नवीन लेखन...

वनशंकरी प्रातःस्मरण स्तोत्रम् – मराठी अर्थासह  

वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे  दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.

कर्नाटकातील वातापी (बदामी) जवळ चोलचगुड्ड गावी या सिंहावर आरूढ अष्टभुजा देवीचे स्थान असून मंदिर साधारण नवव्या शतकाच्या सुमारास बांधले गेले आहे. स्कंदपुराण, देवीभागवत इत्यादी ग्रंथांमध्ये या स्थानाचे वर्णन येते. पौष शु. अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत शाकंबरी देवीचे नवरात्र साजरे करण्यात येते.

श्रीमद् शंकराचार्यांनी हे प्रातःस्मरणस्तोत्र शार्दूलविक्रीडित व वसंततिलका या वृत्तात रचले आहे.

या माया मधुकैटभप्रमथिनी या माहिषोन्मूलिनी
या धूम्रेक्षणचंडमुंडमथिनी या रक्तबीजाशिनी ॥
शक्तिः शुंभनिशुंभदर्पदलिनी या सिद्धलक्ष्मी परा
सा चंडी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥

मराठी- जी सृष्टी निर्मितीस साधनीभूत असलेली ईश्वरी शक्ती आहे, जिने मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध केला, जिचे नेत्र करड्या रंगाचे आहेत, चंड आणि मुंड राक्षसांशी जिने युद्ध केले, जी रक्त बीज राक्षसाचे रक्त प्राशन करणारी शक्ती आहे, शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा अहंकार जिने चिरडून टाकला, अशी श्रेष्ठ सिद्ध लक्ष्मी व या समस्त जगताची मालकीण, नऊ स्वरूपात अवतरणारी चंडी, माझे रक्षण करो.

मारी जी मधुकैटभा, रुधिरही प्राशी रिपूचे रणी
चेची शुंभ निशुंभ गर्व, वधिले चंडा नि शुंडा झणी।
काळे नेत्र, धनीण सर्व जगता, जी सिद्ध लक्ष्मी खरी
माया तारक हो नऊ स्वरुपिणी चंडी मला भूवरी ॥ ०१

टीप- येथे आलेल्या सर्व राक्षसांच्या वधांचा संदर्भ देवी भागवतातील विविध अध्यायातील कथांशी आहे.

प्रातः स्मरामि तव शंकरि वक्त्रपद्मं कांतालकं मधुरमंदहसं प्रसन्नम् ।
काश्मीरदर्पमृगनाभिलसल्ललाटं लोकत्रयाभयदचारुविलोचनाढ्यम् ॥१॥

मराठी- हे शंकराच्या (कल्याणकारी) भार्ये,  मी सकाळी, तुझे सुंदर कुरळे केस, मंद मधुर स्मित करणारे प्रसन्न असे मुखकमल, केशराच्या सुवासाच्या कस्तूरीच्या उटीने सुशोभित केलेले कपाळ, ऐश्वर्यसंपन्न (सुरेख,पाणीदार) डोळे अशा तिन्ही लोकांना अभय देणार्‍या तुझे स्मरण करतो.

मी पाहटे स्मरतसे वदनारविंदा
मुद्याळ सुंदर बटा, स्मित हास्य मंद ।         (मुद्याळ- कुरळे)
कस्तूर केशर उटी सजवी कपाळा
दृष्टी धनें, जग करी आश्वस्त शैला ॥ ०१

प्रातर्भजामि तव शंकरि हस्तवृंदंमाणिक्यहेमवलयादि विभूषणाढ्यम् ।
घंटा त्रिशूल करवाल सुपुस्त खेट पात्र उत्तमांग डमरुल्लसितं मनोज्ञम् ॥२॥

मराठी- हे शंकराच्या (कल्याणकारी) भार्ये, जे रत्नखचित सोन्याच्या दागिन्यांनी मढले आहेत आणि जे घंटा, त्रिशूळ, समशेर, उत्कृष्ट पुस्तक, ढाल, कवटीचे पात्र आणि डमरू धारण करून सुशोभित झाले आहेत, अशा तुझ्या अनेक हातांचे मी सकाळी पूजन करतो.

भानूदयी भजत मी कर सर्व तूझे
रत्ने सुवर्ण वलयांकित शोभती जे ।
घंटा त्रिशूल समशेर फरी नि पोथी            (फरी- ढाल)
वाटी करात कवटी, डमरू हि हाती ॥ ०२

प्रातर्नमामि तव शंकरि पादपद्मं पद्मोद्भवादिसुमनोगणसेव्यमानम् ।
मंजुक्वणत्कनकनूपुरराजमानं वंदारुवृंदसुखीरुधमार्यहृद्यम् ॥३॥

मराठी- हे शंकराच्या (कल्याणकारी) भार्ये, ब्रह्मा आणि इतर सुबुद्ध लोकांकडून ज्यांची सेवा केली जाते, मंजुळ किणकिणणारे पैंजण ज्यावर विराजमान झाले आहेत, तुझी स्तुती करणार्‍या जनसमुदायांच्या मनात  आनंद उत्पन्न करण्यात जे तरबेज आहेत अशा तुझ्या चरणकमलांना मी सकाळी नमस्कार करतो.

पायी मधूर रव पैंजण मोद देती
भक्तां, स्तुती सुजन जे करतात चित्ती ।
होती प्रजापति गुणीजन दास जेथे
सूर्योदयी जुळवितो करयुग्म तेथे ॥ ०३

प्रातः स्तुवे च तव शंकरि दिव्य मूर्ति कादंबकाननगतां करुणारसार्द्राम्  ।
कल्याणधामनवनीरदनीलभासां पंचास्ययानलसितां परमार्तिहंत्रिम् ॥४॥

मराठी- हे शंकराच्या (कल्याणकारी) भार्ये, कदंब वृक्षांच्या वाटिकेत जाणार्‍या, (भक्तांप्रती) करुणेने ओथंबलेल्या कोमल, कल्याणस्वरूप, नव्या पाण्याने भरलेल्या निळ्या मेघाप्रमाणे तेजस्वी, सिंह वाहनावर (आरूढ) शोभून दिसणार्‍या, मोठी दुःखे नाहीशी करणार्‍या तुझ्या आकृतीची मी सकाळी स्तुती करतो.

भानूदयी स्तवन गे तव आकृतीचे
कारुण्यकोमल, कदंब वनात साचे ।
कल्याणकारक, निळी घनश्याम काया
सिंहावरी बसुन घोर व्यथा हराया ॥ ०४

प्रातर्वदामि तव शंकरि दिव्यनाम शाकंभरीति ललितेति शतेक्षणेती ।
दुर्गेति दुर्गममहासुरनाशिनीति श्रीमंगलेति कमलेती महेश्वरीति ॥५॥

मराठी- हे शंकराच्या (कल्याणकारी) भार्ये, मी प्रभातकाळी तुझी शाकंभरी, ललिता, शतेक्षणा (शंभर नयनांनी पहाणारी), दुर्गा, दुर्गम नावाच्या विक्राळ दैत्याचा नाश करणारी, श्रीमंगला, कमला, महेश्वरी अशी स्वर्गीय नावे घेतो.

घेतो पहाट समयी तव दिव्य नामा
शाकंभरी नि ललिता नि शतेक्षणा माँ ।
दुर्गा नि दुर्गम महासुर नाशकर्ती
श्रीमंगला नि कमला नि महेश्वरी ती  ॥ ०५

यः श्लोकपंचकमिदं पठति प्रभाते शाकंभरीप्रियकरं दुरितौघनाशम् ।
तस्मै ददाति शिवदा वनशंकरी सा विद्यां प्रजां श्रियमुदारमतिं सुकीर्तिम् ॥६॥

मराठी- जो कोणी सकाळी हा शाकंभरीचा आवडता आणि पापांचा प्रवाह नष्ट करणारा श्लोकांचा पाचुंदा पठण करतो त्याला ती कल्याणकारी वनशंकरी अत्यंत उदारपणे ज्ञान, संतती, संपत्ती, आणि चांगली कीर्ती प्रदान करते.

शाकंभरीस प्रिय पंचक रोज गाई
पाप प्रवाह पठणातुन नष्ट होई ।
संपत्ति कीर्ति सुभगा हितकारि देई
संतान ज्ञान सकलांस उदार आई ॥ ०६

******************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

4 Comments on वनशंकरी प्रातःस्मरण स्तोत्रम् – मराठी अर्थासह  

  1. Dear Dhananjay,
    I have gone through your marathi translation as well as marathi kavyarupanter. Both are beyond praise.
    I appreciate your service to sanskrut and marathi language.Actually my Mavshi’s surname was Apashankar fro Daund. Their Kuladevi was Shakambari. Once again I appreciate and congradulate you for this work. Vinayak Kulkarni {69 Mechanical Branch.}

  2. बोरकर सरांनी नेहमीप्रमाणे छान भाषांतर करून संस्कृत श्लोकांचा अर्थ सोपा करून सांगितलं आहे.त्याचे कवितेतील भाषांतर हा तर त्यांचा हातखंडा आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..