नवीन लेखन...

वासुदेव गोविंद आपटे

मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांाचे अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी झाला.

ते १८९६ साली कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या ‘हिस्लॉप’ कॉलेजात एक वर्ष फेलो आणि नंतर पुण्यात काही काळ शिक्षक होते. पुणे येथे असताना त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली. अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू”त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘ज्ञानप्रकाशा’च्या संपादनाचे काम त्यांनी केले. १९०६ साली त्यांनी ‘आनंद’ हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही सुरू असावे.

‘आनंद’चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी विचारसाधना नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्‌मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडांत मराठीत आणले आहे. वाल्मीकीचा जय ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे.

मूर्तिमंत देशाभिमान, माणिकबाग, आणि दुःखाअन्ती सुख ही पाश्चात्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास, मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत यासारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्‌बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे श्री. वा. गो. आपटे यांनी बाल व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते. ‘मराठी शब्दरत्नासकर’ हा मराठी-मराठी शब्दकोश हे आपटे यांचे अजरामर स्मारक आहे. वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन २ फेब्रुवारी १९३० रोजी झाले.

वासुदेव गोविंद आपटे यांचे साहित्य:- मिसेस हेन्री१वुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद; मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (१९१०), लेखनकला आणि लेखनव्यवसाय (१९२५), मराठी शब्दरत्नापकर (१९२२), मराठी शब्दार्थचंद्रिका (१९२२), आणि मराठी-बंगाली शिक्षक (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; जैनधर्म (१९०४), टापटीपचा संसार (१९१४), बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण (१९१८), सौंदर्य आणि ललितकला (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्‌मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..