न्यूझीलंडला जाण्याआधीच त्याच्या सृष्टीसौंदर्याबद्दल, तिथल्या रस्त्यांच्या चढ-उतारांबद्दल, निरम आकाशाबद्दल इतकंच काय पण तगड्या गाईबद्दलही खूप वर्णनं ऐकली होती, वाचली होती. हल्ली स्वित्झर्लंड खूप महाग झाल्याने बऱ्याच सिनेमांचे शूटिंगही न्यूझीलंडमध्येच होते ही माहितीही आमच्या पोतडीत जमा झाली होती. त्यामुळे न्यूझीलंड पहाण्याची इच्छा प्रबळ झाली व आम्ही एका कंडक्टेड टूरचा तपास सुरू केला. आमच्या वेळेसाठी योग्य अशी ‘जेट अबाउट’ ची एक टूर बऱ्याच प्रयत्नाने मिळाली. यावेळी आमच्या टूरमध्ये आम्ही दोघे व आमचा मुलगा असे तीनच प्रवासी होतो. त्यामुळे कुठेही स्पेशल बस नव्हती. टूरमध्ये वाइटोमो केव्हजचा समावेश आहे असे वाचले तेंव्हा खरंतर थोडी नाराजीच झाली कारण अशाच प्रकारच्या चुनखडी (लाइमस्टोन) च्या गुहा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशियात पाहिल्या होत्या. इथे आणखी वेगळं काय दिसणार? एखादे वेगळे प्रेक्षणीय स्थळ असायला हवे होते, असे वाटले. पण इलाज नव्हता. शेवटी टूरच्या आखलेल्या कार्यक्रमानुसारच जावे लागते. पण तिथे आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव येणार आहे याची कल्पनाच नव्हती. ऑकलंडची प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली. किती प्रचंड चढउतार या शहरात आहेत याचे आश्चर्य करून झाले. मोटारी कशा पुढची दोन चाके फुटपाथवर चढवल्याखेरीज व्यवस्थित पार्क करता येत नाहीत याचीही नोंद घेऊन झाली. ऑकलंडच्या टॉवर वरून आजुबाजूचे विहंगम दृश्य डोळे भरून पाहिले व टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेस्कच्या खूप उंचीवरच्या काचेच्या जमिनीवरून चालण्याचा विलक्षण अनुभवही घाबरत घाबरत घेतला. दोन-तीन दिवस शहरात मस्तपैकी भटकून झाल्यावर आम्ही पुढचा मुक्काम-रोटोरुआ कडे जायला निघालो. इथल्या प्रवासाची जरा वेगळीच गंमत दिसली. आम्हाला विमानतळावरून जो गाईड कम कार ड्रायव्हर हॉटेलवर घेऊन आला तो परत कधीही दिसला नाही. रोज नवीनच माणूस आम्हाला ऑकलंड दाखवायला न्यायचा, तोच माहिती सांगायचा व दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम हॉटेलची रिसेप्शनीस्ट सांगायची. तसे ऑकलंड सोडायच्या वेळी नवीनच माणूस आला व आम्हाला बस स्टँडवर घेऊन गेला. ऑकलंडच्या स्टँडवरून निघणाऱ्या प्रवासीबसने आमचा पुढचा प्रवास होता. ऑकलंडपासूनचा प्रवास हायवेवरून होता. रस्त्याच्या एका बाजूला स्वच्छ नदी होती तर दुसऱ्या बाजूला मोठमोठी चराऊ कुरणे. त्यात गाई व मेंढ्या चरत होत्या. जमीन किती सुपीक होती ते त्यांच्या आकारावरूनच समजत होते. त्यांची राखण करणारे कुत्रे भीतीदायक दिसत होते व तगडे घोडेही चरताना दिसत होते. माणसे मात्र अभावानेच दिसली. कधी सरळसोट तर कधी वळणे घेणारा काळाभोर रस्ता समोर दिसत होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मात्र फारशी दिसत नव्हती. आजुबाजूचे निसर्गसौंदर्य पाहतापाहता दोन तीन तासांचा प्रवास कसा संपला कळलेच नाही आणि आम्ही वाइटोमो डिस्ट्रिक्ट मधल्या ‘केव्ह’पाशी आलो. जेवणाचा स्टॉप वायटोमो केव्हजचा होता. बस थांबताच स्थानिक गाईड पुढे आला आणि त्याने बसमधल्या प्रवाशांचा तांडा ताब्यात घेतला. सगळे त्याच्यामागोमाग निघाले.
समोर वाइटोमो केव्हजची दिशा दर्शविणारा एक उंच खांब टॉटेम पोल होता. त्यावर मावरी पद्धतीचे कोरीवकाम खूपच छान होते.
समोर एक छोटीशी टेकडी अन् त्यामागे आणखी काही तुरळक टेकड्या.
‘वाइटोमो केव्हज’ हे आता प्रवासी लोकांसाठी एक आकर्षक ठिकाण झाल्याने ह्या गुहा व त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी झालेली आजुबाजूची वस्ती एवढाच काय तो वाइटोमो खेड्याचा पसारा दिसत होता. वीस लाख वर्षांपूर्वीपासूनच्या या ४-५ गुहांच्या आस्तित्वाची ‘मावरी’ लोकांना कल्पना होती. परंतु अंतर्भागात शिरण्याचा रस्ता, आतील रचना वगैरे गोष्टी स्थानिक मावरी प्रमुख ‘त्याने तीनोराउ’ ह्याने इंग्लिश संशोधक ‘फ्रेड मेस’ह्याच्या मदतीने १८८७ च्या सुमारास शोधून काढल्या, आणि आपली पत्नी ‘हुती’ व इतर कुटुंब सदस्यांच्या मदतीने प्रवासी लोकांना या गुहा अत्यल्प फी आकारून दाखवायला सुरुवात केली. प्रवाश्यांची संख्या वाढत गेली तसतसे प्रशिक्षित वाटाडेही तयार होऊ लागले. १९०६ मध्ये सरकारने या गुहांची व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन गुहेत दिवे, रस्ते, कठडे इत्यादी सोई केल्या आणि १९८९ च्या सुमारास त्या गुहांचा ताबा परत ताने तीनोराऊ यांच्या वारसांना मिळाला.
न्यूझीलंडचे मूळ रहिवासी मावरी. भरपूर उंच धिप्पाड म्हणावे अशी अंगकाठी. पण काटक, चपट्या नाकाचे, तांबूस वर्णाचे मावरी वृत्तीने लढवय्ये असले तरी शिक्षणाअभावी त्यांचा गोऱ्यांपुढे टिकाव लागला नाही. पण न्यूझीलंड मध्ये त्यांच्या भाषेचा ठसा कायम आहे. वाइटोमो हे नाव मावरी भाषेतलेच. ‘वाइ’ म्हणजे पाणी, ‘टोमो’ म्हणजे जमिनीतील पोकळी किंवा खाच. म्हणजे वाइटोमो ह्याचा साधा अर्थ “जमिनीखालच्या भोकातून वाहणारे पाणी” हा भूभाग लक्षवधी वर्षे समुद्रतळाशी एकावर एक साठलेल्या चुनखडी दगडांचा व त्यामधल्या प्राण्यांच्या अवशेषांचा तयार झालेला आहे. भूगर्भात सतत चाललेल्या हालचालींमुळे या चुनखडीच्या (लाईमस्टोन) टेकड्या वर आल्या. समोर दिसत होती ती टेकडी पांढरट चॉकलेटी, क्वचित ठिकाणी अंगाखांद्यावर झुडुपे, गवत वागवणारी होती. टेकडीच्या खडकांचा रंग बऱ्याच ठिकाणी काळपट लालही होता. एकूणच दृश्यात बाहेरून तरी खास आकर्षक काही नव्हते. ग्लोवर्म केव्ह, रुआकुरी केव्ह, अरानुई केव्ह, आणि गार्डनर केव्ह यांचा समूह म्हणजे वाइटोमो केव्हज. या पैकी अरानुई केव्हजच्या पोटात जाण्यासाठी आम्ही तयार झालो.
टेकडीच्या चढण्याचा मार्ग पायऱ्या पायऱ्यांचा व काही ठिकाणी सपाट होता. टेकडीच्या जवळ जवळ अध्र्या उंचीपर्यंत चढल्यावर आम्ही टेकडीमध्ये तयार केलेल्या भुयारात शिरलो. लाकडी फळ्या टाकून २-३ माणसे एका वेळी जाऊ शकतील अशी वाट केली होती. त्यावरून आम्ही भुयारात चालू लागलो. आजुबाजूला अगदी अंधुक उजेड होता. जास्त प्रखर प्रकाशाचा चुनखडीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून ही खबरदारी असे गाईडने सांगितले. आधारासाठी कडेच्या कठड्याची सोय होती म्हणून बरे. कारण अंधारात अडखळायला झाले तरीही झीज होईल म्हणून बाजूच्या चुनखडीच्या दगडांना हात लावायला परवानगी नव्हती. मधे मधे थोड्या थोड्या अंतरावर ऑब्झरवेशन डेकसारखे मंच तयार केले होते. तिथे थोडे थोडे प्रवासी एकत्र नेले जायचे व पटकन दिवे लागायचे. समोरचे दृश्य एकदम प्रकाशमान व्हायचे.
प्रत्येक वेळी समोर वेगळेच दृश्य दिसायचे. कधी नाटकाचा रंगमंच तर कधी दोन डोंगरांच्या आडून डोकावणारा सूर्य. मधूनच उडणारे पक्षी त्यातभरच घालायचे. एका ठिकाणी प्रकाशझोत अशा तऱ्हेने अचानक फिरला की जणू नायलॉनचा एक तलम झिरझिरीत पडदाच एका बाजूने उलगडत उघडत जातोय. रंगीबेरंगी दिव्यांच्या झोताने त्यात अनेक रंग भरले आणि एक अप्रतिम दृश्य नजरेसमोर साकार झाले. पहाता पहाता संपूर्ण पडदा वरच्या बाजूला गुलाबी, मधे मधे हिरव्या, पांढऱ्या, केशरी, निळ्या, रंगांनी न्हाऊन निघाला आणि सोनेरी रंगाच्या झालरीने अधिकच सुशोभित झाला.
जेमतेम दीड-दोन मिनिटांचा खेळ, पण या अगोदर बऱ्याच पायऱ्या चढण्याचे झालेले श्रम विसरायला लावणारा होता. प्रवाशांच्या प्रत्येक समूहाबरोबर असणारे गाईड त्या नयनरम्य दृश्याचे सुरस वर्णन करून त्या दृश्यात आणखी रंग भरत होते. पुन: मिणमिणत्या प्रकाशात पुढची वाटचाल सुरू झाली तरी डोळ्यासमोर मात्र पडद्याची उघडझाप चालूच होती. डोंगराच्या वरच्या बाजूने भेगांमधून खाली झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबांबरोबर चुन्याचे कण वाहून येतात. गुहांच्या छपरापासून हे थेंब ठिबकतात व असे चित्रविचित्र आकार-स्टॅलॅक्टाइट व स्टॅलॅग्माइट-छपरापासून निघतात आणि तळाशी तयार होतात. पुढे अशी बरीच गंमत जंमत करणारी दृश्ये होती. कुठे खांब छतापाशी लटकतोय तर कुठे अर्धवट लोंबकळणारी भिंत तर कुठे रंगमंच. त्यातच गाईडने “समोर जो उंच सुळका दिसतोय ना त्यावर चढून विवाहबद्ध होण्यासाठी प्रेमी युगुलेही कधी कधी येतात’ असे सांगितले व नवीनच दृश्य डोळ्यांसमोर साकार झाले. कडक सुटाबुटातला प्रियकर व पांढऱ्या पायघोळ वधुवेशात नटलेली प्रेमिका एकमेकांना आधार देत हातात हात घालून त्या अरूंद उंच सुळक्यावर उभे आहेत व टाळ्यांच्या गजरात एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देताहेत….नजरेसमोर मस्त दृश्य साकार होत होते. धन्य त्या प्रेमिकांची! पण प्रश्न एवढाच पडला की पाद्रीबाबा आणि वऱ्हाडी कुठे उभे राहिले असतील?
चुनखडीपासून तयार झालेली शिल्पे पहात पहात आम्ही पुढे सरकत होतो. प्रत्येक दृश्याचे काही वेगळेच रंगरूप होते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे नवीन बघण्यासारखे असतेच याचा पुन: प्रत्यय आला. डोंगराच्या पोटात किती पायऱ्यांची चढ उतार झाली असेल त्याची आमचे थकलेले पाय अधूनमधून जाणीव करून देत होते. पोटातले कावळेही आता भुकेची आठवण करून देत होते. दोन तास कसे संपले कळले देखील नाही. आम्हाला बाहेर पडायचे नव्हते तरी पायाखालची वाट हळूहळू प्रकाशमान व्हायला लागली व आम्ही डोंगराच्या पोटातून बाहेर आलो. नाही म्हटले तरी चुनखडीच्या कोंदट वासातून मोकळ्या हवेत आल्यावर खूप बरे वाटले. सगळ्यांची पावले आपोआपच पोटपूजेकडे वळली. तिथे असणारे छोटेसे उपहारगृह व सुव्हीनीयर विकणारे एक लहानसे दुकान आमची वाट पहात होते. त्याला यथाशक्ती आश्रय देऊन आमचा मोर्चा ‘ग्लोवर्म केव्हज’ कडे वळला.
त्यासाठी आम्हाला डोंगराला थोडा वळसा घालून बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावे लागले. खाली जाईपर्यंत कल्पना नव्हती की, पुढचा प्रवास छोट्याशा नदीतून होता. पायऱ्या जिथे संपल्या तिथे रूंद प्लॅटफॉर्म होता. त्याच्या धक्क्याला छोटीशी बोट आमची वाट पहात होती. नदीच्या पाण्यात डोंगरावरची चुनखडीची वेगवेगळी लोंबणारी झालर आपले प्रतिबिंब पहात होती. आम्ही बोटीत बसताच चालकाने ती बांबूच्या सहाय्याने डोंगराच्या पोकळीत ढकलली.
दहा-बारा माणसे बसू शकतील अशी एक छोटी होडी जेमतेम जाऊ शकेल एवढीच रुंद नदी डोंगराच्या अंतर्भागातून वहात होती. तिचा उगम व शेवट कुठे होत होता कोण जाणे. असा नदीचा प्रवाह मी पहिल्यांदाच पाहिला. काळेशार पाणी व दोन्ही बाजूंना डोंगराच्या पोटातील बोगद्याची भिंत. त्यावर सतत पाणी झिरपत होते. हवा थंडगार होती. पाण्याचा व होड्यांचा चुबुक डुबुक असा आवाज येत होता. आम्ही होडीत बसताच प्रवाहाबरोबर होडी अलगद पुढेपुढे जाऊ लागली. गाईड गप्प होता. आम्हालाही बोलणे सुचत नव्हते. फक्त नावाडीच काय ते एकमेकांशी संपर्क साधण्यापुरते बोलत होते. मी तर ‘हा नावाडी आता वल्हे कसे मारणार?’ या विचारात होते कारण हात लांब केला तर भिंत लागे, एवढीच बोगद्याची रुंदी होती. लांबवरचं फार काही दिसत नव्हतं. जेव्हा पायऱ्या उतरून खाली आलो होतो, तेव्हा लख्ख नाही पण सगळीकडचं साधारण दिसू शकेल इतपत उजेड होता. होडीत बसलो तेव्हाही आजूबाजूचे झिरपणारे पाणी, समोरचा प्रवाह, थोड्या अंतरावर एखादी होडी दिसत होती. पण होडी चालू झाली अन सगळं बरंच अंधुक झालं. तरीही भिंती नावाडी वगैरे दिसत होते. ‘वल्ही कशी मारणार’ याचे उत्तर लगेच मिळाले. नावाडी उभा राहिला आणि त्यानं वर लावलेला आडवा दोर धरून त्याच्या आधाराने होडी पुढे न्यायला सुरुवात केली. “पाण्यात हात घालू नका, वाकू नका, अनावश्यक आवाज करू नका…” वगैरे आवश्यक सूचना देऊन तोही गप्प झाला. होडीखेरीज दुसरा आवाज नव्हता. आम्ही कुठून कुठे जात होतो काहीही कळत नव्हतं. ५-१० मिनिटे पाण्यातून पुढे गेल्यावर अचानक धबधब्याचा ध्वनि ऐकू आला.
डोंगराच्या आतच साधारण २५ फूट उंचीवरून पाणी खाली पडत होते. अगदी एका रेषेत पडणारे पाणी आपल्या आवाजाने आजुबाजूची शांतता भंग न करण्याची पूर्ण काळजी घेत होते. या ठिकाणी एक-दोन पांढरे व एक-दोन रंगीत दिवे होते. त्यांचा उजेड पाण्यावर पडून वेगवेगळ्या रंगछटा निर्माण होत होत्या. खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार इंद्रधनुष्याचे रंग घेऊन चमकत होते, क्वचित आम्हालाही भिजवत होते. खूपच छान दृश्य होते ते. त्याचे फोटो काढून आम्ही पुढे सरकलो. पुन्हा दिव्यांच्या उजेडाची सोबत संपली व होड्या अंधाराच्या पोटात घुसल्या.
नदीच्या पात्रातील एका घुमटासारख्या मोठ्या गोलाकार जागेत आमची होडी थांबली. आता मात्र सगळीकडे मिट्ट काळोख होता. पण डोळे अंधाराला सरावल्यानंतर इकडे तिकडे थोडेफार दिसू लागले. पाण्यावर छोटे छोटे प्रकाशाचे ठिपके नाचत होते. जणूकाही पाण्याच्या पृष्ठभागावर छोट्या छोट्या दिव्यांची रांगोळी काढल्यासारखे दिसत होते. आम्ही पाण्यातले दृश्य पहाण्यात गर्क होतो तोच एकदम गाईडचा आवाज आला–“वर बघा.” सगळ्यांच्या माना एकदम वर गेल्या. काय चमत्कार…….आकाश आणि चमचमणाऱ्या चांदण्या!!!!! बोलायचे नव्हते तरी हलक्या आवाजात “वाव” अस चित्कार तोंडून निघालाच. जणू संपूर्ण डोंगरमाथा कापून काढला होता आणि आपण बाहेर मोकळ्यावर आलो आहोत असे वाटू लागले. काळेभोर निरभ्र आकाश व चमचमणाऱ्या असंख्य चांदण्याच चांदण्या. पण चांदोबाचा पत्ता नव्हता. सहजच आम्ही तिघे नक्षत्रे ओळखायच्या प्रयत्नाला लागलो… अश्विनी, भरणी, मृग, सप्तर्षी-एक ना दोन. आणि मग लक्षात आले की या तारका नसून हे Arachnocampa luminosa या जातीचे, डासाच्या आकाराएवढे, बहुतांश करून न्यूझीलंड मध्येच आढळणारे काजवे आहेत. गुहेच्या छतावर असणारा हा कीटक अद्भुत, थक्क करणारी किमया दाखवीत होता. निळसर, पांढरे, हिरवट, असे असंख्य छोटे मोठे लुकलुकणारे प्रकाशाचे बिंदू छतावरून इकडून तिकडे हलत होते. त्याच्या लुकलुकण्यामुळे अगदी चांदण्यांचा भास होत होता. आम्ही ते अद्भुत दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होतो. एखाद्या गर्भरेशमी चंद्रकळेसारखे काळेभोर छत चमचमत्या खडीने शोभिवंत दिसत होते.
‘चमचम तारापुंज भूषणे शोभिवंत वसनी
ज्योत्स्नेचे मृदु वस्त्र रेशमी ल्याली ती रजनी’
कालिदासाच्या काव्याची आठवण झाली नसती तरच नवल! अनेक प्रवाशांची मात्र घोर निराशा झाली असणार, कारण फ्लॅश फोटोग्राफी मना होती.
अनिमिष नेत्रांनी पापणीही न लववता आम्ही ते दृश्य पहात होतो. तेवढ्या वेळात नावाड्याने होड्या अशा चलाखीने वळवल्या की, एकाद्या प्लॅनेटेरियममध्ये बसल्यासारखे आकाश संपूर्ण तारकासमूहासह आमच्या भोवती फिरले. होड्या पुढेमागे करून, एकमेकांना वाट करून देत नावाडी चलाखीने परतपरत त्या आकाशमंडलाखाली आम्हाला आणून हा अनोखा अनुभव देत होते. हे दृश्य पहाता पहाता नावाड्यांनी होड्या कधी बाहेरच्या दिशेने वळवल्या कळलेसुद्धा नाही. परतीच्या प्रवासात सुद्धा काजव्यांचे भिंतींच्या कपारींवर झालेले गुच्छ, छतावरून लोंबकळणाऱ्या माळा आमचे लक्ष वेधून घेत होत्या. मधून मधून आजुबाजूच्या भिंतींवर व छतावर चुकारकाजवे आपला कळप सोडून हिंडताना दिसत होते. जणू काही आम्हाला ‘लौकर परत या बरं का, आम्ही वाट पहातोय” असा निरोप द्यायलाच ते आले होते. हा निरोप समारंभ चालू असतानाच हळू हळू प्रकाश वाढू लागला व आम्ही पायऱ्यांपाशी परत आलो. वीस-पंचवीस मिनिटांची ही काजव्यांची सफर एक विलक्षण अनुभव देऊन गेली. आज इतकी वर्षे झाली तरीही ‘ग्लो वर्म’ केव्हज मधल्या त्या काजव्यांच्या दुनियेची किमया स्मृतीतून कणभरही पुसली गेली नाही. अगदी छोटेसे आयुष्य असणारा, अंधाराशिवाय इतरवेळी लक्षातही न येणारा जीव दुसऱ्याला किती मोठा आनंद देतो हे अनुभवल्यावर आपण त्या काजव्यांना “धन्य ही जीवनकळा…” एवढेच म्हणू शकतो.
–अनामिका बोरकर
Leave a Reply