देशातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळी सण गणला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा आठवडाभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. वसुबारस पासून सुरू होणाऱ्या या सणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. देशातील वेगवेगळ्या प्रांतांत हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रीयन संस्कृतीत मात्र वसुबारस म्हणजे गोधनाच्या पूजेपासून या सणाला प्रारंभ होतो.
अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. दिवाळीची सुरुवात खऱ्या अर्थाने या दिवसाने घराघरांत केली जाते. गोधन पूजेचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. वसुबारस विषयी असलेल्या आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता गोवत्स पूजा केली जाते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढून दिवाळीस सुरुवात केली जाते. काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात, तर काही ठिकाणी गहू, मूग न खाण्याची प्रथा पाळली जाते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply