ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. प्रेम आणि लग्न या दोन गोष्टी यात बाधा आणू शकतात असा विचार करून राजाने लग्नांवर काही काळ बंदी घातली. राजाविरुद्ध जनमत एकवटावे म्हणून व्हॅलेंटाईन आणि मेरियस यांनी पुढाकार घेऊन बंदी झुगारून लग्ने लावण्याचा धडाका लावला. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक होते. त्यांचे कृत्य म्हणजे राजद्रोह होता. राजाने त्यांना पकडले. शिरच्छेदाची शिक्षा सुनावली असूनही या व्हॅलेंटाईनने तुरुंगातही प्रेम केले. त्याने तुरुंगाधिकार्याच्या मुलीला आपल्या नादी लावले. मरणापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने म्हणे ‘लव्ह फ्रॉम युवर व्हॅलेंटाईन’ असे लिहिले होते. १४ फेब्रुवारी २७० मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. हा दिवसही नक्की नाही. तो जाणीवपूर्वक पेरण्यात आला, कारण हा दिवस म्हणजे रोमन देव-देवतांच्या ज्युनो नामक राणीचा गौरव दिवस होय. तोच या आक्रमकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरवून पुढे रोमन मूर्तींचा विध्वंस केला. राजद्रोह करणाऱ्याच्या नावाने आपण हा दिवस साजरा करावा काय? पाश्चात्यांच्या वैचारिक आक्रमणामुळे असे ‘दिवस’ साजरे करण्याचे फॅड आपल्याकडे बोकाळले आहे.
त्यातूनही महाविद्यालयीन जीवनात गम्मत म्हणून ‘प्रेमदिवस’ साजरा करायचा असेल तर ‘रुक्मिणी डे’ साजरा करा. माघ शु.दशमीला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह दिवस असतो तेव्हा साजरा करा. जगाला ज्ञात असलेला पहिला प्रेमसंदेश रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पाठवला. त्या गोष्टीला साडेपाच हजार वर्षांचा दिव्य इतिहास आहे. हे प्रेम राजद्रोह, बंडाळी वा अन्यांचे गळे घोटून केले गेले नव्हते. उदाहरणच हवे असले तर ते असे उदात्त आणि आदर्शवत हवे. रुक्मिणीने तिचा विवाह शिशुपालासमवेत ठरला आहे हे कळताच सुदेवाबरोबर संदेश धाडला. भागवतातील ५२ व्या अध्यायात श्लोक क्र.३७ ते ४३ यात तो आहे. सामराजाने यावर ‘रुक्मिणी हरण’ही पद्यरचना केली आहे. यात रुक्मिणी म्हणते-
या कारणे नियत म्यां वरिलासे भावे|येऊनिया त्वरित मज आजि न्यावे||
हा लागला जिव असे तुजवीण जाया|तू आपुली हरि करी मज आजि जाया||९४|| सर्ग-५
हे संपूर्ण काव्य रोचक आहे. श्रीकृष्णासारख्या नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयासक्त, सामर्थ्यवान, ज्ञानी, पराक्रमी वीरावर तिचे मन जडले आहे हे लक्षात घ्या. प्रेम असे असावे. तारुण्यातील प्रेममस्ती म्हणजे बहुतेक वेळा वासनेचा धिंगाणा असतो. त्याला हे असे ‘डे’ साथ देतात. तेव्हा राजद्रोही व्हॅलेंटाईनचे नाव टाका आणि उत्तुंग प्रेमाविष्काराच्या रुक्मिणीच्या नावाला पुढे न्या. युवाशक्तीने पुढाकार घेतला तर काही काळात हा ‘डे’ जगभर साजरा होऊ शकेल.
राष्ट्रजागर : डॉ.सच्चिदानंद शेवडे
पृ.१५६-१५७,
तृतीय आवृत्ती
गार्गीज प्रकाशन-वसई
Leave a Reply