वयाचे हे गणित काही
मनाला माझ्या कळेना
ते तरुणच राहिले
शरीर काही साथ देईना
आठवणी तेव्हाच्या रंगबिरंगी किती
फुलपाखरासारख्या केव्हाच उडून जाती
प्रेम, राग, लोभ.. प्रत्येक श्वासात झळकती
आता तेच सारे मला मुलींच्या डोळ्यात दिसती
आरसा तेव्हाचा हाती धरिला
तेव्हाचं प्रतिबिंब काही मिळेना
तेव्हाची मी कुठे हरवले
श्वास घेताघेता जगणंच का मी विसरले?
पण मग जाणीव झाली
आयुष्याच्या सत्याची
मी रुजवलेली रोपं
आता मोठी होऊ लागली
आता त्यांच्या प्रेमाचे, रागाचे, लोभाचे दिवस
फुलायचे, बहरायचे, रुसण्या-फुगण्याचे दिवस
त्यांच्या तरल डोळ्यांतील स्वप्न आता बघायची
आपल्या वेलींच्या फुलांनी ओंजळ आपली भरायची
— डॉ. सुनिता ओक
Leave a Reply