रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. ‘घरोघरी हीच बोंब’, ‘कार्टी श्रीदेवी’, या नाटकांबरोबरच, ‘विच्छा माझी पुरी करा’ सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ‘गेला माधव कुणीकडे’ सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, ‘कलावैभव’ संस्थेला यश देणारे नाटक, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’ सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. ‘घरोघरी हीच बोंब’ ’निळावंत’, ‘नाटक’ नावाचेचे नाटक तसेच ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘गेला माधव कुणीकडे’, अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. ‘सबनिशी’ हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, ‘थापडया’, ‘पखाल’, हे विनोदी कथासंग्रह, तर ‘माझेश्वरी’ हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही ‘विच्छा’ मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून ‘विच्छा’ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी ‘तुका म्हणे’ मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. ‘छपरी पलंगाचा वग’, म्हणजेच ‘विच्छा’ हे नाटक, व त्याबरोबरच ‘खणखणपूरचा राजा’, ‘एक नार चार बेजार’, ‘त्रिशूलाचा वग’, ‘तुम्ही माझं सावकार’, ‘आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी’ अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि ‘सोंगाडया’ रूपेरी पडदयावर आला. ‘एकटा जीव सदाशीव’ सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे ‘नवरी मिळे नव-याला’, ‘गंमत जंमत’, ‘एकापेक्षा एक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply