उन्हाळा कितीही प्रदीर्घ व रणरणता असला तरीही तो पहिल्या पावसाची रिमझिम कधीच थांबवू शकत नाही. डोंगर कितीही विशाल व मजबूत असला तरीही त्यातून खळखळणारा एक लहानसा झरा नेहमीच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत असतो. तसेच मानवाच्या व्यक्तिमत्वामध्ये कितीही स्वार्थी, निष्ठुर व गुन्हेगारी प्रवृत्तींचं मिश्रण झालेल असलं तरीही त्याच्या मनामध्ये दडलेल्या असामान्य परोपकारी व त्यागशील भावना तसेच समाजाचं ऋण फेडण्याची त्याची असलेली इच्छा व जिद्द कधीच मरत नाही. दुर्दैवाने आजच्या प्रसारमाध्यमांमधून व अगदी क्रमिक पुस्तकांमधूनसुध्दा या स्वार्थी व आत्मकेंद्रित मानवी स्वभावावरच जास्त प्रकाशझोत टाकला जातो व विवीध स्तरांमधील व्यक्तींसाठी निकोपपणे झटणार्या संघटनांकडे व व्यक्तींकडे मात्र तितकसं लक्ष दिलं जात नाही.आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी संस्था व माणस आहेत की, ज्यांच्या समाजकार्याची साधी दखलसुध्दा घेतली जात नाही.
अलिबागमध्ये “वात्सल्य” या संस्थेची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली, व आजपर्यंत म्हणजे गेली आठ वर्षे ही संस्था अनाथ अर्भकांच्या सुखाकरिता व त्यांच्या गोड चेहर्यांवरचं निरागस हास्य टिकवून ठेवण्याकरिता अहोरात्र झटत आहे. लोकसंख्या वाढावी अशी आमची अजिबात इच्छा नाही, परंतु जन्माला आलेल्या अभ्रकाला मात्र निरोगी, आनंदी, व जरा ऐटीत आपलं बालपण घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे व हा अधिकार आम्ही प्रत्येक नवजात अर्भकाला मिळवून देतो असे या संस्थेच्या प्रकल्पमुख्य सौ. गीता वैशंपायन ठामपणे सांगतात.
लहान मुलांना आपल्या संस्कृतीत देवाचं रुप मानलं जातं, परंतु जेव्हा ही बालके त्यांच्या जन्मदात्यांच्या स्वैराचारामधून जन्माला येतात तेव्हा त्यांना अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलं जातं. परंतु आज वात्सल्य सारख्या संस्था या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असल्यामुळे साक्षात तो परमेश्वरसुध्दा निश्चिंत झाला असेल. “वात्सल्य” या संस्थेच वेगळेपण म्हणजे इथे व्यवसाय म्हणून या बाळांचं संगोपन केलं जातं नाही, तर इथे त्यांना आईच्या प्रेमाने व बाबांच्या भक्कम मानसिक आधाराने मोठं केलं जातं. इथे येणारी मुले या संस्थेची पायरी ओलांडल्यानंतर येणार्या मुलं अनाथ राहातच नाहीत उलट त्यांना कितीतरी प्रेमळ आया इथे मिळतात. या मुलांच्या अंघोळीपासून ते त्यांच्या कपडयांपर्यंत तसेच त्यांच्या पोषक आहारापासून ते त्यांच्या खेळण्यांपर्यंत सगळी बडदास्त अगदी उत्तमरित्या येथे ठेवली जाते व त्यात कुठलीही तडजोड केली जातं नाही. सगळया उच्च प्रतीच्या सुगंधी पावडरी, साबणे, उटणी व इतर सौंदर्यप्रसाधने अशी येथील चिमुकल्या सदस्यांची राजेशाही सरबराई सतत चालू असते. बाळांची खोली वारंवार स्वच्छ केली जाते व इतर शाळेतील विद्यार्थ्यांकडून भेट मिळालेल्या चित्रांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी सजवली जाते.
ही संस्था अलिबागमधील काही धडाडीच्या महिलांमार्फत चालवली जाते व आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदार्या पार पाडून या महिला, या लहान बाळांच्या जीवनात पहिल्या पावसासारख्या धाऊन येतात. त्यांना त्यांची आई मिळते, आईचं कुठल्याही शब्दात वर्णन न करता येण्यासारखं व कुठल्याही मापात न मोजता येण्यासारख तिच्यासारखचं निर्मळ व निर्भेळ असं प्रेम मिळतं, व त्यांच्या उज्वल भविष्याची तजवीज करणारं उबदार घरटंसुध्दा मिळतं. या संस्थेमध्ये अर्भकांची काळजी घेण्यासाठी अनेक सेविकांची नेमणूक केली असून त्यासुध्दा अगदी परोपकारी वृत्तीने व सेवाभावाने या बालकांची काळजी घेतात. बालकांना इथे अंघोळीसाठी कोमट पाणी दिलं जातं, विजेच्या लपंडावामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून इन्व्हर्टरची सोय केली गेली आहे, यातील काही अशक्त बालकांना व्हिटॅमिन्सचे ड्रॉप्स व औषधे दिली जातात, व सर्वांना ठराविक प्रतिचा उत्तम आहार दिला जातो, तसेच या बालकाच्या आरोग्यासाठी, व लसीकरणासाठी अलिबागमधील सर्व मुलांचे लाडके डॉ. धामणकर बांधिल आहेत. नवीन अर्भकांना या संस्थेत आणल्याबरोबर त्यांच्या अनेक वैद्यकिय चाचण्या व तपासण्या केल्या जातात, कारण ही बालके टाकली गेली असल्याने व त्यांचे पुरेसे पोषण न केले गेल्यामुळे त्यांना काही रोगांची जसे की HIV ची लागण झाली असल्याची दाट शक्यता असते. येथील सेविकासुध्दा अतिशय स्वच्छ, टापटीप आणि निरोगी असल्यामुळे त्यांच्यापासून या बाळांना कुठलाही संसर्ग होण्याचा धोका नसतो.
या मुलांना दत्तक देण्यापुर्वी त्या कुटूंबाची पार्श्वभूमी, त्यांचे आर्थिक उत्पन्न, इतर कुटुंबसदस्य व सर्वांचे स्वभाव, त्यांना लहान बाळांविषयी वाटणारी ओढ व माया या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करुन मगच ही मुलं दत्तक दिली जातात. मुलांना दत्तक देण्यापुर्वी पुरेसा काळ जाऊ दिला जातो व या काळात त्या मुलांची मानसिक व शारिरिक वाढ व्यवस्थित तपासली जाते व या सर्व बाबींमध्ये उत्तीर्ण होणार्या अर्भकांनाच दत्तक दिलं जातं. या मुलांना उपजत काही दोष किंवा व्यंग असतील, तर त्या कुटूंबाला नंतर दुःख सहन करावं लागू नये हा त्यामागचा उदात्त हेतू असतो. या मुलांची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ, विकास मन मोहून टाकणार्या त्यांच्या विविध लीला, व त्यांच्या आयुष्यात फुललेली नवचैतन्याची कळी या सर्व गोष्टी ही संस्था प्रत्यक्ष अनुभवते व पोटच्या गोळयाप्रमाणे सांभाळलेल्या या बालकांना त्यांच्या नव्या कुटूंबाकडे सुपुर्द करताना एकीकडे त्यांचा डोळयांत विरहाचे दुःख असते तर दुसरीकडे त्यांच्या हृदयात असतो तो समाधानाचा व आनंदाचा कल्लोळ!
— अनिकेत जोशी
Great job by Mehendale madam
I want to adopt a chield please help
Mala vashlya trust cha contact number milel ka ?
vatslya trust khup chagale kam karat aahe…. hats of
BEST OF LUCK VASTLYA TRUST
मी वात्सल्य ट्रस्ट चा कायम ऋणी आहे, आज त्यांचे सहकार्य, औदार्यामुळे माझ्या घरात खळखळणारा झरा वाहत आहे. त्यांचे श्रम आणि त्यागाला जगात तोड नाही.