ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात.
जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे.
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोरपणे वागत असत.
अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक सचिव नेमला व त्याची नियुक्ती करतानाच त्यांनी त्या सचिवाला आपण वेळेबाबत किती आग्रही आहोत हे स्पष्टपणे सांगितले तसेच त्यानेही वेळेचे बंधन पाळावे म्हणून त्याला त्यांनी स्वत: एक खास सोनेरी घड्याळ भेट म्हणून दिले. ते सोनेरी घड्याळ पाहून तो सचिव खूष झाला.
सुरुवातीचे काही दिवस त्या सचिवाने वेळेचा काटेकोरपणा बऱ्यापैकी सांभाळला. मात्र नंतर नंतर वेळेच्या बाबतीत त्याचा हलगर्जीपणा सुरू झाला. जॉर्ज वाशिंग्टन यांच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी त्याला बोलावून घेतले व दिलेली वेळ पाळण्याचा सल्ला दिला.
त्या वेळी सचिवाने आपल्या हातातील त्या सोनेरी घड्याळाकडे पाहात घड्याळ मागे पडत असल्याची तक्रार केली तर दुसऱ्या वेळेला चावी देऊनही घड्याळच बंद पडले असे सांगितले.
त्यावर जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाले की, घड्याळाविषयी तुझी तक्रार असेल तर तू तुझे घड्याळ बदल किंवा मी माझा सचिव बदलतो.
त्यांच्या या उत्तरामुळे सचिव वरमला व वॉशिंग्टनना नेमके काय म्हणायचे आहे ते समजला. त्यानंतर त्याचे ते घड्याळ कधीच मागेही पडले नाही वा बंदही राहिले नाही. सचिवही नंतर वक्तशीरपणा काटेकोरपणे पाळू लागला.
Leave a Reply