आली दारात वरात, गुलमोहर फुलला,
लक्षुमीच्या स्वागताला सडा फुलांचा घातला ।
आली दारात वरात, दारी तोरण हिंदोळे,
पैंजणाच्या चाहुलीने मोर मण्यांचे जाहले ।
आली दारात वरात, लिंबलोण आणा कुणी,
दृष्ट लागू नये तिला, सून माझी बहूगुणी ।
आली दारात वरात, दार अडवी बहीण,
म्हणे अडवीते आज, उद्या पाठीशी घालीन ।
आली दारात वरात, पूस डोळे सूनबाई,
उंबर्याच्या पलीकडे उभी आहे एक आई ।
आली दारात वरात, माप दारी कलंडले,
शकुनाच्या पावलाने अमाप सुख घरी आले ।
आली दारात वरात, भाणोसं भरा ग कुणी,
नको वाजवूस ठेव, कढी हलक्या हातानी ।
आली दारात वरात, साखरेची वाटी भरा,
भरभरोनी गोडवा असा लाभूदे संसारा ।
— सुधा मोकाशी
Leave a Reply