भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील पथकाने ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. महिनोनमहिने केलेल्या या सर्वेक्षणात विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, कीटकांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण केले आहे.
आफ्रिकन बिबट्या अन् ऑस्ट्रेलियन पोपटासह दुर्मीळ जातीचे प्राणी, पक्षी आणि कीटक आकुर्डीतील भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम. प्रादेशिक केंद्रातील संग्रहालयात पाहायला मिळतात. महाराष्ट्र आणि गोवामधील अभयारण्यातील प्राणी-पक्ष्यांचे सर्वेक्षण करणारे हे एकमेव केंद्र आहे. वन्यजिवांचे जतन व संवर्धन करण्याचा हा प्रयत्न आहे. वन्यजीव-कीटकांच्या या मृतदेहांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन येथे केले जाते.
वन्यप्राणी किंवा पक्षी प्रत्यक्षात कसे असतात, त्यांचे मूळ स्वरूप कसे असते, याविषयीची सखोल माहिती मिळावी, वन्यजीवांबाबत आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या आकुर्डी केंद्रात संग्रहालय तयार केले आहे.
शिकारीत पकडलेले आणि नैसर्गिक मृत्यू झालेले वन्यप्राणी कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर येथे आणले जातात. त्या मृत प्राण्यांमध्ये भुसा भरून त्यावर योग्य प्रक्रिया करून संग्रहालयात ठेवले आहे.
दुर्गंधी येऊ नये अथवा बुरशी लागू नये यासाठी रासायनिक पदार्थांची फवारणी वारंवार केली जाते. तसेच जलचर प्राण्यांच्या विविध जातींचे जतन केले आहे.
समुद्रातील वेगवेगळ्या प्रकारचे शंख-शिल्पांचाही संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये द्विकपादी व जाठरपाद असे दोन प्रकार आहेत. प्राणी अभ्यासकांचा आणि शास्त्रज्ञांच्या पुस्तकांचा येथे संग्रह करण्यात आला आहे.
नामशेष जाती जतनाचा प्रयत्न
संग्रहालयात आफ्रिकन बिबट्या, ऑस्ट्रेलियन पोपट यांसह वाघाचें बछडे, उडणारी पाल, समुद्रातील खेकडे, उद मांजर, सरडा, शेकरु, घुबड, पोपट, घोरपड, घोणस, मण्यार, नाग, मुंगूस, सांबर, हरीण, विविध जातींचे बगळे, माकड, विविध जातीची झुरळे आदी प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. यात दोन डोके असलेला घोणस जातीचा सापही आहे.
प्राणी, पक्षी, कीटक, मासे, साप यांचे सर्वेक्षण केले जाते. प्राणी–पक्ष्यांमधील विविधता शोधून काढून त्यावर अभ्यास केला जातो. एखादा नवीन जातीचा जीव आढळल्यास त्यावर आकुर्डीतील केंद्रात संशोधन केले जाते. सर्वेक्षणामुळे अभयारण्यातील जिवांचे अस्तित्व, नामशेष जाती याबाबतही माहिती मिळते.
Leave a Reply