प्रेम हा विवाह जीवनाचा पाया आहे. प्रेमात शारीरिक आकर्षण हा फार मोठा भाग आहे, पण त्याचबरोबर प्रेम हे मानसिक व भावनिक पातळीवर रुजले असेल तरच शारीरिक पातळीवर टिकू शकते. लग्नामुळे दोन वेगवेगळ्या आर्थिक, कौटुंबिक, स्वाभाविक आणि काही वेळा वेगवेगळ्या जातीधर्मातील व्यक्ती आयुष्य एकत्रित घालवण्याच्या ओढीतून एकत्र येतात, स्त्री पुरुषांमधल्या नैसर्गिक आकर्षणामुळे विवाहाने एकत्र बांधले जाणे ही एक वेळ सोपी गोष्ट आहे, पण वैवाहिक जीवन चिरकाल तरूण ठेवून बहरण्यासाठी मात्र विचारपूर्वक पावले टाकावी लागतात व पतीपत्नी दोघांचीही तशी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते.
दुसरी व्यक्ती ही पूर्णतः वेगळ्या वातावरणातून आलेली आहे, तिच्या घरचे संस्कार, रीतीरिवाज, खाण्यापिण्याच्या सवयी या पटकन् बदलून त्या व्यक्तीने आपल्या घराप्रमाणे बदलावे अशी इच्छा असणे, म्हणजे नात्याच्या भिंतींना फटी पडण्याची सुरुवात असते. आपल्याकडच्या पितृप्रधान संस्कृतीत विशेषतः वीस-बावीस वर्षानंतर स्त्री जेव्हा विवाह करून सासरी येते, त्यानंतर तिने तात्काळ आपल्या परंपरेचे भागीदार व्हावे अशी नवऱ्यापासून सासरच्या सर्व लोकांची अपेक्षा असते. याबाबतीत लवचिकपणा आणि दुसऱ्या व्यक्तीला वेळ देण्याची गरज असते. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहात तर प्रत्येकाला आपल्या श्रद्धा व निष्ठा जपण्याचे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.
अॅटलांटामधील एमरी विद्यापीठाच्या समाजविज्ञान विभागातील प्राध्यापकांनी विवाह टिकण्याच्या काही कारणांचे सर्वेक्षण केले आहे. त्यांच्या मते विवाह जेवढे अधिक खर्चिक तेवढा घटस्फोटाचा धोका अधिक, पति-पत्नी दोघेही मिळवते असतील तर ते लग्न जास्त काळ टिकते. लग्नात जास्त व्यक्ती हजर असतील तर घटस्फोटाची शक्यता कमी, मधुचंद्राला जाणारी व नियमित चर्चमध्ये जाणारी जोडपी दीर्घकाळ विवाह बंधनात राहतात. प्रेम, परस्परांवरील विश्वास व परस्परांना आधार देण्याची प्रबळ इच्छा या तीन खांबांवर विवाह आनंदी राहतात.
आपल्याकडील वातावरणाच्या संदर्भात यातील काही मुद्यांचा विचार करता येईल खर्चिक लग्ने आपल्याकडेही सर्रास होऊ लागली आहेत, पण ज्यावेळी वधुपक्षावर सर्व आर्थिक भार टाकला जातो, अडवून पैशांची, हुंड्यांची मागणी होते आणि विवाहानंतर सतत माहेराहून पैसे आणण्यासाठी नववधूचा छळ प सुरू होतो, तेव्हा अशा लग्नांचा शोकपर्यवसायी शेवटी होतो. हुंडाबळींची संख्या आजही भारतात कमी नाही. कौटुंबिक अत्याचार सहन करत मानसिक दबावाखाली जगणाऱ्या स्त्रियांचे लग्न टिकले म्हणून त्या सुखी असतातच असे नाही.
रजिस्टर लग्नापेक्षा नातेवाईक, साक्षीने मित्रमंडळींच्या धार्मिक विधिवत बांधल्या गेलेल्या लग्नगाठीत एक प्रकारचा नैतिक दबाव असतो, त्यामुळे जमवून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. आपल्या विवाह संस्कारातूनही ही जाणीव निर्माण केली जाते. पती-पत्नी या नात्याला समान पातळीवरचे समजणे हे संवादी सहजीवनातले शाश्वत सत्य आहे. पती परमेश्वर अशी उतरंडीची व्यवस्था आली की त्यातून श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण होते आणि हुकुमशाही प्रवृत्तीचा उदय होतो. त्यातून पत्नीवर मालकी हक्क गाजवायला सुरूवात होते. विवाहापूर्वी घनिष्ट मित्र-मैत्रीण असलेले विवाहानंतर मात्र या भूमिका सोडून देताना दिसतात. खरे तर प्रेम हा शब्द इतका सर्वव्यापी आहे की त्याच्या अनेक आयामां सकट तो वैवाहिक आयुष्यात बहरत असेल तर नवपरिणत जोडप्यातला गोडवा वृद्ध दाम्पत्यातही टिकून राहतो. प्रेमामध्ये परस्परांवर विश्वास असणे फार महत्त्वाचे.
ऑथेल्लोने डेसस्डेमोनावर अक्षरशः जीव ओतून प्रेम केले, पण तिच्या चारित्र्यावरच्या केवळ संशयाने त्याने तिला गळा दाबून ठार केले. पत्नीवर छोट्या मोठ्या गोष्टींवर संशय घेणाऱ्या जोडप्यांचा शेवट कसा होतो, या विदारक बातम्या रोजच्या वृत्तपत्रात असतातच. विश्वास निर्माण करण्यासाठी परस्परांशी सतत संवाद असला पाहिजे. रोजच्या जीवनातल्या साध्या सुध्या घटनांबद्दल दिवस अखेरीस दोघांनी एकमेकांशी बोलले पाहिजे, त्यासाठी वेळ राखून ठेवायला हवा. नात्यावर गाढ विश्वास आणि मोकळेपणा असेल, तर आपल्या आयुष्यातील एखादे रहस्य वा वाकडे पडलेल्या पावलाची कबुलीसुद्धा एकमेकांना देता येते, व ती खुलेपणाने आणि उदारपणे स्वीकारण्याचे दुसऱ्याला बळ देते. नवऱ्याला मैत्रिणी असणे वा पत्नीला मित्र असणे या गोष्टी सुद्धा स्वीकारायला मनाचा मोठेपणा लागतो, फक्त या मैत्रीची मर्यादा दोन्ही बाजूंनी सांभाळाया हवी.
मैत्री ही सुद्धा प्रेमाचीच एक छटा आहे, म्हणूनच पती पत्नींमध्ये घनिष्ट मैत्री हवी; कारण शारीरिक आकर्षण वयाच्या एखाद्या टप्प्यावर कमी होऊ लागते, पण मैत्रीचे धागे घट्ट असतील, तर परस्परांबद्दल आकर्षण वर्षानुवर्षे टिकू शकते. यासाठी अर्थातच विचारपूर्वक काही योजना आखाव्या लागतात. समागमात तोच तोचपणा आला तर तो कंटाळवाणा होतो. सहभागी व्यक्ती तर त्याच आहेत, पण त्या यामध्ये नावीन्य निर्माण करू शकतात. नेहमीच्या जागा, पोझिशन्स, वेळा इत्यादीत बदल करण्याबरोबरच आणखीही अनेक बदल अंतःस्फूर्तीने करता येतात. मुले झाल्यावर अनेकांना समागम करणे हा अपराध वाटू लागतो. पुरुषांना ही ओढ जास्त असते व बायका त्यामानाने थंड असतात असा आपल्याकडे एक प्रचलित समज आहे, पण आपल्या देशात बायकोला भुकेली ठेवल्यावर अगदी कधीतरी तिला जवळ घेणारांची संख्याही कमी नाही. विशेषतः देवधर्माच्या नादी लागलेल्या पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने असते. बायकांना सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलण्याची मुभा अजूनही आपल्याकडे नाही, त्यांच्या लैंगिक भुकेचे फार वाईट अर्थ काढण्याकडेही अनेकांचा कल असतो. परस्परांच्या लैंगिक गरजा समजून घेतल्या आणि दुसऱ्याचा सन्मान सांभाळत हा आनंद घेतला, तर नाती सुंदर बनतात. मुलांव्यतिरिक्त ही मोठ्या माणसांचे एक वेगळे जग आहे हे समजून घ्यायला हवे, त्यामुळे मुले मोठी झाल्यावरही आपला खाजगीपणा जपणे महत्त्वाचे आहे.
त्यासाठी अधूनमधून जवळ वा दूर सहलीसाठी जाणे, तिथे सेक्सचा आनंद घेणे, परस्परांना निमित्ताने छोट्या, मोठ्या गोष्टी भेट परस्परांच्या छोट्या मोठ्या विजयाचे वा कर्तृत्वाचे मन भरून आणि मनापासून कौतुक करणे गरजेचे असते. स्त्रीला तिच्या नवऱ्याने तिच्या सौंदर्याचे कौतुक करणे, तिच्या दागिने, कपडे यांच्याबद्दल छान शेरे देणे, समागमा व्यतिरिक्त स्पर्श करणे, चुंबन घेणे या गोष्टी मनापासून आवडतात, तर पुरुषांना त्यांचा मान ठेवणे, त्यांना आदर दाखवणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ आवर्जून करणे, त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना आतिथ्य करणे वगैरे गोष्टी आवडतात. दोघांनी ही परस्परांची आवड जपली तर जवळीक निर्माण होते. आपल्यासारख्या आनंदी, सुखी जोडप्यांबरोबर कधी जेवण, पार्टी, सहल याचा विधायक फायदा लग्न चिरकाल तरुण टिकवण्यासाठी होतो. रोटरी, लायन्ससारखे सामाजिक देणे, उपक्रमसुद्धा पति-पत्नींना घराबाहेर एकत्र आणतात. उपद्रवी आणि दोघांत फूट पाडणाऱ्या तथाकथित स्नेह्यांना व नातेवाईकांना चार पावले दूर ठेवण्याचा सावधपणा बाळगणे अतिशय आवश्यक असते. पति-पत्नी यापैकी कोणाच्याच नातेवाईकांना नात्यात ढवळाढवळ करून देऊ नये. आईवडील वा सासू-सासरे कोणाबरोबरही आपण रहात असलोत तरी परस्परांचे नाते जपणे आणि विश्वासाने एकमेकांना आधार देणे महत्त्वाचे असते.
पैसा हे पुष्कळदा विवाहविच्छेदाचे महत्त्वाचे कारण असते. पती पत्नी दोघे मिळवत असतील तर परस्परांचे पगार, अन्य मिळकत एकमेकांना ठाऊक असायला हवी, पत्नी मिळवत नसेल तर पतीची जबाबदारी जास्तच वाढते. आपला पगार, आपले खर्च, आपली बचत याची संपूर्ण माहिती पत्नीला असणे आवश्यक आहे. तिला कधीही खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावा लागू नये. तिला तिच्या खाजगी खर्चासाठीही न मागता पैसे द्यायला हवेत व त्याचा हिशोब मागू नये. आपण मिळवत नाही असा कोणताही अपराध गंड स्त्रीच्या मनात निर्माण होऊ नये. बचत ही दोघांच्या समायिक नावावर असावी. पैसा खर्च करण्याच्या बाबतीत दोघांनाही स्वातंत्र्य हवे, तर त्यासाठी दुसरी व्यक्ती अनाठायी खर्च करणार नाही याबद्दल विश्वास हवा. मिळवत्या स्त्रीलाही अनेक घरातून हे स्वातंत्र्य नसते. पैशामुळे वादावादी होऊ नये यासाठी अनेकदा स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागते, पण ही पाळी फक्त स्त्रीवरच येऊ नये, तुटू नये म्हणून किती ताणायचं याचं भान दोघांनाही हवं.
नुसतं गोड खाऊन जिभेला नेहमीच कंटाळा येतो. त्यासाठी अधूनमधून तिखट पदार्थांची चव चाखावी लागते, म्हणजे गोडाची गोडी वाढते, त्याचप्रमाणे नुसते गोड बोलून, गोड वागून नाते टिकत नाही. विवाह बंधनाचे एकत्र येणाऱ्या दोन व्यक्ती स्वतंत्र स्वभावाच्या असतात. त्यामुळे वादविवाद, मतभेद होणे स्वाभाविक आहे, पण त्याचे रूपांतर संघर्ष, भांडणे, मारझोड करणे यात होऊ नये याची काळजी दोघांनी घेतली पाहिजे. अबोला काही वेळापर्यंत ठीक असतो, पण मतभेदाच्या मुद्याशिवाय अन्य बाबी लक्षात घेऊन अबोला मिटवावा लागतो. पति-पत्नीतल्या ताणलेल्या संबंधांचा विपरीत परिणाम मुलांवर होतो. मुलांना आई-वडिलांमधील जास्त जवळीक आवडत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी सतत भांडणेही आवडत नाही. हा समतोल साधणे पति-पत्नींचे पालक म्हणून कर्तव्य असते. सतत शब्दाला शब्द वाढत असतील, तर समुपदेशकांचा सल्ला घेण्यातही काही वावगे नाही. दोघांव्यतिरिक्त ही तज्ज्ञ व्यक्ती दुराव्याची कारणे दाखवून दोघांना एकत्र आणू शकते. भांडणातही वैयक्तिक हल्ले, वर्मावर आघात करणारे कापरे शब्द वापरणे किंवा भावनिक ब्लॅकमेल करणे कटाक्षाने टाळायला हवे.
परस्परांपेक्षाही वेगळे जग आहे याची जाणीव हवी. ज्याला दुसऱ्यासाठी ‘स्पेस’ देणे म्हटले जाते, त्यात आपल्या जोडीदाराचे आपल्या व्यतिरिक्त खाजगी आयुष्य जपणे महत्त्वाचे असते. दुसऱ्याचा छंदगाणे, वाचणे, भटकणे, नाचणे, चित्र काढणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी दुसऱ्याला स्वातंत्र्य, वेळ, जागा, पैसा, स्वास्थ्य उपलब्ध करून देणे ही त्याची मानसिक गरज असते. व्यक्ती त्यातूनच समृद्ध होत असते. व्यक्ती परस्परांनी दुसऱ्याची स्पेस मनापासून जपली पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पुरुषांचा जास्त वेळ बाहेर गेला तर बायका रुसतात, किंवा बायकांना प्रसिद्धी मिळाली तर पुरुषांमध्ये मत्सर जागृत होतो. यामुळे माणसे मनातून उतरतात.
व्यापक अर्थाने परस्परांवर प्रेम असेल तर असे प्रसंग टाळता येतात. लग्नानंतर व्यक्ती फक्त वयाने वाढत नाही, तिचे दृष्टीकोन व्यापक व्हायला हवेत. स्वतःबरोबरच जोडीदारालाही भावनिक परिपक्वता आणायला हवी. हलकासा विनोदाचा शिडकावा नाते नेहमीच प्रसन्न ठेवतो, पण त्यात विखार असू नये. जे संकटात, वृद्धत्व आल्यावर, आजारपणाने दुसरी व्यक्ती पछाडल्यावरही परस्परांना आधार देते ते खरे नाते असते. दुर्धर रोग, अल्झायमरसारखे आजार, अंथरुणाला वर्षानुवर्षे खिळून राहण्याची वेळ येणे हे नात्याच्या कसोटीचे क्षण असतात. पूर्वायुष्यातील ऋणानुबंध घट्ट असतील तर उत्तर आयुष्यात असे प्रसंग सहन करण्याची शक्ती मिळते. कोणीच व्यक्ती शंभर टक्के परिपूर्ण नसते, आपण सगळेच शेवटी एका मातीचे घडलो आहोत, त्यामुळे जोडीदार आहे तसा स्वीकारणे, त्याच्यातील गुणदोषांसकट हे जास्त महत्त्वाचे असते. घटस्फोट ही अंधारातील उडी असते, त्यामुळे या धोक्यापेक्षा समंजसपणे आपल्या प्रयत्नातून आपल्या भोवती उजेड निर्माण करणे जमले तर आयुष्य सुंदर होऊन जाईल.
– डॉ. अश्विनी धोंगडे
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply