वामधे. साधे, दुःख आणि सुख या सारखे नेहमीचे अनुभव जिथे पूर्णतः दुसऱ्याला विषद करता येत नाहीत. तिथे दैवी अनुभव तर शब्दांच्या पलिकडले आहेत. साधना आणि अनुभव यांचा अंतर्भाव करून पुस्तक प्रस्तुत स्थितीला पोचले, पण तरीही प्रकाशित करण्याचा मानस पक्का होत नव्हता.

कारण एकतर लेखकाला या पुस्तकाची गरज आहे असे भासत नव्हते. कारण संस्कृत साहित्यात अजून काही सांगण्यासारखे किंवा लिहून भर घालण्यासारखे नाहीच. उलट जेवढे अधिक इंग्रजीत लिहू तेवढेच मूळ संस्कृत लेखन अध्यपन करण्याची वृत्ती मागे पडेल. संस्कृतचा एक श्लोक जो काही मन बुद्धीवर परिणाम करेल ते इंग्रजीचे हजार शब्द करू शकणार नाहीत. कारण इंग्रजीत असे शब्दच नाहीत जे मूळ गाभ्याला व्यक्त करू शकतील. जसे ब्रम्ह, धर्म, कर्म, सनातन, पुण्य इत्यादी इंग्रजीचे हजार शब्द देखील अध्यात्माचा गर्भितार्थ परिणामकारकपणे मांडू शकत नाहीत. ज्यांना खरोखर अध्यात्माची आवड आहे आणि साधक व्हायचे आहे त्यांनी मूळ संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करावाच.

लेखकाला प्रसिद्धीची भिती होती की जर त्यांनी पुस्तकं आणि लेख लिहिले तर लोक भेटायला येऊन त्यांना दिनचर्येत बाधा आणू शकतात, म्हणून त्यांनी प्रकाशित केले नाही. त्यांनी पुस्तकं लिहून संपवले आणि फक्त काही जवळच्या मोजक्या व्यक्तींना वाचावयास दिले. एका वाचकाने तर त्यांच्यावर खरमरीत टीका केली, म्हणून तर त्यांनी आपल्या जीवनकालात कधीही हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णयच घेतला. जर प्रकाशित करायचे असेल तर देह सोडल्यानंतरच होउ दे जर त्याचा काही कोणाला फायदा होणार असेल तर असा विचार त्यांनी केला.

अशा प्रकारात दोन दशकं उलटून गेली, नजीकच्या काळात जेव्हा त्यांच्या काही जवळच्या अनुयायांना हे हस्तलिखीत वाचावयास दिले तेंव्हा त्यांनी गळ घातली की हे प्रकाशीत झालेच पाहिजे व त्याची ते सर्व जबाबदारी घेतील. लेखकाला पण गुरूच्या इच्छेची पूर्तता करणे आवश्यक वाटले जी इच्छा सतत त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात दंडून होती. म्हणून शेवटी पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुस्तकातील व्यक्ती आणि अनुभव या काळाच्या ओघात घडलेल्या घटना आहेत आणि कोणावरही टीका करण्याचा उद्देश त्यात नाही लेखकाला सर्व व्यक्तींबद्दल नितांत आदर आहे कारण त्या सर्वांचाच कुठल्याना कुठल्या प्रकारे कमी अधिक प्रमाणात कर्म पार पाडण्यात सहभाग आहे.

सर्वांचे उद्दीष्ट एकच आहे, प्रत्येकजण स्वतःचा मार्ग शोधून काढतो आणि योग्य वेळी उद्दीष्टापर्यंत पोहोचतो ज्या प्रमाणे एखादे नाटक लेखकाच्या कल्पनेप्रमाणे आणि आधीच लिहून ठेवलेल्या घटनाक्रमाप्रमाणेच घडते तसे या जगाचे व्यवहार त्या जगन्नियंत्याच्या बरहुकूम चालू असतात. प्रत्येकाला त्याची स्वतंत्र आणि निर्देशीत भूमिका त्या त्या वेळी आखून दिलेल्या भूमिकेप्रमाणे बजावावीच लागते. म्हणूनच खऱ्या अर्थाने कोणी एक दुसऱ्यापेक्षा मोठा किंवा पवित्र नाही, पण तुलनात्मकदृष्ट्या असे वैविध्य भासू शकते. जर हे संपूर्ण ब्रम्हांडच त्या अविनाशी ब्रम्हाचे स्वरूप आहे आणि प्रत्येक क्षणी त्या ब्रम्हाचाच प्रत्येक प्राणीमात्राच्या बाह्य आणि आंतरिक स्वरूपात अंर्तभाव असतो. असे असताना कोणाचीही निंदा वा टीका करणे अगदी अप्रस्तुत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या चांगल्या स्वप्नाची कोणी स्तुती करत नाही वा दुःस्वप्नाला दोष देत बसत नाही त्याचप्रमाणे कुठल्याही व्यक्तीचा, धर्मांचा वा संस्थेवर टीका करण्याचा उद्देश यात मुळीच नाही.

ज्याप्रमाणे परमपूज्य गुरू म्हणाले होते की जे कोणी हे पुस्तक वाचतील त्यांना ते पूर्णपणे समजेलच असे नाही. पण जरी दहा मधील एकाने त्याचे महत्त्व समजावून घेतले व शंभरातील वा हजारातील एकाने जरी आत्मसाक्षात्काराचा आनंद घेतला तर आपले प्रयत्न सफळ होतील, आणि गुरु आणि गुरुपरंपरा आत्यंतिक प्रसन्न होईल.

या पुस्तकात कोठेलेही चमत्कार नाहीत. जे काही लिहिले आहे ते सर्व लेखकांनी स्वत: अनुभवलेले आहे आणि त्यामुळे त्याचा अनुभव कोणीही घेऊ शकतो. जर या लेखकासारखा सर्वसामान्य मनुष्य जर आत्मज्ञान मिळवू शकतो तर ते सर्वांनाच साध्य का असणार नाही! त्यासाठी कोणत्याही खास कौशल्याची गरज नाही. सर्वस्वाचा त्याग आणि केवळ धीरोदत्त मनोनिग्रहाची गरज आहे.

हे पुस्तक आकारास येण्यामागे आपल्या काळातील महान पण प्रसिद्धीपरांङमुख संत सद्गुरू विद्यानंद यांचा शुभ आशिर्वादच कारणीभूत आहे. लेखक हे पुस्तक गुरुंना समर्पित करताना स्वत:ला त्यांच्या पवित्र चरणांच्या धूलीकणा समान मानतात. या पुस्तकाच्या निर्मितीत ज्या सर्वांनी हातभार लावला त्यांचे लेखक आभारी आहे.

हे पुस्तक भक्तीभावाने वाचणाऱ्या सर्वांवर ब्रम्हा, ऋषी, गुरूपरंपरा यांची कृपा होऊन शांती आणि भरभराटीचा लाभ होवो !

– स्वामी विराजेश्वर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..