वाऱ्यावरती हलती तरुलता,पाने,फळे त्यातून बहरती,
निसर्गाची किमया सारी,
मानवा तू शिकणार कधी,-!!!
सारी संपत्ती निसर्गाची,
तुझा देह ही केवळ माती,
का एवढी अहंता बाळगी,
मातीमोल सारे,मिळता गती,-!!
मी, माझे, माझे करत राहशी,
वृत्ती का नसावी समाधानी,–?
धरातली नच तुझे काही, —
तुज याची जाणीव नाही,–!!!
त्याग शिकवतो निसर्ग केवळ,
दातृत्व त्याचे मोठे किती,
कळले ज्याला तो कधीही,
स्वतःची न गाणार महती,–!
काय देशी तू झाडांना,
कचरा म्हणुनी खतपाणी,
झाड काय देते तुज,
विचार कर ध्यानीमनी,–!!!
ओरबाडशी तू त्यांना,
सरळ सरळ घाव घालीशी,
जे हवे ते तोडून नेशी,
निर्घृणता ही कायमची,–!!!
तरीही देती थंड सावली,
तक्रार त्यांची कुठलीच नाही,
अत्याचार त्यांच्यावर करशी,
बळी जाशी ना तूच शेवटी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply