वाटतो आहे नकोसा पिंजरा!
लागली तृष्णा नभाची पाखरा!!
संपली नाही प्रतीक्षा जन्मभर
वाट बघणाराच झालो उंबरा!
स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले?
काळजाचा शोध कानाकोपरा!
तू नको बोलूस काही, शांत बस
सांगतो आहे कहाणी चेहरा!
तूच माळायास नाही राहिली….
पार कोमेजून गेला मोगरा!
ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते….
कोण खोटा, कोण अन् आहे खरा?
प्रेत म्हणते, का रडू यांच्यापुढे?
एकही यांच्यात नाही सोयरा!
खूप भिरभिरला, अखेरी श्रांतला….
शोधतो वारा स्वत:ला आसरा!
नाव मी येवू दिले नाही तुझे…
का तुझा आवाज झाला कापरा?
थेंबही आडात पाण्याचा नुरे….
वासुनी ‘आ’ पाहतो बघ पोहरा!
— प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
Leave a Reply