दोन तीन दिवसापूर्वी माझी दाढ खूपच दुखत होती. पण सून बाई म्हणाल्या की आता हे असं होणारच. त्यामुळे औषध वगैरे दिले होते पण मला राग आला होता की मला सहन होत नाही. आणि ही म्हणते की खरं तर बरोबरच आहे ना आता एकेक होणारच. आणि त्यातून वय झाले की घाबरून जायला होते.
लहानपणी आई जवळ नसली की भिती. अंधाराची भिती. गोष्टीतील चोराची. भूताची भिती. शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांची भिती. वर्गातील व्रात्य मुलांची भिती. आणि जसे जसे वय वाढते तसे तसे भिती कमी व निडरपणा येतो. साहसी वृत्ती वाढत जाते. एक आव्हान म्हणून अनेक गोष्टी करायला सुरुवात होते. त्यामुळे ते साहस आहे की थरार हे समजत नाही. काही जण हिमालयाच्या शिखरावर. अंतराळात. समुद्रात. जंगलात. प्रवासात अनेक वर्षे घालवतात. तर काही जण देशभक्ती. समाजसेवा. यासाठी साहसी होतात. सामान्य माणसाला हे सगळे जमत नाही पण वयाच्या चाळीस ते पन्नास यात धडाडी. साहस. अडचणी वर मात करुन अनेक यश मिळवता येतात. आणि नंतर मात्र परत भितीचे सत्र सुरू होते वय वाढत जाते आत्मविश्वास कमी होतो दहा माणसांच्या स्वयंपाकाची तयारी पटकन आता दोन माणसं आली साधा चहा करायचा म्हणजे भिती वाटते . पण यावेळी हे फक्त स्वतःच्या पुरतेच मर्यादित न राहता मुले नातवंड नातेवाईक. आणि समाजातील विविध प्रकारच्या घडामोडी हे सगळे पाहून भितो. माझ्या बाबतीतील एक अनुभव असा. नोकरी. घरातील जबाबदारी. सणवार. आणि खूप काही करुन झाले. निवृत्तीनंतर मुलाकडे इथे आल्यावर एकटे पणा. दार बंद करून बसणे. अनेक लोक दिसायचे पण बोलणे नाही. भितीला सुरुवात झाली आणि मग बी पी वाढले म्हणून चेकअप साठी दवाखान्यात गेले की नबंर येईपर्यंत काही नाही आणि आत मध्ये गेले की एकदम बी पी वाढायचे. मग डॉ नी प्रयोग केला होता. बाहेर बसले असताना दुसऱ्या डॉ कडून तिथेच चेकअप. आणि मग आत मध्ये गेल्यावर हे डॉ चेक केल्यावरचा फरक खूपच पडायचा. बाहेर विषेश नाही पण आतमध्ये खूपच वाढलेले. कारण एकच होते की मी इथे रुळले होते पण रमले नाही म्हणून मानसिक त्रास होत होता पण सांगता येत नव्हते.
आणि आता तर भितीचे हे वलय मोठे झाले आहे. जाणवत आहे पण सांगता येत नाही. एकटीने खूप लांबचा प्रवास केला आता दोन तासाच्या प्रवासात भिती. आजारांच्या वेदना सहन करत कामे केली. आता थोडे दुखले तरी सहन होत नाही. कुणी थोड बोलले तरी त्रास होतो न बोलले तरी त्रास. काही समजत नाही. आणि भिती जात नाही..
फक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हेच मनाला धीर देणारे आहे.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply