अजं शाश्वतं कारणं कारणानां
शिवं केवलं भासकं भासकानाम्।
तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं
प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम्।।७।।
भगवान श्री शंकरांच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
अजं – ज म्हणजे जन्माला येणे. तर अ उपसर्गा चा अर्थ नाही. जो जन्माला येत नाही. जो असतोच असतो. जन्माला येत नसल्याने मृत्यूचा प्रश्नच नाही. त्या परमात्म्याला अज असे म्हणतात.
शाश्वतं – चिरंतन. स्थाई. भूत भविष्य वर्तमान तीनही काळात स्थिर.
कारणं कारणानां – शास्त्रामध्ये निर्माण होणाऱ्या पदार्थाला कार्य असे म्हणतात. तो ज्या पासून निर्माण होतो त्याला कारण असे म्हणतात. उदाहरणार्थ घट हे कार्य आहे. माती हे त्याचे कारण आहे.
अशा स्वरूपात संपूर्ण विश्वाच्या सर्व कारणांचे कारण अर्थात सर्व निर्मितीचा मूलस्रोत.
शिवं- पवित्र. मंगल.
केवलं – शुद्ध चैतन्य. मायेचा स्पर्श नसलेली अवस्था.
भासकं भासकानाम् – येथे भास शब्दाचा अर्थ जाणीव असा आहे. ज्याच्या मुळे जाणीव होते त्याला भासक असे म्हणतात. सामान्य भाषेत सूर्य. सूर्यप्रकाशामुळे सर्व वस्तूंचे ज्ञान होते.
त्या तेजस्वी सूर्या च्या मागे असणारे मूलभूत तेज.
तुरीयं – जागृती,स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पार असणारी दिव्य समाधी हा ज्यांचा स्वभाव आहे असे. तम:पारम् – तम म्हणजे अंधार. अज्ञान. त्याच्या पार असणारे. ज्ञानमय.
आद्यन्तहीनं- आदी अंत हीन अखंड अस्तित्व.
प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम् – त्या परमपावन, द्वैताच्या अतीत असणाऱ्या भगवान शंकरांना मी शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply