नवीन लेखन...

वक्तृत्वाचे सप्तसोपान

प्रसन्नवदन, रसाळ, ओघवती वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी-उर्दूतून सूफीझम ह्यावर देशात-परदेशात विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती.

बोलणं ही निसर्गाकडून माणसाला मिळालेली एक सुंदर भेट आहे. अर्थात ही भेट मिळण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये, शरीराच्या ठेवणीमध्ये पुष्कळ बदल झाले आणि हळूहळू ह्या बदलप्रक्रियेतून हळूहळू ह्या बदलप्रक्रियेतून आपण बोलू लागलो. एक शब्द उच्चारायचा तरी शरीराला, मेंदूला खूप श्रम असतात. पण आपण मात्र भरभरून शब्द वापरत असतो. ह्या सगळ्यांतून बोलणं ही आपल्यासाठी एक साधी सोपी गोष्ट होऊन गेली आहे. पण हेच बोलणं मोठं अवघड वाटू लागतं. कधी? मंचावर उभं राहून कोणी चार शब्द बोलायला सांगितलं की. मग एरवी चारशे शब्द सहज वापरणारे आपण ते चार शब्द शोधायला लागतो. असा नेमका काय बदल होतो? आपण तेच असतो. शब्द तेच असतात.

बोलणारी जीभही तीच असते. मग बदल होतो कुठे? तर –

१ त्याचवेळी आपल्याला ऐकणारा श्रोता असतो.

२ त्या एकमेकांशी मारलेल्या गप्पा नसतात.

३ एखादा विषय त्यात असतो.

४ सुसूत्रता आवश्यक असते.

५ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरवी साध्या बोलण्यात काही चूक झाली तर कुणी हसत नाही पण मंचावर चूक झाली तर… ह्या विचाराची धास्ती असते.

वर लिहिलेले मुद्दे, हाच बोलणारा आणि वक्ता ह्यातला फरक असतो. (संस्कृतात वक्ता म्हणजेच बोलणारा. पण आजच्या संज्ञेनुसार जो भाषण देतो तो वक्ता.) बोलणारे आपण सगळेच असतो पण सगळे ‘वक्ता’ नसतात. मंचावर साध्या बोलण्याचं एकदम वक्तृत्व होऊन जातं आणि एका क्षणात बोलणं ही एकदम गंभीर प्रक्रिया होऊन जाते.

बोलण्याचं वक्तृत्वात रूपांतर होण्यासाठी काय करायला दुसरे हवं? किंबहुना काय काय करायला हवं?

बोलणं ही फुलण्याची प्रक्रिया आहे तर ऐकणं ही जमिनीची मशागत करण्याची प्रक्रिया आहे. जर मशागत केली नाही तर, बी रुजत नाही. त्यामुळे बी रुजण्याआधी मशागत केली पाहिजे म्हणजे ऐकलं पाहिजे. खूप ऐकलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयांवर ऐकलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचं ऐकलं पाहिजे आणि समजून घेण्याच्या उद्देशाने ऐकलं पाहिजे.

काही जण एखाद्या वक्त्याचं ऐकतात आणि जसंच्या तसं दुसरीकडे बोलतात. नुसती मशागत केली की, फळ येत नाही. त्यासाठी बी पेरावं लागतं. हे बीज स्वतःच्या विचारांचं असावं. केवळ इतरांचं बोलणं आपल्या मुखातून बोलणारा वक्ता एखाद्या समारंभात छाप पाडून जाईलही पण त्याचा फार काळ टिकाव लागणार नाही.

म्हणून ऐकणं ही फक्त पहिली पायरी. त्यात आपल्या मनाला वेगवेगळे विषय ऐकण्याची, एकाच विषयावरचे वेगवेगळे विचारप्रवाह ऐकण्याची सवय लावायची. पूर्वग्रहदूषित मनाने ऐकू नये आणि फक्त वक्त्याचं ऐकावं. त्यावेळी आपण आपल्या मनाला शांत बसायला सांगावं. कारण बरेचदा आपण इतरांचं ऐकत असताना त्यावरचं आपलं मत, मतभेद मनात सतत सुरू असतात. त्यामुळे आपण त्याचं बोलणं समग्रतेने ऐकू शकत नाही. कदाचित त्याच्या बोलण्याचा अर्थ आपल्या परिप्रेक्ष्यातून लावतो. हे टाळण्यासाठी आपल्या मनाचा संवाद थांबवून फक्त ऐकावं. आणि ते ऐकून त्यावर मनन करावं. काल ऐकलं आणि आज बोललो, असं होत नाही. लोणचं जसं मुरावं लागतं तसे विचारसुद्धा मुरावे लागतात. तेवढा वेळ त्यांना द्यावा लागतो.

केवळ ऐकणं पुरेसं पडत नाही तर, वाचनही तितकंच आवश्यक. चांगलं, हरतऱ्हेचं आणि भरपूर. भरपूर ऐकणं, वाचणं म्हणजे आपल्या माहितीची, विचारांची कक्षा रुंदावणं. वेगवेगळ्या पुस्तकांतून कवी, लेखक त्यांचं अनुभवविश्व मांडत असतात. ते वाचताना आपल्याला ते विश्व दिसतं. जाणवतं. काही वेळेला अनुभवालासुद्धा येतं. सगळेच अनुभव आपल्याला आपल्या जगण्यात येत नाहीत. पण पुस्तकं मात्र आपल्याला विविध प्रकारचे अनुभव घेण्याची संधी देतात. वक्त्याचं अनुभवविश्व जेवढं समृद्ध तेवढं विविध विषयांना स्पर्श करत त्याला बोलता येतं. वेगवेगळ्या पडतो. श्रोत्यांच्या अनुभवविश्वाला साद घालता येते. जितकं वाचन समृद्ध भाषण उत्स्फूर्त असलं पाहिजे. पण उत्स्फूर्तता ही सुद्धा तितका शब्दसंचय श्रीमंत! वक्त्याचं सगळं अस्तित्व शब्दांवर रियाजातून येते. त्यामुळे पहिली काही वर्षं तरी भाषण लिहून असतं. म्हणून शब्दसाठा जितका जास्त आणि चांगला तेवढं बोलणं प्रभावी. योग्य जागी योग्य शब्द ही त्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट. ह्यासाठी श्रवण आणि वाचन ह्याला पर्याय नाही.

श्रवण आणि वाचन ह्यानंतर महत्त्वाची पायरी म्हणजे मनन, चिंतन. एखादं सूत्र, एखादा मुद्दा जो वाचनात किंवा श्रवणात आला तो मनात ठेवून त्यावर जाणीवपूर्वक चिंतन करायचं. एकाच मुद्याचे वेगवेगळे आयाम असतात. त्यातल्या जास्तीत जास्त आयामांना आपल्या विचारांतून पाहायचं. जे जे सुचेल ते लिहून काढायचं. अगदी वेळ नसेल तर निदान नोंद तरी करून ठेवायचं. ह्या तयारीच्या तीन पायऱ्या. ह्या पायऱ्यांना योग्य तितका वेळ द्यायलाच हवा. कुठलीही कला आणि तिचं सादरीकरण ही काही वर्षांची प्रक्रिया असते. अगदी मोठे मोठे वक्तेसुद्धा ह्याबाबतीत फार कटाक्षाने वागतात.

इरावतीबाई कर्वे ह्यांना एकदा एका संस्थेने व्याख्यानासाठी बोलावलं. त्यांना कुठला तरी एक विशिष्ट विषय हवा होता. इरावतीबाईंनी तारीख विचारल्यावर ते म्हणाले, “पुढच्या महिन्यात.” त्यावर बाई म्हणाल्या, “हा विषय हवा असेल तर तीन महिन्यांनंतरची तारीख देईन. कारण जरी हा माझ्या अभ्यासाशी निगडित विचार असला तरीही त्या विषयाच्या तयारीला मला तेवढा वेळ लागेल.” ते म्हणाले, “एकच तास बोलायचं आहे.” बाई म्हणाल्या, “एका तासाला तीन महिन्यांची तयारी तर हवीच!’ हा प्रसंग खूप बोलका आहे.

रवींद्र पिंग्यांनी आकाशवाणीवर काम करत असताना एकदा पु.लं.ना सांगितलं की, “तुम्ही एक १० मिनिटं बोला. मी ते रेकॉर्ड करतो. दोन कार्यक्रमांच्यामध्ये ते लावता येईल.” पु.लं.नी रेकॉर्ड कधी करायचं विचारलं. “आता लगेच!” असं उत्तर पिंग्यांनी दिलं. त्यावर पु.ल. म्हणाले, “मला अर्धापाऊण तासाचा वेळ द्या तयारीला.” “तुमच्यासारख्या पट्टीच्या वक्त्याला कशाला लागतोय एवढा वेळ?” असं पिंगे म्हणाले. त्यावर पु.ल. म्हणाले, “आकाशवाणीवरून उच्चारला जाणारा शब्द न् शब्द विचार करूनच बोलायला हवा. चुकीचं काहीही प्रसारित होता कामा नये. शब्द, विषय, मांडणी…हे सारं तपासावं लागतं. ” पट्टीचा वक्ता ह्या सगळ्या बाबींकडे असा फार बारकाईने बघतो. किंबहुना म्हणूनच त्याच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडतो. भाषण उत्स्फूर्त असलं पाहिजे. पण उत्स्फूर्तता हि सुद्धा रियाजातून येते. त्यामुळे पहिली काहि वर्षं तरी भाषण लिहून काढावं. त्यामुळे त्याचा ओघ लक्षात येतो. विषय पूर्ण मांडला जातोय की नाही, ते कळतं. अर्थात लिहून काढून नंतर पाठांतर मात्र अजिबात करू नये. विषयाची चौकट आणि मुद्यांचा क्रम मनात ठेवावा. पाठ केलं तर ऐन वेळी जे सुचेल त्याला आत घ्यायला जागाच मिळत नाही. आपल्या बोलण्याची शैली ही आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच असायला हवी. दुसरा वक्ता कितीही प्रभावशाली असला तरी तो आणि मी वेगळे आहोत ह्याचं भान असणं फार गरजेचं. नाही तर प्रति-अमुक, प्रति-तमुक तयार होतात. शैली हळूहळू विकसित होते. तिला विकसित व्हायला वाव द्यायला हवा.

फक्त बोलण्यावर लक्ष देऊन पुरत नाही. तर, एकंदर आपलं व्यक्तिमत्त्वसुद्धा विचारात घ्यावं लागतं. आपण उभे कसे राहतोय, बोलताना होणारी हालचाल, हावभाव हेही फार महत्त्वाचे. वक्त्याची एखादी सवय श्रोत्यांना त्रासदायक वाटू शकते. उदा.: सारखे हात खिशात घालणे- बाहेर काढणे, डोळे मिचकावणे, खाकरणे, ह्या सवयी वक्त्याला कळत नाहीत पण त्यामुळे श्रोता मात्र विचलित होतो. त्यामुळे आपल्या बोलण्यावरून त्याचं मन ढळेल असं काहीही करू नये, ह्याकडे लक्ष देणं हेही महत्त्वाचं. म्हणून तर व.पुं. सारखा मुरब्बी कलावंतसुद्धा आरशासमोर उभा राहून रियाज करत असे. वक्ता सर्वांगातून बोलतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.

आपलं बोलून झाल्यावर श्रोत्यांची दाद, टाळ्या जरूर स्वीकाराव्यात पण त्यातून बाहेर पडून आपल्या बोलण्याचं आत्मपरीक्षणही करावं. काय चांगलं होतं? काय तितकं परिणामकारक नव्हतं? चुका काय झाल्या? काय टाळायला हवं? काय पाळायला हवं? ह्याचा विचार करणं ही पुढच्या व्याख्यानाची तयारी असते. श्रवण-वाचन-मनन-लेखन-प्रत्यक्ष भाषण-आत्मपरीक्षण-सुयोग्य परिवर्तन अशी सात पायऱ्यांची वक्तृत्वाची शिडी किंवा हे वक्तृत्वाचे सप्तसोपान. ह्या प्रत्येक पायरीवर उभा राहायचा प्रत्येकाचा कालावधी वेगळा. पायऱ्या चढताना दम लागतोच. ही वक्तृत्वाची शिडी चढतानाही दम लागतोच.
थकायलाही होतं कधी कधी पण हे सप्तसोपान चढून गेल्यावर जी प्रत्यक्ष भाषणाची वेळ असते ती अत्यंत आनंददायी अशीच आपल्याला शब्दातीत आनंदाचे धनी बनवणारी.

ह्या सगळ्यातून आपलं व्यक्तिमत्त्व खुलतं. जगण्याकडे आपण अधिक डोळसपणे पाहू लागतो. आपले डोळे समाजात वावरताना उघडे राहतात. संवेदनशीलता वाढते. आपलं असणं अधिक आशयपूर्ण व्हायला लागतं.

चर्चिलने युद्धकाळात आपल्या केवळ भाषणांनी आपल्या देशवासीयांचं बळ वाढवलं. संत महात्म्यांनी आपल्या भाषणांतून लोकांच्या वेदना कमी केल्या. मार्टिन ल्युथर किंगसारक्या वक्त्याने आपल्या समाजाला गुलामगिरीतून मुक्त व्हायला उद्युक्त केलं. पु.ल.,अत्रे, ह्यांनी आपल्या भाषणांतून लोकांना हसवलं. रिझवलं.

बाबासाहेब पुरंदरेंसारख्या वक्त्याने शिवाजी महाराजांचा इतिहास जणू प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर जिवंत केला… किती तरी उदाहरणं देता येतील. बोलण्याची शक्ती किती अनन्यसाधारण असते ह्याचीच ही उदाहरणं. ह्याच कडीमध्ये आपलंही नाव असावं, आपल्या बोलण्याने आपणही लोकांच्या थोडं फार उपयोगी पडावं. खचलेल्या मनात आशा निर्माण करावी, पिचलेल्या मनगटात ताकद निर्माण करावी. अगदी काही नाही तर निदान चार घटका श्रोत्यांचं मन रिझवावं… अशी आतून इच्छा झाली की, मग ह्या कलेचा मार्ग दिसायला लागतो- नव्हे, तो प्रशस्त व्हायला लागतो.

-धनश्री लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..