नवीन लेखन...

दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका वासंती वर्तक

वासंती वर्तक जन्म १८ मार्च १९५६ रोजी पुणे येथे झाला.

आपण गेली ४० वर्षे दूरदर्शनच्या निवेदिका आणि वृत्त निवेदिका म्हणून वासंती वर्तक यांना ओळखतो. पण त्यांची आणखीही एक महत्वाची ओळख आहे, ते म्हणजे मराठी साहित्याच्या, भाषेच्या त्या अभ्यासक आहेत.

वासंती वर्तक यांचे पूर्वाश्रमीचे नाव वासंती पटवर्धन असे आहे. शालेय शिक्षण रेणूका स्वरुप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये (तेव्हाची मुलींची भावे स्कूल) झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयात झाले. तेथून मराठी साहित्यात बी.ए. झाल्यावर पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी संपादन केली. तत्पूर्वी प्री डिग्रीला अर्थशास्त्रात त्यांना सर्वोच्च गुण मिळाल्यामुळे बी.ए. ला अर्थशास्त्रच घ्यावे असा प्राध्यापकांचा आणि घरच्यांचाही आग्रह होता. पण नाटक, खेळ, वर्क्तृत्व, कॉलेजचे मासिक, अशा अनेक गोष्टीत रस असल्यामुळे मराठीचा अभ्यास सोपा जाईल म्हणून मराठी घेऊन त्यांनी बी.ए. केले. ज्याचा पुढे माध्यम क्षेत्रात खूप उपयोग झाला.

१९७५ मध्ये बी.ए. आणि १९७७ मध्ये त्यांनी एम.ए. केले. एम.ए. चा निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी स.प.महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी एक वर्ष शिकविले. दरम्यान, सप्टेंबर १९७७ मध्ये दूरदर्शनची निवेदिकेसाठी जाहिरात पाहून त्यांनी अर्ज केला. त्यासाठी असलेली लेखी परीक्षा, स्क्रिन टेस्ट त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. स.प. महाविद्यालयात शिकविणे, दूरदर्शनच्या वृत्त विभागात भाषांतरकार म्हणून काम करणे आणि निवेदिका अशा तीन गोष्टी एकाचवेळी चालू होत्या.

वासंती वर्तक यांचा विवेक वर्तक यांच्याशी डिसेंबर १९७७ मध्ये विवाह झाला. विवाह झाल्यावर त्यांनी एप्रिल १९७८ मध्ये स.प. महाविद्यालयातील काम सोडून दिले. पती विवेक इंजिनियर होते. अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, आयआयटीतून सुवर्णपदक मिळवून ते इंजिनियर झालेले होते. दोघांचेही करिअर त्यांना अत्यंत महत्वाचे वाटायचे, त्यामुळे विवाहानंतरही वासंती वर्तक यांचे दूरदर्शनवरील निवेदन सुरुच राहिले.

तीन वर्षे निवेदिका राहिल्यानंतर दूरदर्शनच्या वृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. गोविंद गुंठे, डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या पाठिंब्यामुळे त्या वृत्त निवेदन करु लागल्या. खरे म्हणजे निवेदिका आणि वृत्त निवेदिका म्हणूनही त्यांची लेखी परीक्षा आणि स्क्रीन टेस्ट नंतर निवड झाली होती. पण कमी वयाच्या म्हणजे केवळ २१ वर्षांच्या असल्यामुळे वृत्त निवेदिका म्हणून त्या विश्वासार्ह वाटणार नाही म्हणून त्यांना फक्त निवेदिका म्हणून रहावे लागले. निवेदनाची सवय असल्यामुळे, महाविद्यालयीन जीवनात वर्क्तृत्वाची अनेक बक्षिसे मासिके मिळाल्यामुळे वृत्त निवेदन सोपे जाईल असे त्यांना वाटत होते. पण स्टुडिओच्या उंबरठ्यापासून उभे असलेले अनेक हितचिंतक, रंगभूषा, वेशभूषा, वस्त्रभूषा यावर इतक्या कॉमेंटस् करत होते, वाचनाविषयी इतक्या सूचना चारी बाजूने अंगावर कोसळत होत्या की भयंकर दडपण आले होते. स्टुडिओच्या अंधारात समोर असलेल्या कॅमेऱ्याच्या लाल दिव्यावर लक्ष केंद्रित करुन माणसांशी बोलल्याप्रमाणे सहजतेने बातम्या वाचणे वाटले तेवढे सोपे नक्कीच नव्हते. बातम्या वाचून संपल्या तरी हात थरथरत होते. पण नंतर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाल्यावर ही धाकधूक संपली आणि फार आनंद झाला. त्यानंतर सलग २००७ पर्यंत दूरदर्शनसाठी नियमितपणे बातम्या वाचल्या. त्यानंतर इतर मुलाखतींचे कार्यक्रम केले आणि आजही दूरदर्शन, आकाशवाणीसाठी मुलाखती घेणे चालू आहे.
वासंतीताईंची ही वाटचाल दिसते तेवढी सहजसोपी मात्र नव्हती. कारण त्यांना झालेली पहिली मुलगी मेंदू विकाराने आजारी होती. रात्री दर १५ मिनिटांनी ती जागी होत असे. त्यामुळे तिच्याकडे बघावे लागे. साहजिकच वासंती ताईंची रात्रीची झोप नीट होत नसे. त्यामुळे खूप ग्लॅमरस दिसणे, त्यासाठी विशेष लक्ष देणे असे काही त्यांच्याकडून झाले नाही. एकदा तर बातम्या वाचण्यापूर्वी १० मिनिटे आधी फोन आला, त्यावेळी नंदकुमार कारखानीस वृत्त संपादक होते, त्यांनी फोन हाती दिला आणि शेजारणीने सांगितले, मुलगी पडली असून तिला खूप लागले आहे, रक्तस्त्राव जोरात चालू आहे, ताबडतोब‍ घरी या. हे ऐकताच वासंतीताई खूप रडू लागल्या, केलेला सर्व मेकप खराब झाला. हे पाहून कारखानीस म्हणाले, तुम्ही लगेच घरी जा, मी बातम्या वाचतो ! पण घेतलेला वसा सोडायचा नाही म्हणून वासंतीताईंनी स्वत:ला सावरले, घाईत मेकअप केला आणि नेहमीप्रमाणेच बातम्या वाचल्या. हे पाहून कारखानीसही खूप हेलावले आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रु तरळले. पुढे पंधरा वर्षांची झाल्यावर ही मुलगी वारली आणि एक अध्याय संपला. मोठी मुलगी चौदा वर्षाची असतानाच दुसरी मुलगी १९९१ मध्ये झाली. ही मुलगी आता एमबीए करीत आहे. खरे म्हणजे, पती खाजगी कंपनीत उच्च पदावर नोकरीस होते, तोपर्यंत सुरळीत जीवन सुरु होते. पण स्वत:चा उद्योग उभारायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडून दोन भागीदारांसह उद्योग उभारला. दुर्देवाने त्या दोघांमध्ये भांडणे होऊन पोलीस तक्रार झाली. पोलिसांनी कंपनीला सील ठोकले. दोन्ही भागीदार परदेशात निघून गेले. त्यामुळे घेतलेले एकत्रित कर्ज फेडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनीही पुढे वीस वर्षे हे कर्ज प्रामाणिकपणे फेडले. कर्करोगाने त्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. जवळपास पाच वर्षे ते कर्करोगाशी झुंझत होते. पण त्यांनी कधी हार मानली नाही. पतीचा अत्यंत संयमी, शांत स्वभाव, वडिलांची, सासुबाईंची पूर्ण साथ यामुळेच आपण सर्व कठीण प्रसंगातून स्वत:ला सावरु शकलो, असे वासंतीताई कृतज्ञपणे म्हणतात. माध्यमामध्ये राहिल्यामुळे खूप जग पाहता आले. आपल्यापेक्षाही किती लोक दु:खी कष्टी आहेत ते पहायचे आणि आपले दु:ख काहीच नाही असे त्यांना वाटायचे. सुदैवाने माहेर, सासरची सर्व मंडळी समजूतदार असल्याने मुलीकडे त्यांनी आत्मियतेने पाहिले. कधीही औषधांसाठी किंवा कशाहीसाठी पैसे कमी पडू दिले नाहीत वा कधी वासंतीताईंना दोषही दिला नाही.

प्रसार माध्यमांमध्ये राहूनही स्वत: प्रकाशझोतात न राहता इतरांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न वासंती ताईंनी सतत केला व करीत असतात. शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. विशेषत: साहित्य विषयक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यात त्यांना विशेष आवड आहे. आज प्रसार माध्यमांमध्ये मुली, महिला मोठ्या संख्येने येत आहेत, ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. माध्यमांच्या विस्तारामुळे मुलांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. पण या सर्व नवोदितांनी ग्लॅमरच्या आहारी न जाता समतोल जीवन जगले पाहिजे, असे वासंतीताई म्हणतात.

माध्यमांचा प्रकाश स्वत:वर ओढवून न घेता इतरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वापरायला हवा असं त्यांना सतत वाटत आलं. त्यातूनच त्या लेखनाकडे वळल्या. लोकसत्तामधल्या ‘एकला चलो रे’ या सदरानं त्यांना उत्तम लेखिका म्हणून मान्यता मिळाली. एकल पालक म्हणून विविध जबाबदाऱ्या हिंमतीनं पार पाडणाऱ्या स्त्रियांविषयी हे सदर ! होते. त्यातही सर्व आर्थिक स्तर, धर्म, जात, शैक्षणिक विविधता जपत या सदराचं रंगरुप रेखलं. त्यातून अशा वाटेवर चालणाऱ्या स्त्रियांना बळ मिळावे हाच उद्देश होता. मराठीतील कवयत्रिंची पंरपरा यावर सध्या त्या संशोधन, लेखन करीत आहेत. एक यशस्वी वृत्त निवेदिका म्हणून ओळख असणाऱ्या वासंती ताईंनी मराठी साहित्याचा, भाषेचा अभ्यास करुन जे संशोधनपर लेखन सुरु केले आहे, त्यामुळे त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली आहे.

— देवेंद्र भुजबळ.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..