वसई तालुका ५२६ चौ . मैल इतका विस्तीर्ण आहे . पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र , उत्तरेला वैतरणा नदी , दक्षिणेला नायगावची खाडी . पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र यामध्ये वसलेला हा तालुका चहाच्या बशीसारखा ! त्यामुळे पोर्तुगिजांनी या प्रदेशाला ‘ बेकेम ‘ म्हटले तर ब्रिटिशांनी ‘ बॅसीन ‘ . पुढे स्वातंत्र्यानंतर वसई असे नामकरण झाले . या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . बौद्ध राजे ते थेट पोर्तुगीज , ब्रिटिशांनी येथे राज्य केले . पोर्तुगिजांनी पेशवे सरकारपुढे शरणागती पत्करली तर पेशव्यांनी १८१८ साली ब्रिटिशांपुढे लोटांगण घातले . नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भूमीला परशूरामाची भूमी म्हणून संबोधले जाते . ब्रिटिश सरकारने १८ ९ ० च्या सुमारास हा भाग ‘ ना विकास क्षेत्र ‘ म्हणून घोषित केला . हा संपूर्ण तालुका मुंबईला प्राणवायू पुरविणारा … म्हणूनच वसईला मुंबईची फुप्फुसे म्हटले जात असे . १ ९ ८१ च्या खानेसुमारीप्रमाणे तालुक्याची लोकसंख्या २ लाख ४१ हजार होती . ख्रिश्चन , आगरी , पानमाळी , कोळी व भंडारी हे मूळचे समाज गुण्यागोविंदाने राहत होते . धर्म निराळा असला तरी ख्रिश्चनांनी आपली मूळ संस्कृती , भाषा सोडली नाही . याच तालुक्याने वाढत्या मुंबईला भाजीपाला , मासळी , ताडी व केळी पुरविली . मुंबईच्या दादर , गिरगाव , भायखळा या भागात भल्या सकाळी वसईचा लाल टोपीवाला ख्रिश्चन दूध व भाजीपाल्याची कावड घेऊन घरोघरी फिरताना दिसे , तर कोळी महिलामासळीच्या टोपल्या घेऊन मुंबईला पोहोचत .
वसईचा एकूण समाज निर्धास्त व भवितव्याचा अंदाज न घेणारा . खाणेपिणे मौजमजा हे स्थानिकांचे वैशिष्ट्य . १ ९ ७० च्या दरम्यानच दिवाण आदी बिल्डरांनी या भागात जमिनीच्या खरेदीला सुरुवात केली होती . वसई रेल्वे स्थानकाच्या आसपास दूरवर पसरलेली खारलॅण्ड ( खाजण जमीन ) पानमाळी , आगरी व ख्रिश्चन या समाजाची . तीच गत पूर्वेकडील जंगल जमिनीची . मात्र , या जमिनी या समाजाच्या हातातून कधी गेल्या हे त्यांनाही समजले नाही . भारतातील बड्या बिल्डरलॉबीने इथल्या जमिनी खरेदी केल्या . सध्या गाजत असलेल्या सहारा समुहानेही येथे जमीन घेतली . मात्र बहुमजली इमारती उभ्या करण्यास राज्य सरकारची बंदी होती . आपले बस्तान नीट बसत नाही , हे लक्षात आल्यावर त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना बिल्डरलॉबीने हाताशी धरले . मागचा – पुढचा काहीही विचार न करता , स्थानिक नगर परिषदा , ग्रामपंचायतींना फाट्यावर मारून सरकारने ४० हजार एकर जमीन १ ९ ८८ मध्ये बिल्डरलॉबीला आंदण दिली . पुढे १ ९९ ० साली पवार यांच्या सरकारने वसईत सिडको आणली .
आता या घटनेला २५ वर्षे होत आहेत . वसईचा निसर्ग नष्ट होणार , येथील मूळ समाज उद्ध्वस्त होणार , हा अंदाज ख्यातनाम मराठी साहित्यिक फा . फ्रान्सिस दिब्रिटो यांना आला . त्यांनी माझ्याशी संपर्क साधला . २४ मार्च १ ९ ८ ९ रोजी वसई तालुक्याचे संरक्षण करण्यासाठी जीवन दर्शन केंद्र , गिरीज वसई येथे सर्व राजकीय पक्षांच्या विविध विचारसरणी असलेल्या कार्यकर्त्यांची सभा बोलावली . त्यातून महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था जन्माला आली … हरित वसई संरक्षण समिती ! १ ९ ८० च्या दशकात वसईचा अर्नाळा किल्ला तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता . अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळे जगातले कोणतेही जहाज येथे सहज पोहोचे . अर्नाळा ते मुंबई अहमदाबाद महामार्ग हे अंतर केवळ १५ किलोमीटर , एकदा या महामार्गावर आलात म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी , कुठेही तुम्ही पोहोचू शकता . वसई विरारमध्ये उत्तर भारतीयांची दहशत पूर्वीपासून होती . ती दहशत खरे तर विरारच्या ठाकुरांनी मोडीत काढली व वसई वाचविली . पुढे त्यांनीही अतिरेक केला . निसर्ग संवर्धनासाठी आणि मानवी हक्कांच्या पायमल्लीविरोधात उभ्या राहिलेल्या हरित वसई संरक्षण समितीला ठाकूरांच्याही दहशतीला सामोरे जावे लागले . आता तेव्हासारखी परिस्थिती राहिलेली नाही . सर्व स्थानिक समाज अल्पसंख्याक झाला असून केवळ भारतीयच नव्हे तर आफ्रिका खंडातील नागरिकही येथे मुक्तपणे वावरताना दिसतात . माझे तर असे भाकीत आहे की , हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा राजकीय गट हा या भागातील शेवटचा मराठी भाषिक सत्तारूढ पक्ष ठरेल . कारण काँग्रेस – भाजपा या दोन पक्षांना जगाचे वेध लागले आहेत . भ्रष्टाचाराचे महामेरू असलेल्या या पक्षांतून एखादा कृपाशंकर सिंग व अहमद उभा राहील . आजची मराठी भाषिकांची संख्या लक्षात घेता , शिवसेना – मनसे येथे सत्ताधारी बनण्याची शक्यता नाही .
आता १९९० ची परिस्थिती नाही . वसई – विरारचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे . बदलती जीवनशैली , जमिनी विकून आलेला पैसा स्थानिकांच्या हातात खेळत आहे . या भागात गेल्या २५-३० वर्षात विविध शैक्षणिक संस्था उदयास आलेल्या दिसतात . या संस्थांतून गेल्या दशकात हजारो तरुण – तरुणी उच्च शिक्षित होऊन देशात – विदेशात नोकरी धंद्यानिमित्ताने पोहोचल्या आहेत . पैशाचा महापू असल्यामुळे गावागावांतून बहुरंगी – बहुढंगी , प्रचंड आकाराचे बंगले उभे राहिले आहेत . मात्र तेथे सध्या तरी वयस्कर राहताना दिसतात . आग्नेय आशियातील एक सुशिक्षित व श्रीमंत समाज म्हणून स्थानिक समाजाची गणना केली जाते . विरारचे ठाकूर यांनी तर जागतिक दर्जाचे वैद्यकीय संकुलन उभारण्याचा निर्धार केलेला आहे . आजच्या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनीही वसईला भेट दिली आहे . आता क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने दरवर्षी जागतिक कीर्तीचे खेळाडू येथे येत असतात . मॅरेथॉनमध्ये अक्षरशः हजारो स्त्री – पुरुष विरार ते वसई धावताना दिसतात . हे चित्र भूषणास्पद आहे .
२०१० मध्ये महापालिका आली . तो वादाचा मुद्दा झाला . महापालिका नको म्हणणारे सध्या उच्च न्यायालयात लढत आहेत . न्यायालयाचा निर्णय जो काही लागायचा तो लागेल . मात्र गेल्या तीन – चार वर्षात महापालिकेने या भागाचा वेगाने विकास केला आहे . रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे . अनेक तलाव सुशोभित दिसतात . तेथे सकाळ – संध्याकाळ फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे . समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे . स्थानिक जनतेला रोजगार मिळत आहे . महापालिकेत भ्रष्टाचार नाही , असे मी म्हणणार नाही . कंत्राट म्हटले म्हणजे भ्रष्टाचार आलाच . तसा तो केंद्रीय सरकार , राज्य सरकार ते ग्रामपंचायती पातळीपर्यंत पसरला आहे . तेव्हा वसई – विरार शहर महापालिकेत भ्रष्टाचार असणारच . हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न नेटाने झाले पाहिजेत . याचबरोबर पालिकेने या भागात केलेला विकासही लक्षात घ्यायला हवा .
पूर्वी इथली एखादी बातमी मुंबईच्या वर्तमानपत्रात कधी तरी येत असे . आता रात्री दहाला एखादी घटना घडली तर दुसऱ्या दिवशी मुंबईच्या वर्तमानपत्रात ती दिसते . स्थानिक पातळीवर मराठी – हिंदी – इंग्रजी दैनिके प्रसिद्ध होत आहेत . दुर्दैवाने इंग्रजीचा प्रचंड पगडा असल्यामुळे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे . आता केवळ पुणे बोर्डाचीच परीक्षा नव्हे तर दिल्ली व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे जाळे येथे आहे . मराठी आता चौथ्या क्रमांकावर आहे . इंग्रजी , हिंदी , उर्दू व नंतर मराठी . १ ९९ ० ची मराठी आता अस्ताच्या मार्गावर आहे . पण याची नोंद राज्यकर्ते घेत नाहीत . त्यामुळे तिसरी मुंबई लवकरच जुन्या मुंबईसारखी म्हणजे अन्य भाषिकांची बनेल . येथे पदवीधरांची लाट आली आहे . घराघरांतून ते दिसतात . मात्र , ज्ञानाच्या बाबतीत कुचकामी आहेत . घराघरांतून धार्मिक पुस्तकांची लाट आहे . पण भारताची घटना कुठेच दिसणार नाही , हे दुर्दैव .
सद्यस्थितीत वसई – विरार भागात अधिकृत – अनधिकृत बहुमजली इमारती दिवस – रात्र उभ्या राहत आहेत . त्यात केवळ मोठे धनिक बिल्डर आहेत , असे नव्हे तर स्थानिक बिल्डर व आर्किटेक्ट यांचाही समावेश आहे . वसई तालुक्यात राज्य व केंद्र सरकारच्या मालकीची हजारो एकर जमीन गडप झाली आहे . त्यात सर्वांचाच सहभाग आहे . २००५ साली वसई – विरार शहरात रु . २००० / – ते रु .२५०० / या दराने फ्लॅट उपलब्ध होते . अवघ्या एका दशकात हाच भाव नऊ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे . त्यामुळे येथे येणारा सामान्य मराठी माणसांचा लोंढा थांबला असून अन्य भाषकांची प्रचंड रांग लागली आहे . गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या मुसलमानांच्या विरोधातील जातीय दंगलींची मोठी झळ या भागाला लागली . स्वरक्षणासाठी त्या समाजाला मुंबईजवळील या सुरक्षित जागी स्थलांतरीत व्हावे लागले . आता निसर्गाचे सौंदर्य लोप पावले असून सर्वत्र सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहत आहेत . या प्रचंड वेगाने वाढणाऱ्या शहराचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत . २००७ साली समितीने उच्च न्यायालय , मुंबई येथे अनधिकृत बांधकामे थांबविण्यासाठी याचिका दाखल केली . अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आणि नियोजित अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी न्यायालयाने वेळोवेळी सरकारला आदेश दिले . ऑक्टोबर २०१३ मध्ये शेवटचा निकाल देऊन उच्च न्यायालयाने सरकारला दणका दिला . मात्र सरकार झोपेत आहे .
वसई तालुक्यात १ ९ ८० पर्यंत हजारो – जुने – पुराणे वृक्ष होते . वड – पिंपळाचे प्रचंड आकाराचे वृक्ष हिंदू समाजाला पूजनीय होते . आजही वर्षातून एकदा त्या वृक्षांची पुजा होते . मात्र , असे शेकडो वृक्ष राजरोस उद्ध्वस्त होत असताना त्यावेळच्या नगर परिषदा व ग्रामपंचायती थंड होत्या . गेल्या दशकात टुमदार बंगले बांधण्याच्या नावाखाली स्थानिकांनी जवळपास ५० हजार विविध जातींचे वृक्ष कापून टाकले . आता काही वर्षांपूर्वी महापालिकेने दहा कोटी वृक्ष लावण्याची घोषणा केली होती . मात्र , तो प्रयत्न खूपच तोकडा दिसतो . आता पवित्र क्षेत्र निर्मळ येथे ५५ एकर जमिनीवर पसरलेले दोन तलाव राखण्याच्या दृष्टीने हालचाल होत आहे . अशी हालचाल आधीच झाली असती तर शेकडो बावखले , विहिरी बुजविल्या गेल्या नसत्या . नागरिकांनाही कायद्याचा धाक असला पाहिजे . दुर्दैवाने मतांच्या भीतीमुळे निसर्ग वाचविण्याकडे सर्वपक्षीय दुर्लक्ष होत आहे .
समाज बदलत असतो . वसई विरारच्या रेल्वेलगतचा भाग शहरीकरण, बहुमजली इमारती यामुळे मुंबईच झाला आहे . या भागात जगातले सर्व ‘ धंदे ‘ चालतात . नायगाव , वसई , नालासोपारा ते विरार या पश्चिम रेल्वेच्या पूर्वेकडील भागात रोज खूनखराबा , बँका लुटणे , फ्लॅट फोडणे हे प्रकार चालतात . कायदा सुव्यवस्था कोलमडून पडली आहे . सरकारने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर हे पवित्र क्षेत्र पूर्णपणे गुंडांच्या ताब्यात जाईल .
वसई – विरार येथील हिंदू , ख्रिश्चन , जैन व बौद्ध धार्मिक स्थळांच्या परिसरात मूळ लोक सोडता कुणालाही कायम वसतीस्थाने बांधता येणार नाहीत , असा कायदा करण्यासाठी महापालिका व स्थानिक राजकारण्यांनी आग्रह धरावा . फ्रान्समध्ये लुर्डस् हे गाव आहे . या ठिकाणी मार्च ते ऑक्टोबर या काळात जवळपास दोन कोटी ख्रिश्चन भाविक भेटी देतात . मूळ गावकरी सोडता त्या भागात फ्रान्समधील कुणीही कायम वस्ती करू शकत नाही . १८५८ पासूनची ती परिस्थिती आजही कायम आहे .
हरित वसई संरक्षण समितीने त्या दिशेने प्रयत्न केले . मात्र , मूळ हिंदू समाजाचा समितीला पुरेसा पाठिंबा लाभला नाही . श्रीमती मनेका गांधी या देशाच्या पर्यावरण मंत्री असताना त्यांनी वसईचा नयनरम्य निसर्ग व ऐतिहासिक वास्तू जपण्याचा लेखी आदेश राज्य सरकारला दिला होता . त्यावेळच्या वर्तमानपत्रात तो जाहीर झाला . मात्र , सर्वांनीच त्याकडे कानाडोळा केला . हा निसर्गदत्त प्रदेश ‘ मुंबईची फुप्फुसे ‘ म्हणून कायम राहावा , यासाठी केलेला लढा नव्वदच्या दशकात चांगलाच गाजला . विजय तेंडुलकर , सदाशिवराव तिनईकर , माधवराव गडकरी , ज्युलिओ रिबेरो , जनरल युस्टस डिसोजा , गो . रा . खैरनार , चंद्रशेखर प्रभू , निखिल वागळे , मेधा पाटकर , जॉर्ज फर्नांडिस , कार्डिनल सायमन पिमेंटा आदी नामवंतांनी समितीला प्रत्यक्ष वसईत येऊन हजारो स्थानिकांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला . मुंबई देशातील विविध भाषीक अग्रगण्य दैनिकात हरित वसई संरक्षण समितीची नोंद घेतली गेली . जगप्रसिद्ध ‘ नॅशनल जिओग्राफी ‘ या नियतकालिकाने वसईला जगाच्या नकाशावर पोहोचवले . मात्र , स्थानिक धनाढ्य व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा लढा बेदखल केला .
आमच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचा असा आदेश आहे की , रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंच्या दीड किलोमीटर बाहेर बांधकामे होऊ नये . हा आदेशही पायदळी तुडवत बिल्डर व राज्यकर्ते ही परशुरामाची भूमी उद्ध्वस्त करीत आहेत . सर्वत्र बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत . समितीच्या प्रयत्नांमुळे वसई – विरारच्या पश्चिम पट्ट्यात एफएसआय ०.३३ एवढाच आहे . मात्र , हा नियम स्थानिकांनीही मोडीत काढला आहे . आता तर नगरविकास खाते हाच एफएसआय दोन करण्याच्या विचारात आहे . जिथे मुंबई , नवी मुंबई संपली …. तिथे वसई कोण वाचविणार ? आजच्या घडीला वसई – विरारची लोकसंख्या १८ ते २० लाख असावी . मूळच्या समाजाची संख्या ५० टक्क्यांहून कमी आहे . हे लक्षात घेऊन वसई – विरार सांभाळण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे . स्थानिक जनता आपल्या पूर्वजांचा वारसा कसा उद्ध्वस्त करते याचा आधुनिक काळाचा उत्तम नमूना म्हणजे वसई – विरार हा भूप्रदेश !
-मार्कुस डाबरे , वसई .
( लेखक हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत )
Leave a Reply