फळांपासून विविध प्रकारची पेये तयार करण्यासाठी प्रथम त्यांचा रस काढून घ्यावा लागतो. रस काढण्याची पद्धत ही प्रत्येक फळासाठी वेगवेगळी असते. रसाचे प्रमाण जास्त मिळवण्यासाठी काही रसायनांचा उदा. जिलेटिन, केसिन तसेच काही विकरांचा उदा. पेक्टिनॉल, ट्रायझाईम-५० तसेच पेक्टिनेक्स -३ एएक्सएल इत्यादींचा वापर केला जातो. योग्य पध्दतीन काढलेल्या रसाचा टीएसएस व आम्लता विचारात घेऊन त्यामध्ये योग्य प्रमाणात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी घालून, ढवळून मलमलच्या कापडातून गाळून घेऊन थंड झाल्यावर आस्वाद घ्यावा. आस्वाद घेताना चवीप्रमाणे मीठ जिरा पावडर किंवा आल्याचा रस वापरल्यास ती आणखी चविष्ट लागतात.
दोन भिन्न प्रकारच्या फळांचे रस एकत्र करुन तयार केलेल्या पेयाला मिश्रा पेय म्हणतात. विविध फळांचे रस वापरुन आपणास उत्कृष्ट प्रतीचे कार्बेनेटेड शीतपेय बनवता येते. यासाठी मूळ रसातील साखर व आम्लता लक्षात घेऊन रसामध्ये साखर, टीएसएस, सायट्रिक आम्ल, केएमएस टाकून त्याचा सिरप बनवून घ्यावा. सिरप बाटलीत भरुन कार्बोनेशन यंत्राच्या साह्याने कार्बन डायॉक्साइड वायू भराव व लगेच बाटल्या हवाबंद कराव्यात. नंतर या बाटल्या ७० अंश सेल्सियस तापमानस १५ मिनिटे गरम कराव्यात. थंड झाल्यावर लेबल लावून शीतगृहात ठेवाव्यात. या शीतपेयाच्या बाटल्या दोन ते अडीच महीने टिकतात. हे तयार केलेले शीतपेय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कार्बोनेटेड शीतपेयांपेक्षा निश्चतपणे आरोग्यवर्धक असते. यासाठी फळरसापासून केलेल्या शीतपेयांचा प्रचार लोकांमध्ये व्हायला हवा.
फळे किंवा फळांचा रस संपूर्णपणे आंबवून मादक पेय तयार करता येते. या मादक पेयात अल्कोहोलचे प्रमाण कमी-जास्त ठेवता येते. उदा. द्राक्ष, करवंद, जांभूळ, डाळिंब इत्यादी. अल्कोहोलयुक्त फळांच्या रसाला वाइन म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीने अशा वाइनचा उपयोग काहीजण करतात. अपचन, पोट जड होणे, भूक न लागणे, अशक्तपणा येणे, फुफ्फुसाचे विकार, दमा, खोकला, रक्तातील वाढीव कोलेस्टेरॉल अशा विविध व्याधींवर ते उचित प्रमाणात घेतल्यास गुणकारी आहे.
— डॉ. विष्णू गरंडे
Leave a Reply