वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याचा इतिहास
चित्रपट : स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
संगीतकार : वसंत देसाई
पार्श्वरगायक : पं. भीमसेन जोशी
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीतकार सुधीर फडके यांनी गीत रामायणातील सर्वच्या सर्व ५६ गीतांना अतिशय समर्पक चाली लावल्या होत्या. व त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले, पुण्यातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने बघणारा एक तरुण विद्यार्थी- अरुण पाटणकर! अरुण हा संगीतप्रेमी तर होताच, पण त्याचा “रामायणा’चा चांगला अभ्यासही होता. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने सुधीर फडके यांची भेट घेतली. म्हणाला, “गीत रामायणात अनेकांच्या तोंडी गाणी आहेत आणि ती योग्यही आहेत, पण संगीताविषयी प्रेम असणारा व संगीताचा जाणकार “रावण’, याच्या तोंडी एखादे गीत का नाही?’ यावर बाबूजी (सुधीर फडके) चतुराईने म्हणाले, “अहो, मी फक्त गीतांना स्वरबद्ध केलंय आणि ती गातोय एवढंच! हा प्रश्नय तुम्ही गीत रामायण लिहिणाऱ्या ग. दि. माडगूळकरांना विचारा.
लवकरच तोही योग आला. गीत रामायणाच्या २५० व्या कार्यक्रमाला ग. दि. माडगूळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या ठिकाणी हजर असलेल्या अरुणने पुन्हा तोच प्रश्नम गदिमांना विचारला. ते काही बोलले नाहीत. कदाचित भोवती असलेल्या चाहत्यांच्या गराड्यामुळे त्यांनी उत्तर दिले नसेल!
मात्र अरुणच्या त्या प्रश्ना ने गदिमांना नक्कीच विचार करायला लावलं होतं. कारण त्याच सुमारास होमी वाडिया या हिंदीतील प्रसिद्ध निर्मात्याने “स्वयंवर झाले सीतेचे’ नावाचा चित्रपट काढायचं ठरवून त्याची कथा- पटकथा- संवाद व गीतांची जबाबदारी ग. दि. माडगूळकरांवर सोपवली. त्यांनी या चित्रपटात रावणाला गाणे गायला लावले. रावण हा दुष्ट खरा, पण तो कलाशौकिन होता. यासाठी चित्रपटाच्या सुरवातीला रावण वीणा घेऊन एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे त्यांनी दाखवले होते.
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हिंडोल बहार रागातील “रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होत. या गाण्यातील “या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?’ अशा उन्मत्त सवालातून रावणाचा गर्विष्ठ स्वभाव दिसून येतो, तर त्यातील ताना- मुरक्याा व आलापींमुळे त्याची संगीताची जाण लक्षात येते. या गाण्याचे ध्वनिमुद्रण “बॉम्बे लॅब’मध्ये झाले होते. संगीतकार मा.वसंत देसाई यांनी ध्वनिमुद्रणानंतर पंडितजींची गाण्याची मैफल ठेवली होती. त्या दिवशी टेकमध्ये गाणे ओके व अतिशय छान झाल्यामुळे पंडितजींची तबियत खूष होती आणि मग त्या खुशीतच त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी एक तासभर झकास मैफल रंगवली!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
Leave a Reply