फळांपासून तयार केल्या जाणार्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
स्क्वॅश हे मलमलच्या कापडातून गाळलेल्या रसापासून, गोडीसाठी साखर मिसळून तयार करतात. या पेयात फळांच्या रसाबरोबरच फळांच्या गरसुद्धा काही प्रमाणात मिसळतात. उदा. आंबा, संत्रा, लिंबू, अननस यांचे स्क्वॅश.
कॉर्डियल हे पेय फळांच्या रसातील संपूर्ण गराचे कण वेगळे करुन गरविरहित रसापासून तयार करतात व त्यात गोडीसाठी थोडी साखर मिसळतात. उदा: लिंबू रसाचे कॉर्डियल.
क्रश या प्रकारच्या पेयामध्ये फळरसाचे प्रमाण २५ टक्के असते. फळांच्या रसात दीडपट ते दुप्पट प्रमाणात साखर आणि दिड-दोन टक्के सायट्रिक आम्ल मिसळून तयार केलेले एक पेय म्हणजे सिरप. या पेयात १:४ किंवा १:५ या प्रमाणात थंड पाणी मिसळून त्याचा आस्वाद घेतला जातो. उदा. फणस, जाभूळ, करवंद यांचे सिरप. कृत्रिम सुगंध आणि दीड-दोन टक्के सायट्रिक आम्ल वापरुन केलेला तिनतारी साखरेचा पाक म्हणजे कृत्रिम सिरप उदा. चंदन सिरप, गुलाब सिरप.
संपृक्त पेय फळांच्या रसातील पाण्याचा अंश उष्णता देऊन किंवा शीतकरण पध्दतीने कमी करुन बनवतात. कार्बन डायॉक्साईड वायू वापरुन या संपृक्त पेयापासून इतर पेये बनवली जातात.
फळांच्या रसाची भुकटी फळांच्या रसातील किंवा गरातील पाण्याचा अंश कमी करुन मिळवतात. ही भुकटी बंद न करता उघड्यावर ठेवल्यास हवेतील दमटपणामुळे ती लगेच ओलसर होतेे. म्हणून ती निर्वात डब्यात पिशवीत साठवून ठेवतात. गोठवून वाळवलेल्या फळरसाच्या भुकटीपासून उत्कृष्ट पेय तयार करता येते.
— मराठी विज्ञान परिषद, मुंबई
Leave a Reply