बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश.
आठवडी पगार झाला बाबूच्या हातात १५० रुपये पडले , आता ह्यातले १०० रुपये आईला द्यायचे आणि उरलेल्या ५० रुपयांचं काय करायचं हे त्याच आधीच ठरलेल होत , त्यासाठी तो दुकानात गेला.
“ बोला , मालक , कोणती चप्पल दाखवू “
“ बायकांची “
“कोणत्या नंबरची “
“नंबर ? नाही माहित “
“मग आता ,”
“ बघा ना तुमच्या अंदाजाने हे बघा इतकी , माझ्याहून इतकी मोठी मुलगी आहे ,”
“ तसं कस उंचीवरून तुम्हाला चप्पल द्यायची “
“मग आता काय करणार “ बाबू ने त्यालाच विचारल .
“ हे बघा , तुम्ही अस करा, त्या पोरीला घेऊन या दुकानावर ,”
“ नाही नाही , ती नाही येणार , तुम्ही अस करा हे बघा हि चप्पल आहे बरोबर हीच द्या मला ,”
“बर, पायात बसली नाही , तर परत करा पण चप्पल जास्त घाण करू नका “ मालकाने बाबू ची अडचण लक्षात घेऊन त्याला तोडगा सांगितला.
“ हो हो ,त्याची तुम्ही काळजीच नका करू “ अस म्हणून बाबू चपलेचे २० रुपये देऊन चप्पल घेऊन गेला .
त्यानंतर त्याला तिच्या साठी पोलका घ्यायचा होता म्हणून तो कपड्याचा दुकानात गेला ,
त्याला तिकडे काही समजत नाही , तिकडे एक त्याच्या आई च्या वयाची बाई त्याला दिसली , त्या बाई च्या मदतीने तो तिच्यासाठी पोलक्याच कापड खरेदी केल.
पण आता ह्याच कापडाच करायचं काय , शिवायला कस द्यायचं , तो धीर एकवटून बायडाला पुन्हा भेटला.
“ हे तुझ्यासाठी” चप्पले ची पिशवी तिच्याकडे देत बाबू म्हणाला .
“ काय हाय ह्यात “ बायडाने पिवशीच्या आत डोकावत विचारल.
“ बघ , तू “ बाबू थोडा धीर करत तिच्या चेहर्या कडे पाहिलं
“ चप्पल, माझ्यासाठी “ बायडा काहीशा आनंदाने बोलते.
बाबू ने तिला मानेनेच होकार दिला
ती पायात होते कि नाही हे पाहण्यासाठी चप्पल खाली टाकणार तितक्यात बाबू ने थांबवलं आणि खिशातून रुमाल काढून खाली रस्त्यावर अंथरला.
बायडला काही समजत नाही .
“ हे तू काय करतुयास “ बायडा त्याला आश्चर्याने विचारते.
“ तो दुकानदार म्हणाला , झाली नाही तर बदलून देतों पण घाण नका करू चप्पल “
“ अस हाय का , पण मग रुमाल का टाकतुयास रस्त्यावर मी कामावर जाऊन घालून बघन,” तिने चटकन त्याचा रुमाल उचलला, झटकून व्यवस्थित घडी करून तिने त्याच्या पुढच्या शर्टच्या खिशात नीट ठेवला .
त्या कृतीमुळे बाबूच्या चेहऱ्यावर हलकस स्मित आल ,
“ अजून एक , थांब हा “, बाबूने पोलक्याच कापड पिशवीतून काढून तिच्या हातावर ठेवलं.
ते कापड बघून मात्र बायडाचे डोळे भरून आले .
आणि भरल्या डोळ्यानीच तीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
“हे आणिक कशासाठी “
बाबूने चटकन खिशातून रुमाल काढून बायडा समोर धरला , पण तो रस्त्यावर आपण टाकला होता हे लक्षात येताच तो लगेच खिशात कोंबला आणि तेच पोलक्याच कापड तिला देऊन “ हे घे डोळे पूस आधी , आवडलं ना तुला हा रंग , कि तुला दुसरा हवाय “
“ छान हाय , पण हे मायासाठी , काहून घेऊन आलास “
“ असच”
बायडा गालातल्या गालात हसते आणि “ चल ,मला कामावर जाव लागलं, उशीर होतोय “ अस म्हणून ती निघून गेली .
बाबू समाधानाने तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहिलं आणि मग तो देखील कामावर निघून गेला.
रात्री आकाशात टिप्पूर चांदण पडलेल होत , ते पाहत असतानाच त्याला बायडाचे आज पाहिलेले पाणी भरले डोळे आठवले आणि त्याच वेळी दूर कुठेतरी तरी रेडीओ वर तलत मेहमूद त्याच्या सुमधुर आवाजात एक सुंदर गीत म्हणत होता “ जलते है , जिसके लिये तेरी आंखो के दिये , धुंड लाया हु वही गीत मी तेरे लिये “
क्रमशः
— निशा राकेश गायकवाड.
Leave a Reply