१९७८ साली दहावीची परीक्षा मी ८३.१४ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. त्यावेळी हे मार्क खूपच चांगले होते. कारण या मार्कांवर मला कोणत्याही उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकणार होती. आमच्याच शिक्षण संस्थेचे बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी अॅडमिशन घेतली. मला विज्ञानापेक्षा कला शाखेची जास्त आवड होती. पण कला आणि वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत अॅडमिशन घेऊन मी पुढे इंजिनिअर व्हावे, असे घरच्या वडिलधाऱ्यांचे मत पडले आणि त्याप्रमाणेच वागायचे असा तेव्हा प्रघात होता. म्हणून मी विज्ञान शाखेत अॅडमिशन घेतली. त्याचबरोबर माझ्या गाण्याच्या शिक्षणाचा प्रवासही सुरू कसा राहील याबाबत मी प्रयत्नशील होतो. पद्धतशीरपणे गाणे शिकण्यासाठी कोणी तरी मला काळे सरांचे नाव सुचवले. माझा आवाजही आता पुरुषांच्या पट्टीत स्थिरावला होता. एके दिवशी माझा मित्र सुबोध दाबके याच्याबरोबर मी संगीततीर्थ पं. विनायकराव काळे यांच्या घरी गेलो. नारायण भुवन या त्यांच्या घरातच संगीताची जादू होती. एका बाजूला कपाटात अनेक सुरांचे तबले व्यवस्थित मांडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला अनेक सुरांचे तंबोरे होते. दोन हार्मोनियम होत्या. एक सुरपेटी होती आणि मध्यभागी सरांचे आसन होते. सर तक्क्याला टेकून बसले होते. आम्हा दोघांना सरांनी बसायला सांगितले. सुबोधला गाण्याची आवड खूप! पण तो काही गाणारा नाही. माझ्यावरचे दडपण वाढले. सरांनी हार्मोनियमवर काही सूर वाजवून मला ओळखायला सांगितले. गाण्याबद्दल इतरही काही माहिती विचारून माझी परीक्षा घेतली. हे काळे सर खूपच कडक आहेत, असे ऐकून मी थोडा घाबरलो होतो. पण आता मात्र त्यांच्याकडेच गाणे शिकायला मिळावे असे मला वाटायला लागले. काही गोष्टी घडायला फक्त प्रयत्न उपयोगी पडत नाहीत तर त्याला नशिबाची जोडच लागते. तो योगच यावा लागतो. ती एक घटना तुमच्या आयुष्याला काही वेगळे वळण देण्याइतकी समर्थ असते. मी मनोमन प्रार्थना करत होतो आणि काळेसरांनी मला गाणे शिकवण्यास होकार दिला. माझ्या संगीताच्या प्रवासाच्या वाटेवरला एक मोठा टप्पा मी आज गाठल्याचा आनंद मला झाला होता. त्या आनंदात मी सुबोधबरोबर बाहेर पडलो. “ते हार्मोनियमवर वाजवलेले वेगवेगळे सूर तू कसे ओळखलेस रे?” सुबोध मला विचारत होता. पण मी एव्हाना गाण्याच्या एका वेगळ्याच जगात पोहोचलो होतो. आम्ही दोघांनी तो आनंद भेळ खाऊन साजरा केला.
10 सप्टेंबर 1978, या दिवशी संध्याकाळी मी काळे सरांकडे गाणे शिकायला सुरुवात केली. हा पहिला दिवस माझ्या चांगलाच स्मरणात राहिला आहे. गुरूपूजन झाल्यावर सरांनी मला बर्फीचा तुकडा प्रसाद म्हणून दिला. इतरही अनेक विषयांवर माझ्याशी गप्पा मारल्या. पण गाणे काही शिकवले नाही. शेवटी मी त्याबद्दल विचारले. सर ठासून म्हणाले, अरे, किती हालतो आहेस तू? शांतपणे बसायला तर शिक. गाणे नंतर शिकू या. मी चांगलाच वरमलो. पण मला समजावत सर म्हणाले, “अरे, याला आसन स्थिर करणे असे म्हणतात. याला थोडा वेळ लागतो. काळजी करू नकोस.”
गाणे शिकण्यापूर्वीच एक खूपच मोठी गोष्ट सरांनी मला शिकवली होती. खरंच आपण जोपर्यंत स्थिर बसू शकत नाही, तोपर्यंत काही शिकणे शक्य नाही. गाणे तर पुढे राहिले. लवकरच सरांकडे नियमितपणे गाणे शिकायला मी सुरवात केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या दुनियेत मी सरांबरोबर प्रवेश केला. मला सुगम संगीतात पार्श्वगायन आणि हिंदी गजल यात काम करण्याची इच्छा आहे असे मी सरांना गाणे शिकायला सुरुवात करण्यापूर्वीच सांगितले. काही जणांचे मत होते की, मी असे सांगितल्याने सर खूप रागावतील. पण तसे काहीच घडले नाही. माझा गाण्याबद्दलचा दृष्टीकोन मी सांगितल्याबद्दल आणि मला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना मला असल्याबद्दल त्यांनी कौतुकच केले. त्यांचे सांगणे असे होते की संगीत कोणत्याही प्रकारचे असो, त्यात सूर आणि ताल यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. तेव्हा रागांच्या माध्यमातून सुरांचा आणि तालाचा रियाज करायला सरांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रारंभ केला. वेगवेगळ्या रागात रचलेल्या सरांच्या जवळजवळ साडेसहाशे स्वरचित बंदिशी आहेत. त्या शिकायला सुरुवात केली. रागदारी संगीत हे देखील सुगम संगीताइतकेच मनोरंजकरित्या सादर करता येते हे काळे सरांनी मला शिकविले. रागदारी संगीताबरोबरच सुगम संगीत ते ऐकत असत. इतकेच काय पण पाश्चात्त्य संगीताशी देखील त्यांचा चांगला परिचय होता. त्यांनी बांधलेल्या वेगवेगळ्या रागातील बंदिशी जर तालात अचूकपणे सादर केल्या तर एखाद्या गीतासारख्या त्या परिणाम साधू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला भावगीते, चित्रपटगीते आणि प्रामुख्याने गझल गायची असल्याने त्यांनी माझा आवाज या गायकीसाठी ‘हलका’ राहिल असाच रागदारी संगीताचा रियाज माझ्याकडून करून घेतला. माझ्या आवाजात ‘फिरत’ तर येईल, पण त्यामुळे माझा आवाज एकाच साच्यात फिरणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. गाण्याचा नियमित रियाज मी सुरू केला. काही महिन्यांतच त्या रियाजाचा चांगला परिणाम माझ्या आवाजात कळून येऊ लागला.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply