निसर्गाने मानवाला दिलेली नैसर्गिक संपत्ती ही अनमोलच आहे. त्यात कोकणाचा विचार केला तर कोकणाला लाभलेले हे निसर्गाचे वरदान पर्यटनासोबत आरोग्य संवर्धक देखील आहे. कोकणच्या जंगलात सापडणार्या शेकडो वनौषधी मनुष्याच्या आरोग्याला हितकारक आहेत. त्यांच्या योग्य वापराने आपण निरोगी राहू शकतो.
परंतु आजच्या धावपळीच्या युगात मात्र या अनमोल निसर्ग संपत्तीकडे थोडेसे दुर्लक्ष होत असताना दिसते. याचा विचार करुन खाद्य पदार्थांच्या माध्यमातून औषधी वनस्पती शरीरात जाव्यात, यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने आरोग्यदायी संकल्पनेतून एक अभिनव प्रयोग राबविलेला आहे. तो म्हणजे वनौषधीपासूनचे बिस्कीटे आणि आईस्क्रीम बनविण्याचा.
कोकणच्या समुद्रपट्टयात व सह्याद्रीच्या दर्याखोर्यात अमाप वनौषधींचा साठा आढळून येतो. मात्र त्यांचा मूळ स्वाद हा कडू, तुरट असतो. त्यामुळे त्यांचा वापर खाण्यासाठी न करण्याचा आपला व विशेषत: लहान मुलांचा कल असतो. त्यामुळे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वनौषधीचा समावेश असलेले हे आयुर्वेदिक फूड प्रॉडक्ट अत्यंत मेहनत घेवून तयार करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या शरीराला उपयुक्त अशी बिस्कीटे व आईस्क्रीमचे विविध प्रकार तयार केले गेले आहेत.
प्रतिष्ठानने यातील काही वनस्पतींपासून एक फॉर्म्यूला तयार केला आणि त्या पासून लहानथोरांना आवडणारी बिस्कीटे व आईस्क्रीम तयार करण्यात यश मिळविले. यात आईस्क्रीमचे विविध प्रकार बनविण्यात आले आहेत यात प्रामुख्याने शतावरी, ब्रम्ही, शंखपुष्पी, गुलकंद इत्यादी आयुर्वेदिक वनौषधीचा वापर करण्यात आला आहे. तर बिस्कीटांमध्ये ओट, शतावरी, खारीक, अंजीर इत्यादींचा वापर करण्यात आला आहे. या सर्व उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या आयुर्वेदिक वनौषधी शरीराला हितकारक ठरतील. तसेच ती त्यांच्या गोड स्वादामुळे सर्व गटातील व्यक्ती त्याचा आनंद घेवू शकतील असा कोकण प्रतिष्ठानला विश्वास आहे.
सध्या या हर्बल बिस्कीटांचे उत्पादन हैद्राबाद येथे घेतले जात आहे. तर आईसक्रीम रत्नागिरी येथील चंदा कंपनीत तयार करण्यात येत आहे.
या उत्पादनाचे मार्केटिंग ब्रिटीश बेकरी असोशिएशन करीत आहे. परदेशातही या उत्पादनाची निर्यात होत असून विशेषत: न्यूझीलंड व इंग्लंड या देशातून जास्त प्रमाणात मागणी आहे.
दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या कृषि महोत्सवात हर्बल बिस्कीटे व आईस्क्रीम ही उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. दोन्ही उत्पादनांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कृषी महोत्सवाची सांगता होण्यापूर्वीच्या या उत्पादनाची संपूर्ण विक्री झाली. यापुढे ही दोन्ही उत्पादने कोकणातील उत्पादकांना विक्रीसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात येणार्या देशी तसेच परदेशी पर्यटकांना या वैशिट्यपूर्ण आयुर्वेदिक फूड प्रॉडक्टची चव चाखायला मिळेल.
झटपट (इंस्टंट) इलाजाच्या नावाखाली रासायनिक औषधांचा जास्तीत जास्त वापर होताना दिसतो. परंतु वनस्पतीपासून बनविलेले काढे, चूर्ण या व्यतिरिक्त आयुर्वेदाचा रोजच्या जीवनात फारसा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादनाने निश्चितच आपल्या शरीरावर चांगला परिणाम होवू शकेल असे वाटते. शिवाय व्यवसायाच्या विविध संधीही या उत्पादनांच्या निर्मिती व विक्रीद्वारे स्थानिक पातळीवर युवकांना होवू शकतात हे महत्वाचे आहे. असा हा अभिनव उपक्रम आपल्या महाराष्ट्रात होत आहे याची प्रेरणा इतरांनाही घेता येऊ शकेल.
Source: ‘महान्यूज’
Leave a Reply