त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे
त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश
लिंगात्मकं हर चराचरविश्वरूपिन्।।११।।
विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे एकमेव कारण अशा स्वरूपात आपल्या उपास्य देवतेची आराधना केली जाते.
सर्वच देवतांचे वर्णन त्याच स्वरूपात पाहावयास मिळते.
श्री गणेश अथर्वशीर्षात श्री गणेशाचे वर्णन येते,
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
त्याची आठवण करून देणारी ही रचना. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे – हे भगवान मदनारी शंकरा ! हे सर्व जग आपल्यापासूनच निर्माण होते.
त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ – हे विश्वनाथ भगवान शंकरा ! हे सर्व जग आपल्याच ठिकाणी स्थिर आहे. अर्थात आपल्या आधारावरच हे सर्व जग चालत आहे. आपणच या सर्व जगाचे पालन कर्ते आहात.
याच साठी आपल्याला श्री विश्वनाथ असे म्हणतात. आपण या सगळ्या विश्वाचे पालक आहात.
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश – हे जगदीश्वरा ! हे सर्व जग आपल्याच ठिकाणी लय पावणार आहे. या विश्वाच्या अंतिम स्थानी आपणच विराजित आहात. त्याचेच प्रतीक रूपात आपण स्मशानात निवास करता.
लिंगात्मकं – शिवलिंग, ज्योतिर्लिंग हे आपले अद्वितीय स्वरूप आहे.या स्वरूपात आपली मूर्ती आपल्या अमूर्त तत्त्वाचे निर्देशन करीत असते.
हर चराचरविश्वरूपिन् – चराचर विश्वामध्ये व्यापून असलेल्या हे भगवान शंकरा ! माझ्या समस्त दुःखांना हर म्हणजे दूर करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply