नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते
नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते।
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य
नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य।।८।।
भगवान शंकरांच्या या दिव्य स्वरूपाला वंदन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते – विभू शब्दाचा अर्थ आहे व्यापक. ते वास्तवात अमूर्त असलेले व्यापक चैतन्य या विश्वाच्या स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात येत असते. त्यामुळे त्याला विश्वमूर्ती म्हटले. ह्या भगवंताला नमस्कार असो.
आचार्य श्री नमस्ते नमस्ते असा दोन वेळा उल्लेख करीत आहेत. त्यातला सामान्य अर्थ त्यांना वारंवार नमस्कार असो असा होतो. तर द्विरुक्ती करण्याचा दुसरा अर्थ फक्त आणि फक्त त्या भगवान शंकरांना नमस्कार असो अशी एकनिष्ठता त्यातून सुचवलेली आहे.
नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते- ते परमात्मतत्व चिदानंद अर्थात चित् म्हणजे चैतन्य, ज्ञान तथा आनंदाने परिपूर्ण असते. त्याला वंदन असो.
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य – भगवंताला तपाच्या किंवा योगाच्या मार्गाने जाणून घेता येते. त्याचा अनुभव घेता येतो. त्यामुळे त्या तत्त्वाला तपो- योग- गम्य असे म्हणतात. अशा त्या भगवान शंकरांना वंदन असो.
नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य – श्रुती म्हणजे वेद. प्राचीन काळी ज्ञान ऐकून पाठांतरानेच स्मरणात पक्के बसवत होते. ऐकून मिळत असल्याने त्याला श्रुती असे म्हणतात. त्या श्रुती अर्थात वेदांमध्ये, उपनिषदामध्ये, शास्त्रांमध्ये सांगितलेल्या ज्ञानाने ज्यांना जाणता येते ज्यांना श्रुतिज्ञानगम्य असे म्हणतात.
अशा त्या भगवान शंकरांना वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply