पशूनां पतिं पापनाशं परेशं
गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम्।
जटाजूटमध्ये स्फुरद्गांगवारिं
महादेवमेकं स्मरामि स्मरारिम्।।१।।
वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सगळ्या ज्ञानाचे सार अर्थात परमतत्व ते वेदसार. ते तत्व आहेत भगवान शंकर. त्यांची स्तुती. वेदसारशिवस्तोत्रम्.
कोणत्याही अधिक विवेचनाची आवश्यकता नसलेले, जिभेवर ठेवलेली साखर जितक्या सहजतेने विरघळत जाते तशा सहजतेने यांच्या शब्दांचे अर्थ श्रवणा सोबत हृदयात उतरत जातात. इतके अलवार स्तोत्र. साधे, सोपे, सरळ स्तोत्र.
या स्तोत्रात भगवंताची स्तुती करताना आचार्यश्री म्हणतात,
पशूनां पतिं – संस्कृत मध्ये सर्व जीवांना पशु असे म्हणतात. या सर्व जीवांचे पती अर्थात संचालक. पालन कर्ते.
पापनाशं – ज्यांच्या नामस्मरणरूपी अग्नीने भक्तांच्या पापरूपी इंधनाचा पाहता-पाहता नाश होतो असे.
परेशं – ईश म्हणजे देवता. सर्वश्रेष्ठ देवता म्हणून परेश.
गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं – हत्तीचे कातडे वस्त्र रूपात धारण करणारे.
वरेण्यम् – वर म्हणजे श्रेष्ठ. त्या श्रेष्ठांमधील देखील सर्वश्रेष्ठ ते वरेण्य.
जटाजूटमध्ये स्फुरद्गांगवारिं- ज्यांचा जटे मध्ये गंगेचा पाण्याचे प्रवाह उसळ्या घेत राहतात असे.
महादेवमेकं
स्मरामि – ज्या एका महादेवाचेच मी स्मरण करतो . अर्थात त्यांच्या शिवाय मला कोणतेही अन्य शरण स्थान नाही. अन्य कशाचाही मी विचार देखील करीत नाही.
स्मरारिम् – ते भगवान शंकर, हे स्मर म्हणजे भगवान मदनाचे अरी म्हणजे शत्रू आहेत.
त्यांनी मदनाला जाळले होते. त्यांना प्रार्थना आहे की माझ्या मनातील देखील काम इत्यादी वासनांना शांत करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply