सुरका : वसईकडील मच्छिमार समाजसमूहाच्या पुरुषवर्गाच्या पेहरावातील एक मुख्य प्रकार म्हणजे ‘ सुरका ‘ होय . ‘ जसा देश तसा वेश ‘ याप्रमाणेच जसा व्यवसाय तसा पेहराव हेदेखील आलेच . मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या लोकांना मासेमारीसाठी बोटीतून खोल समुद्रात जावे लागते . उंच बोटीत चढउतार करावा लागतो . तसेच जाळी टाकण्यासाठी पाण्यातही उतरावे लागते . त्या अनुषंगाने ‘ सुरका त्यांच्यासाठी फारच उपयोगी पडतो . सुरका कॉटनचा असून वजनाला अतिशय हलका असतो . तो कमरेभोवती गुंडाळला जातो व त्याचे पायाकडील शेवटचे टोक अगदी मातीपर्यंत लोंबकळत असते विशेष म्हणजे तो पाण्यात कितीही भिजला तरीही थोड्याशा उन्हाने किंवा वाऱ्यानेही पटकन सुकतो .
सुरका हा विविध रंगांमध्ये मिळत असून त्यावर बोटीचे नाव व विविध चित्रेही रंगवली जातात . सुरका हा अमूक व्यक्ती कोणत्या बोटीवर मासेमारी करते , याची ओळख देण्यास मदत करतो . सोहळ्याप्रसंगी एकमेकांना भेट म्हणून सुरका दिला जातो . सार्वजनिक सभेस हजर राहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यास कोळी पुरुष शक्यतो सुरकेच वापरतात . सुरका हे कोळी लोकांच्या ओळखीचे एक महत्त्वाचे चिन्ह आहे . त्यांना त्यांच्या या पेहरावाचा रास्त अभिमानही आहे . आताचे काही शिक्षित कोळी लोक सुरक्याऐवजी पँटचा वापर करताना आढळतात .
लुगडे : कोळी स्त्रियांच्या पेहरावाचा मुख्य प्रकार म्हणजे ‘ लुगडे ‘ होय . सुरुवातीच्या काळात स्त्रिया अखंड बारा X बाराचे लुगडे वापरत असत . परंतु आता तसे अखंड लुगडे न वापरता सहा वारच्या दोन समान रंगांच्या साड्या विकत घेऊन त्या शिवून त्याचे लुगडे म्हणून वापर केला जातो . या लुगड्यामुळे स्त्रियांचे संपूर्ण अंग झाकले जाते . चर्चला येण्यासाठी , तसेच सणवार व मासळीचा व्यवसाय करताना या स्त्रिया अशा लुगड्यांचाच वापर करतात . लुगडी विविध रंगांची असतात . नवीन बोटीचा आशीर्वादविधी असला की , त्या सोहळ्याप्रसंगी बोटीच्या नाखवा व नाखवीनी म्हणजेच मालक व मालकीन हे एकाच रंगाची शे – दोनशे लुगडी तयार करून ती शेजारी व आप्तजनांमध्ये वाटण्यात येतात व सर्व स्त्रिया एकाच रंगाची व ढंगाची लुगडी नेसून आशीर्वादविधीसाठी बोटीजवळ येत असतात . विशेष म्हणजे लुगडे जुने झाल्यावर ते टाकून न देता त्याचा वापर थंडीपासून बचाव करणारी ‘ वाकळ ‘ बनविण्यासाठी केला जातो . विशेष करून बोटीतील लोकांचा समुद्रातील बोचऱ्या वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी या लुगड्यापासून बनलेल्या वाकळीचा फार चांगला उपयोग होतो .
आता काही शिक्षित स्त्रिया लुगड्यांचा वापर न करता साड्यांचा वापर करताना आढळतात . तरीही नऊवारी लुगडे वापरणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे .
– ‘ सुवार्ता ‘ वरून
Leave a Reply