करिअरच्या वाटा म्हणत असताना त्यात लेखन हा प्रांत काही वेळेस गणला जात नाही. पूर्णवेळ लेखनव्यवसाय करणारी माणसं अगदी अभावाने आपल्याला दिसतात. परदेशात मात्र ही संकल्पना रुजली आहे.को.म.सा.प. युवासाहित्यसंमेलनासाठी आपल्याला लाभलेले संमेलनाध्यक्ष हे पूर्णवेळ लेखन व्यवसायात आहेत. लेखन क्षेत्रातील आव्हाने त्यांनी कशी पेलली याबाबतचा त्यांचा हा लेख नवीन लेखकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
लेखन करणे जबाबदारी आहे. कथा कशी सुचते, कशी घडत जाते याचा विचार करत असताना, या विचाराला अनेक वाटा फुटत जातात, अनेक रस्ते दिसतात. पण प्रत्यक्ष कथा लिहिताना मात्र एकाच वेळी मानसिक खळबळीचा, उत्तेजनेचा, सुखाचा, वेदनेचा आणि तरीही एका ट्रान्सचा अखंड प्रवाह वाहत असतो. आपण जे वाचत असतो, जे पाहत-अनुभवत असतो, त्या सगळ्या माहितीचा-डेटाचा मोठ्ठा साठा आपलं मन साठवून ठेवत असतं. ही प्रक्रिया आपल्या कळत-नकळत घडत असते. या डेटाचं उत्खनन करण्याचं आणि त्यावर काहीएक प्रक्रिया करून त्याचं कथेत रूपांतर करण्याचं काम प्रत्यक्ष कथा लिहीत असताना आणि त्याआधी तिची मनातल्या मनात निर्मिती होत असताना चालू असतं. प्रत्यक्ष कथा लिहिली जात असताना, वाचनामुळे आपल्यावर झालेले संस्कार, पडलेला प्रभाव तसंच प्रत्यक्ष जीवनानुभवांचे ठसे (Impressions) आणि या कच्च्या मालाचा कथेचा आकार देणारं कौशल्य (Craft) या सगळ्याचा एकरूप असा मिलाफ होऊन कथा घडत जाते. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की, कथा कशी सुचते याचा विचार करताना त्या विचाराला अनेक वाटा फुटत जातात आणि प्रत्यक्ष निर्मिती होत असताना मात्र डोळ्यांसमोर एकच एक ध्येय असतं कथा !
खरं तर कथादेखील ध्येय नसतंच, तर आपल्याला आपल्या अनुभवांतून आणि निरीक्षणांतून काय सापडलं आहे हे अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं मांडता येईल हे ध्येय असतं, ज्याभोवती कथेची इमारत उभारली जाते. उदाहरणार्थ, ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहातली ‘एक कुत्ते की मौत’ ही कथा. एका पत्रकाराला कुत्र्याचं अर्धवट जळालेलं धड ‘माझा खून करण्यात आला आहे आणि तो तू शोध’ असं सांगतं आणि त्यातून पत्रकाराला अनेक रहस्यं समजतात, असं या कथेचं, कल्पित-वास्तव यांचा मिलाफ असलेलं ढोबळ कथासूत्र. यामागची संकल्पना अशी की, समाजात आपल्याला जे दिसतं ते फार वरवरचं असतं, पण त्याखाली अनेक गोष्टी लपून बसलेल्या असतात. त्या आपल्याला सहसा दिसत नाहीत. वास्तव हे असं वर-वर खरं वाटणारं, पण मुळात आभासी असतं. त्याच्या पोटात लपलेल्या किती तरी गोष्टी ते आपल्याला मुद्दाम दाखवत नाही. त्या उजागर करणं हे मला लेखक म्हणून माझं काम वाटतं.
ही कथा मला सुचली ती एका साध्याशा प्रसंगावरून. झालं असं की, मी पुण्यात जिथे राहतो, तिथे आजूबाजूला बंगल्यांची सोसायटी आहे. या बंगलेधारकांनी कुत्रे पाळले आहेत. परिणामी कुत्र्यांनी रस्त्यावर करून ठेवलेली शी ही ज्वलंत समस्या आहे. एकदा आमच्या बिल्डिगच्या गेटपाशी दुसऱ्या एका बंगल्यातील कुत्रे फिरवून आणण्याचं काम करणारा माणूस आणि आमच्या बिल्डिंगमधल्या वयस्कर आजी यांच्यात कडाक्याचं भांडण चाललं होतं. कारण होतं, आमच्या बिल्डिंगच्या गेटपुढ्यातच कुत्र्याने शी केली होती आणि तो माणूस आजींना वाट्टेल तशी उलट उत्तरं देत होता आणि हे सगळं ऐकत असताना, मला काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आठवली – काही कारणाने कुत्र्याला जाळून पुरून टाकण्यात आलं होतं. ही बातमी आणि मी पाहिलेला प्रसंग यांच्या जोडणीतून एक इंटरेस्टिंग कथा आकार घेऊ शकेल असं मला वाटलं आणि विचारप्रक्रियेला सुरुवात झाली. मला स्वत:ला मर्डर मिस्ट्रीज आवडतात. मी त्या बऱ्यापैकी वाचलेल्या आहेत. या वाचनाच्या संस्कारातून कुत्र्याचा खून झाला आहे आणि एक पत्रकार त्याचा छडा लावतो व त्यातून किती तरी माहीत नसलेल्या गोष्टी समोर येतात, ज्याला सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक असे अनेक कंगोरे असतात असा कथेचा ढाचा ठरला. कथा घडवत असताना मला तिची टिपिकल मर्डर लोकप्रिय कथा प्रकारांच्या घाटांना स्पर्धा करून जाणारी एक गंभीर, बहुस्तरीय आशय निर्माण करणारी कथा घडवायची होती, तसा माझा प्रयत्न होता.
बरेचदा कथा प्रत्यक्ष अनुभवातून किंवा घटना-प्रसंगांतून अथवा एखाद्या बातमीमधून वा कोणी तरी सांगितलेल्या किश्श्यातून सुचते खरी, पण तो बिंदू केवळ कथा सुचायचा बिंदू असतो – ट्रिगर पॉइंट असतो. कथा तिथे नसते. कथाबीजाला आकार मिळावा यासाठी इतरही अनुभव, घटनाप्रसंग किंवा मनात साठवलेला डेटा या अनुभवाला/घटना-प्रसंगांना जोडावा लागतो. ही जोडणी करण्यासाठी कल्पकतेची आवश्यकता असते. आपल्याला आलेले अनुभव जसेच्या तसे कथेत घ्यायचे नाहीत, असा मी मला घालून दिलेला नियम आहे. कारण मला फिक्शन निर्माण करायचं असतं आणि वर म्हटल्याप्रमाणे अनुभव सांगायचा नसतो, तर अनुभवांच्या पोटात काय दडलंय हे शोधायचं असतं. त्यासाठी अनुभवांच्या, घटनांच्या खोलात जायचा प्रयत्न करायचा असतो. कारण घडलेल्या कोणत्याही घटनेला अनेक बाजू, अनेक कंगोरे असतात. त्यांपैकी आपल्याला बरेचदा एखादी, फार तर दुसरी बाजू समजलेली असते. मला या घटनेला असलेल्या अनेक बाजू समजून घ्यायच्या असतात. त्या समजल्या की, त्या बाजूंची एक घुसळण मनात होते. त्यांच्यात घर्षण निर्माण होतं आणि त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ लागतात, ज्या आपल्याला माहीत नसतात. त्यातून त्यांच्यात घर्षण निर्माण होतं आणि त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ लागतात, ज्या आपल्याला माहीत नसतात. त्यातून एकुणात जगण्याबद्दलचं मर्म किंवा ‘इनसाइट’ सापडू शकते. ती मी कथेतून सांगायचा प्रयत्न करतो. कथाबीज सुचल्यावर ते लिहून ठेवण्याची माझी पद्धत आहे. मग ते काही काळ मनात मुरत राहतं. हळूहळू त्याचा विस्तार होत राहतो आणि त्यावरून मी त्या कथेत काय काय घडेल, कोणतं पात्र काय करेल, ते कसं घडत जाईल याचा एक कच्चा आराखडा तयार करतो. पण जेव्हा मी प्रत्यक्ष कथा लिहायला सुरुवात करतो, तेव्हा नेणीव-वर उल्लेख केलेला प्रचंड डेटा त्या कथेच्या आराखड्यात कितीतरी गोष्टींची भर टाकते. ही भर खूप इंटरेस्टिंग असते. कथालेखन करणं हे आपल्याच मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये जाण्याचं, कधीतरी आपण टिपून ठेवलेल्या गोष्टींकडे पुन्हा वळून पाहण्याचं आणि या अज्ञात जागांचं खनन करण्याचं काम असतं. हे खनन अज्ञाताचं असतं आणि त्यामुळेच त्यातून आपल्याला काय सापडेल हे सांगता येत नाही. या सापडण्याची एक भीती वाटत असते आणि भीतीच्या सुप्त आकर्षणामुळेच मी I लिहितो. अचंबित करणाऱ्या या अनिश्चितपणामुळेच कथालेखन मला कायम खेचत राहतं, मला लिहितं करत राहतं. हा एक शोध असतो किंवा एखादं कोडं आपल्या पद्धतीने वेगळ्या कोड्यात रूपांतरण करण्याचं ते काम असतं असं मला वाटतं. उदाहरणार्थ, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ ही दीर्घकथा. ही कथा मला नेमकी कशी सुचली हे नीट सांगता येणं कठीण आहे. कारण ती विशिष्ट एका घटनेमधून किंवा अनुभवामधून सुचलेली नाही, तर जगताना पाहिलेल्या अनेक घटनांतून मला सापडलेल्या सत्याचा ही कथा एक तुकडा आहे, ज्याला अनेक टोकं आहेत आणि ही टोकं बोचरी आहेत. या जगात आपण का आहोत, आपला जन्म का झाला हा सनातन अस्तित्ववादी प्रश्न, भारतीय कुटुंब व्यवस्था, त्यात व्यक्तीची खासकरून बाईची होणारी घुसमट, पुरुषी मानसिकता, नातेसंबंधांमध्ये एकमेकांवर अपराधभाव लादायच्या वृत्ती अशा विविध सूत्रांची ही कथा आहे. त्यामुळे तिची बांधणी आणि मांडणीही विविध निवेदकांच्या आतल्या आवाजातून आकाराला येते. तर ‘निळ्या दाताची दंतकथा’ ही दीर्घकथा जेव्हा मी लिहिली, तेव्हा कथेच्या शीर्षकापासून माझी भूमिका निश्चित होती. म्हणजे ही दंतकथा – म्हणजे फिक्शन आहे – पण त्यातून मला जे सांगायचं आहे, ते खरं, जगण्याबद्दलचं आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. दुसरं, यात दात निळा हे प्रतीक मुद्दाम वापरलं. निळा रंग बुद्धाचं, शांततेचं प्रतीक आहे. बुद्धाने सांगितलेली शहाणीव आज हरवून गेली आहे आणि मानवप्राणी विनाशाकडे चालला आहे, हे मला त्यातून सूचित करायचं होतं. ते करण्यासाठी स्वप्न-वास्तवाची मिसळण करायची हे ठरवून निवडलेला पर्याय होता.
‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही माझी पहिली कादंबरी म्हटली तर एका कॉलेजवयीन ‘वाया’ गेलेल्या युवकाची गोष्ट. मुंबईतल्या माटुंगा, दादर अशा भागात घडणारी. वास्तववादी. पण तिच्यात वास्तवाचा आभास निर्माण करून काही गोष्टी सांगायचा माझा प्रयत्न आहे. मराठीत दोनहजारोत्तरी काळात वाढलेल्या युवकांची बदललेली मानसिकता, त्यांच्या मनांमधली गुंतागुंत, त्यांचे नातेसंबंध आणि या सगळ्यांना वेढून असलेली वैश्विक उदासी असा या कादंबरीचा गाभा आहे.
‘९६ मेट्रोमॉल’ ही माझी दुसरी कादंबरी याच्या अगदी उलट. ही ज्याला ठोस फँटसी म्हणतात तशी. मयंक नावाचा तरुण एका मॉलमध्ये शिरतो आणि तिथल्या वस्तूंना वापरता वापरता वस्तूच त्याला वापरू लागतात, अशी ही कथा. पूर्णत: अद्भुत, फ्रीज, टीव्ही, मिक्सर, व्हिडिओ गेम्स अशी यातली पात्रं. लेखनामागची माझी भूमिका ही निरीक्षकाची आहे. एक असा निरीक्षक ज्याला आपलं मत आहे, विचार आहेत, पण तरी त्याला जगाकडे केवळ या मतांच्या चष्म्यातूनच पाहायचं नाहीये. हे विचार कुठून तरी, कसे तरी लेखनातून कळत-नकळत पाझरतातच. पण दुसरीकडे मला असंही वाटतं की, माझ्या मतांना, विचारांना मर्यादा आहेत, ते अपुरे आहेत. कथा-कादंबरी वा कविता या माणसाच्या जगण्याशी संबंधित असल्यामुळे मानवी जगण्याकडे आपण केवळ आपल्याच चष्म्यातून पाहावं असं मला वाटत नाही. मला जी माणसं दिसतात, भेटतात, माझ्याशी बोलतात, त्यांची उलघाल काय आहे, त्यांना काय वाटतं, हे मला समजून घ्यायचं असतं. त्यासाठी मी जास्तीत जास्त कोरं, रिक्त असावं असं वाटतं. म्हणजे एखादा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात मला आवडत नसला, पटत नसला, तरी लेखक म्हणून मला त्याचीही बाजू पाहावीशी, समजून घ्यावीशी वाटते. कारण मानवी संबंध अत्यंत गुंतागुंतीचे असतात, त्यात असंख्य रंगच्छटा असतात. या छटा मला लेखक म्हणून पकडायच्या असतात. तसा माझा प्रयत्न असतो. माणसा-माणसांमधले संबंध का घडतात, का बिघडतात, माणसं जवळ का येतात, आणि एकाएकी ती दूर का जातात याबद्दल मला कुतूहल असतं. एखादी घटना घडल्यावर मला त्या घटनेकडे लेखक म्हणून विविध कोनांमधून पाहायचं असतं. कारण आपल्याला जे वरवर दिसतं, त्यामागे अनेक घटना-प्रसंगांचा गुंता असतो. त्यामुळे आपल्याला जे वास्तव वाटतं, त्यात अनेक या गुंतागुंतीच्या घटनांचे स्तर असतात. कधीकधी तर हे स्तर आपल्यासमोर अगदी ढोबळरीत्या प्रक्षेपित केले जात असतात. त्यामुळे वास्तवामागे दडलेल्या, सहसा कोणी लक्ष देणार नाही अशा गोष्टींकडे पाहावंसं वाटतं आणि हे करत असतानाच मला आपल्या आयुष्याला घेरून असलेल्या असंगतीचं आणि अद्भुताचं, विलक्षणाचंही प्रचंड आकर्षण असतं. लेखनाकडे मी चुका आणि शिका (Trial and error) या दृष्टिकोनातून पाहतो. त्यातून मी शिकतो, नवनवीन शोध घेत राहतो. परिणामी आपल्या आंतरिक आवाजाला साक्षी ठेवून आपण सुचलेल्या कल्पनांना कथारूप देण्याचं काम करत राहावं असं मला वाटतं. दिसलेल्या अनुभवाला, आशयाला मी त्याला मला जमेल तसं भिडतो आणि त्यातून कथा निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि असं करताना यशापशाचा विचार मी करत नाही. असा विचार नसणं यातून जो आनंद मिळतो, तो मला महत्त्वाचा वाटतो व माझा हात लिहिता ठेवतो.
-प्रणव सखदेव
Leave a Reply