त्या वेळी मी पत्रकारितेमध्ये नवाच होतो. 1971-72चा काळ होता तो. पुण्यातील त्या वेळच्या प्रतिष्ठित दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून माझी ती सुरुवात होती. उपसंपादक म्हणून कामाच्या निश्चित वेळा असल्या, तरी रात्रंदिवस कचेरीमध्ये पडून राहावं, गप्पा माराव्यात, काम करावं, नवं काही शिकावं असं ते वय होतं. स्वाभाविकपणे अत्यंत कमी अवधीतच मी मला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्तही काम करू लागलो होतो. कामाचा तरुण आहे, अशी प्रतिमा व्हायलाही मग वेळ लागला नाही. त्या वेळी पत्रकाराची काही व्यवच्छेदक लक्षणं होती. खांद्यावर शबनम बॅग आणि हातात सिगारेट असलेला तरुण हा पत्रकारच असला पाहिजे, असं समजलं जायचं. उदास, विषण्ण, दाढी वाढलेला तरुण म्हणजे कवी, अशी एक प्रतिमा त्या काळी होती. त्याचप्रमाणं पत्रकारांचं चित्रण हे असं व्हायचं. `सिंहासन’ या चित्रपटात निळू फुलेंनी पत्रकार रंगविला, त्याचा वेशही यापेक्षा वेगळा नव्हता. सांगायचा मुद्दा असा की, पत्रकाराच्या लेखणीएवढाच त्याची सिगारेट हाही एक प्रतिष्ठेचा भाग बनला असावा किंवा असं म्हणता येईल की, धूम्रपान हे अप्रतिष्ठेचं नक्कीच नव्हतं. त्या वेळी सायंकाळी पुण्यातील कोणत्याही वृत्तपत्राच्या कचेरीत आग लागली की काय, एवढा धूर भरलेला असे, तर अशा या वातावरणात माझ्या खांद्यावर शबनम आणि ओठात सिगारेट केव्हा आली, हे कळलंही नाही. मी काम करीत होतो. तेथे खरं तर मी अन्य सहकाऱयांपेक्षा वयानं लहान होतो; पण व्यसनात वयाचा अडसर येत नसावा. कारण, त्यातील आमची देवघेव ही समानता कशी असावी, याचा वस्तुपाठ देणारीच होती. असं असलं तरी सभ्यतेचे काही संकेत मी पाळत असे. एक दिवस एक सहकारी म्हणाला, “ज्यांच्याबरोबर दिवसातील 12 तास काम करायचय, तिथं कसले आलेय संकेत अन् कसला आलाय वयाचा मान.” एका अर्थानं माझ्या मुक्त
वागण्याला एक छान, समर्थ असं समर्थन मिळालं होतं. मा
ं धूम्रपान अधिक उघड
अन् बिनधास्त झालं होतं. अशीच एक दुपार. माझं काम सुरू व्हायचं होतं. एका सभागृहवजा दालनात आम्ही सारेजण बसत असू. आमच्या टेबलाच्या पलीकडे काही अंतरावर वृत्तसंपादक बसत. वसंतराव त्यांचं नाव. वय असेल पन्नाशीच्या आसपास. त्यांना शांतपणे एका जागेवर बसलेलं मी पाहिलं नव्हतं; पण त्या दिवशी ते स्वस्थ बसले होते. एका क्षणी त्यांची अन् माझी नजरानजर झाली. त्यांनी नजरेनंच खुणावलं, “या,” मी त्यांच्या पुढ्यात बसलो. ते शांत होते. काहीतरी बोलायची तयारी करीत असावेत. मिनिटभर तसंच गेलं, म्हणाले, “किशोर, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात, एक गोष्ट बोलू?” मी म्हणालो, “बोला ना. काहीच प्रश्न नाही.” ते म्हणाले, “तुम्ही सिगारेट ओढता. वय तरुण आहे तुमचं, इतर मंडळी काय करतात बाजूला ठेवा. त्यांच्यात बदल होण्याचं त्यांचं वय सरून गेलंय. तुम्ही अजूनही बदलू शकता. मनात आणलं तर सिगारेट ओढणं बंद करू शकता.” माझं धूम्रपान हा असा ऐरणीवरचा विषय होईल, असं वाटलं नव्हतं मला. मी म्हणालो, “सोडेन ना, त्यात काय आहे? आतापासून मी सोडतो.” वसंतराव म्हणाले, `बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. त्यामुळं आताच काही कबूल करा असं मी म्हणत नाही; पण मी एक योजना देतो. तुमच्या सिगारेटवर रोज किती खर्च होतो?” मी विचारपूर्वक कमी खर्च सांगितला. म्हणालो, “रोज एक रुपया” वसंतराव म्हणाले, “म्हणजे दरमहा 30 रुपये. तुम्ही असं करा. सिगारेट ओढणं थांबविलं की दरमहा तुमचे 30 रुपये वाचतील. मी एक पत्र देतो. इंटरनॅशनलच्या दीक्षितांना. (पुण्यात डेक्कनवर इंटरनॅशनल हे पुस्तकाचं प्रख्यात दुकान आजही आहे.) तुम्ही दरमहा 30 रुपये त्यांना द्यायचे. दीक्षित तुम्हाला 100 रुपयांची पुस्तकं देतील. तुमच्यासाठी उरलेली रक्कम मी त्यांना देईन.” मी “हो” म्हणालो, बाहेर पडलो. एक सिगारेट ओढली अन् ती सोडायचा विचार सुरू केला. या घटनेनंतर दोन महिने मी 30 रुपयांत
100ची पुस्तकं घेतली. त्यानंतर मात्र पुन्हा दीक्षितांकडे गेलो नाही. 30 रुपयांची बचत, 70 रुपयांचा लाभ आणि वाचनातून मिळणारं अमाप ज्ञान यापेक्षाही माझ्यातील व्यसनाला मी अधिक महत्त्व दिलं. त्यानंतरही मी सिगारेट ओढत असे; पण आसपास वसंतराव नाहीत ना, याची खात्री करूनच. आज जेव्हा हा प्रसंग आठवतो, तेव्हा वसंतरावांमधील माणसाचा, माणसाकडे, माणसापलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांना माझ्याबद्दल वाटलेल्या आत्मीयतेचा अभिमान वाटतो आणि त्या आत्मीयतेला न जागल्याचा सलही जाणवतो. माणसाला जीवनाच्या प्रवासात योग्य मार्ग दाखविणारेही भेटतात अन् दिशाभूल करणारेही.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply