विश्वाच्या उत्पत्तीपासून काळ अस्तित्वात आला. मानवाला काळाचे भान आले. त्याचे मोजमाप दिवस-रात्रीच्या चक्रावर आधारले गेले. भाषा निर्माण होताना कालगणनेला फार महत्व प्राप्त झाले. वाक्यरचना कालनिदर्शक असणे आवश्यक झाले. भाषांनी भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ हे तीन कांळ अंगिकारले. कोणत्याही भाषेतील बोलणे वा लिहिणे कालनिर्देशाशिवाय अपुरे वाटते. हे तीनही काळ खरंच अस्तित्वात असतात का? हा प्रश्न जिज्ञासेपोटी पडला तरी तो रास्त आहे. आपल्या लक्षात येईल की यातील एक काळ भ्रामक आहे. कोणता? ‘वर्तमानकाळ’!
जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे. भूतकाळ स्मरणात राहू शकतो, भविष्यकाळ अंधारात दडलेला असतो, पण वर्तमानकाळ आपल्या हाती कधी असतो? जवळजवळ नसतोच. मागील दोन शब्द लिहीत असताना काही क्षण गेले. पण मला कोणी विचारले असते की ‘तुम्ही काय करता?’, तर मी उत्तर दिले असते, ‘लिहितो आहे’. म्हणजे मी एका क्षणाचे नाही तर काही क्षणांचे वर्णन करतो आहे. त्यातले बहुतेक क्षण भूतकाळात जमा झालेले आहेत. माझे उत्तर एका कालखंडाशी संबंधित आहे. ‘वर्तमानकाळ’ म्हणजे एक कालखंड आहे असे म्हटले तर ते बरोबर वाटेल. ‘वर्तमानकाळ’ म्हणजे ‘क्षण’ नव्हे. जेव्हा माझे लिहिणे संपेल तेव्हा, ‘लिहितो आहे’ हे माझे उत्तर पूर्णपणे भूतकाळात गेलेले असेल. म्हणून वर्तमानकाळ हा आपण करीत असलेल्या कामाशी (काहीच करीत नसलेल्या स्थितीशीसुध्दा) संबंधित असा कालखंड आहे. आपण एखादी घटना आठवतो तेव्हा कालखंड आठवतो. आपण एखाद्या कामाचे नियोजन करतो तेव्हा भविष्यातील काही काळाचा विचार करतो. वरील तीनपैकी एकाही काळावर आपले नियंत्रण असत नाही. पण आपली कर्मे करताना आलेल्या काळाचा वापर करून आपण काम करू शकतो.
आपल्याला उपलब्ध असणारा काळ म्हणजे ‘वेळ’. प्रत्येकाला दिवसाला 24 तासांचा वेळ मिळतो. कोणत्या कामाला किती वेळ देता आला त्यानुसार कामे होतात. या वेळेचा उपयोग झाला असे आपण म्हणतो नाहीतर वेळ फुकट गेला असे मानतो. प्रत्येकाची काळरेषा वेगळी असते, पण काळ सरण्याचा वेग एकसारखा असतो. कोण वर्तमानात जगला व कोण स्वप्नरंजनात दंगला व कोण भूतकाळात रमला हे क्षणभर येणारा ‘काळ’ ठरवतो. ‘वर्तमानात जगणे’ अवघड असते पण ते महत्वाचे असते.
काळासंबंधी माझी संकल्पना अशी आहे.
अ) काळ एकाच दिशेने प्रवास करतो : →
ब) सरळ रेषेवर काळ असा दाखविता येतो.
क) हिरव्या रंगातील ठिपक्याचे (वर्तमानाचे) अस्तित्व एका क्षणाचेच आहे. कारण पुढच्या क्षणी हिरवा रंग लाल रंगात गेलेला असेल व दुसरा निळा ठिपका हिरवा बनेल. म्हणून ‘वर्तमानाचे भान ठेवणे’ याचा अर्थ हाती असलेल्या कामावर वा विचारांवर लक्ष केंद्रित करणे, फक्त एका क्षणावर नाही. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षेची तयारी करणे हे एका वर्षाचे ध्येय आहे, आता करत असलेला अभ्यास हे चालू काळाचे ध्येय आहे. या चालू काळाचे भान राखणे म्हणजेच ध्येयासाठी क्षण क्षण झटणे. तर असा आहे वर्तमानकाळ.
— रविंद्रनाथ गांगल
छान संकल्पना.
Best article….
माननीय रवी दादा , नमस्कार,
आपण लिहिलेलं ” वर्तमान काळ” म्हणजे काय, हा लेख खूपच विचारपूर्ण आणि खरंच वेगळं पण जपणारा आहे. ह्या सुंदर लेखा निमित्त तुमचें हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा….
सुधीर दीक्षित आणि परिवार