(नवीन लग्न झालेल्या आणि होणाऱ्या नवीन वधूंना काही सांगावेसे वाटले म्हणून. खर तर आत्ता हे सगळं सांगायची गरज नाही पण राहवत नाही.)
चिं सौ….
परवा आईचा मेसेज आला ती नाराज होती. आणि मलाही काय वाटलं ते सांगू शकत नाही पण चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत असे मनापासून वाटत होते म्हणून. लग्नानंतर कौतुक आणि आनंदी जीवन यामुळे बाळसे येते. मात्र जाडी वाढू लागली की स्वतःला सावरावे. आता संसार दोघांचाच आणि कामे कमीच असतात. शिवाय पूर्वी सारखे सडासारवण. भांडीधुणी. चुलीवर स्वयंपाक. मोठ घर मोठ कुटुंब नसल्याने आरामात बसून राहणे बरोबर नाही. आता नोकरी करणार नाहीस ना म्हणूनच चार गोष्टी सांगितल्या आहेत आणि नोकरी करणार असशील तर माझे सांगणे नक्कीच ऐक. ओट्यावर स्वयंपाक मग काय उठबस नाही. सगळं काही हाताशी. आणि बाहेर जायचे म्हणजे चालत नाही अगदी कोपऱ्यावर असलेल्या दुकानात जातांना देखिल वाहन. दोन माणसं पण पोळ्याला बाई. भांडीधुणी. फरशा पुसणे आणि बरेच काही तिच्या वर सोपवून काय करायचे तर मोबाईल. फोन. टिव्ही. मैत्रीणी. गप्पा आणि अधूनमधून सहली. शॉपिंगला जाणे. या सगळ्यात आरोग्य. खाण्याचे नियोजन नाही. आणि कधी कधी बाहेरचे खाणे ठीक आहे पण नेहमीच बाहेरचे खाणे योग्य नाही. त्यामुळे आयते पणाची सवय झाली की घरी करायला नको वाटते. आणि हातातील रुचकर पदार्थ करण्यातील सुगरणपणा नाहीसा होतो. व्यायाम नाही. त्यामुळे जाडी वाढू लागली की स्वतःला सावरावे असे वाटते म्हणून नियंत्रण सुरु. हे खायला नको ते खायला नको. असे नाही तर शरीराची हालचाल झाली पाहिजे. मग भूक लागते. अंग मोकळे पणाने काम करण्याची गरज आहे. पूर्वी घर सारवणे. धुण्यासाठी वाकणे. झाडलोट. जात्यावर दळण. खाली बसून स्वयंपाक. जेवण खाली बसूनच सगळे उठबस करत. वाकून उभे राहून असे होते आणि आता हे सगळे बदलून गेले आहे पण जेवढे शक्य असेल तेवढे करत जा. सकाळी घरची कामं स्वतः कर. सोसायटीच्या आवारात लवकरच उठून फिरायला जा. योगासने. ध्यान नियमितपणे करत जा. अंघोळ करून देवाचे जे काही करतेस ते अगदी शांतपणे बसून करत जा. थोडा वेळ लागतो पण दिवसभर मन प्रसन्न असते. गॅस वर स्वयंपाक करताना अगोदर अन्नपूर्णेला स्मरुन पाया पडून सुरुवात करत जा आणि विष्णु सहस्त्रनाम म्हणत केले तर अन्न शुध्द व पवित्र होऊन रुचकर लागते. आणि पुरते.
आता तुझ्या वर आईचे संस्कार झालेले आहेत म्हणून त्याबद्दल जास्त सांगत नाही. फार तंग कपडे. हवामानाचा विचार करून. आवश्यक तेवढेच. वारेमाप खर्च करून आवडते म्हणून आणणे बरोबर नाही. हौस मौज करावी नक्कीच पण मर्यादित. सांगायला बरेच काही आहे म्हणून तुला जास्त सांगणार नाही. पैसा वाचवणे म्हणजे मिळवणे होय. खर तर मला हे सांगायला नको वाटते तरीही सांगावेसे वाटते की आयुष्यात तुमच्या भाषेत सांगायचं तर एन्जॉय म्हणून मूल उशिरा होऊ देणे हे अजिबात चुकीचे आहे. आधीच वय शिक्षण नोकरी लग्न हे सगळे वेळीच होत नाही त्यात हा विचार याचा काय परिणाम होतो याचा विचार करून निर्णय घ्यावा. आता तसेही अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. वाचन. माहिती. डॉक्टरांनी दिलेला सल्ला. आजुबाजुला काय चाललय याची माहिती मिळतेच त्यामुळे मी आणखीन काय सांगू प्रत्येक गोष्ट आयुष्यात वेळच्या वेळी होणे आवश्यक असते. आणि तो काळ सुखाचा असतो. आता सासुरवास. नवऱ्याचा त्रास वगैरे नाही म्हणून मन स्वैराचारी नको. आपले कुलदैवतेचे तर कुळधर्म वगैरे केलेच पाहिजेत. आणि घरातील वडील धाऱ्या माणसांचा योग्य तो आदर मान सन्मान ठेवला पाहिजे. त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असतात. आणि आशीर्वाद पैसा खर्च करून मिळत नाहीत सेवेचे व्रत असते ते. तुला माझे सांगणे आवडते की नाही माहित नाही पण एक आज्जी या नात्याने राहवत नाही म्हणून. आणि आई होणं सोप आहे पण आईपण निभावणे अवघड असते. अगदी सुरुवाती पासूनच याचा विचार करायला हवा. आणि आता ते तर फारच सोयीचे झाले आहे. त्यामुळे मी ते सांगणार नाही. आई होणं म्हणजे स्रीत्व सिद्ध एवढाच संकुचित अर्थ नाही तर आई का व्हावं. कुणासाठी. कशासाठी यातील अर्थ समजला तर सोन्याहून पिवळे. आता जास्त नाही पण परत एकदा सांगते की शारीरिक हालचाल आणि मानसिक तणाव याचा विचार करून निर्णय घे. तू म्हणत असशील की आज्जी शिक्षिका होती आणि आता वेळ भरपूर आहे म्हणून हिचे शिकवणे सुरू. असे नाही बाळा अनेक स्वतःचे इतरांचे अनुभव घेऊन पाहूनच सांगितले आहे. दोन्ही घराणी वाट पहात असतात गोड बातमीची आणि मी तर काय? पण त्याचाही अतिरेक नको. हा आनंद समाधान आपल्या घरापुरताच व्यक्त केला जावा. त्यामुळे माझ्या म्हातारीचे चार गोष्टी ऐकल्यानंतर विचार करून निर्णय घे. मला खात्री आहे की नवीन पिढी ऐकते पण चॉकलेट द्यावे लागते होय ना. शहाणं माझ बाळ ते.
तुझीच आज्जी,
सौ. कुमुद ढवळेकर.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply